ncp news : राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाने सांगलीतील राजकीय संघर्ष संपणार की नव्याने पेटणार?

SHARE:

ncp news : राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाने सांगलीतील राजकीय संघर्ष संपणार की नव्याने पेटणार? : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची चर्चा रंगू लागली आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष पुन्हा एकाच छताखाली येणार का, याविषयी राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. अर्थात, ही चर्चा काही आजची नाही. यापूर्वीही अनेकदा दोन्ही पक्षांच्या एकत्र येण्याच्या शक्यतेवर चर्चा झाली. कधी नेत्यांच्या भेटीगाठींमुळे, तर कधी राजकीय विधानांमुळे या चर्चांना हवा मिळाली. मात्र, प्रत्यक्षात विलीनीकरणाचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

ncp news : राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाने सांगलीतील राजकीय संघर्ष संपणार की नव्याने पेटणार?

पण राजकारणात अशक्य वाटणार्‍या गोष्टीही कधी कधी शक्य होतात. त्यामुळे उद्या खरोखरच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण झाले, तर त्याचे राज्यभरात आणि विशेषतः सांगली जिल्ह्यात नेमके काय पडसाद उमटतील, याची उत्सुकता आता वाढू लागली आहे.
सांगली जिल्ह्याचा विचार केला, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर जिल्ह्यातील राजकीय चित्र काहीसे बदलले आहे. सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे जिल्ह्यात केवळ दोन आमदार आहेत.

ईश्वपूरचे जयंत पाटील आणि तासगाव-कवठेमहांकाळचे रोहित पाटील हे दोन चेहरे पक्षाची ताकद सांभाळताना दिसतात. एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध असताना या दोघांसोबतच शिराळ्याचे मानसिंगराव नाईक हेही राष्ट्रवादीचे आमदार होते. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद अधिक व्यापक होती.

आज मात्र परिस्थिती बदलली आहे. तासगाव आणि ईश्वरपूर या दोन मतदारसंघांमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे तुलनेने भक्कम अस्तित्व आहे. या दोन मतदारसंघांमध्ये पक्षाची राजकीय पाळेमुळे खोलवर रुजलेली आहेत. जयंत पाटील यांचे ईश्वरपूरमध्ये राजकीय वर्चस्व आणि रोहित पाटील यांच्यासमोर असलेली तासगावमधील राजकीय आव्हाने, या दोन्ही गोष्टी जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाच्या ठरतात.
दुसरीकडे अजित पवार गटाला सांगली जिल्ह्यात अद्याप कोणत्याही एका विधानसभा मतदारसंघात निर्विवाद वर्चस्व निर्माण करता आलेले नाही. मात्र, याचा अर्थ या गटाचे अस्तित्व नाही, असा मुळीच नाही.

काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, सहकार क्षेत्रात आणि ठरावीक राजकीय भागांमध्ये अजित पवार गटाने आपले स्थान निर्माण केले आहे. सांगली-मिरज-कुपवाड महापालिका आणि जिल्हा परिषदेमधील सत्तेतील सहभागामुळे या गटाचे स्थानिक राजकारणातील महत्त्व अधोरेखित होते. मात्र, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर सर्वाधिक लक्ष वेधले जाईल ते ईश्वरपूरच्या राजकारणाकडे!

ईश्वरपूर म्हणजे जयंत पाटील यांचा बालेकिल्ला. अनेक वर्षांपासून या मतदारसंघावर जयंत पाटील यांनी आपली राजकीय पकड कायम ठेवली आहे. मात्र, गेल्या काही काळात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे निशिकांत पाटील यांनी जयंत पाटील यांच्याविरोधात स्वतंत्र राजकीय ताकद उभी करण्याचा प्रयत्न केला आहे. दोघांमधील राजकीय संघर्ष हा केवळ दोन नेत्यांमधील संघर्ष राहिलेला नाही, तर इस्लामपूरच्या राजकारणातील दोन वेगवेगळ्या शक्तिकेंद्रांची लढाई बनला आहे.

आता समजा दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण झालेच, तर या दोन्ही नेत्यांचे राजकीय स्थान नेमके काय असेल? एकाच पक्षात राहून जयंत पाटील आणि निशिकांत पाटील यांच्यात एकमत होणार का? वर्षानुवर्षे एकमेकांविरोधात राजकीय संघर्ष करणारे नेते उद्या एकाच व्यासपीठावर येणार का? की पक्ष एक झाला तरी स्थानिक पातळीवरील संघर्ष कायम राहणार? हे प्रश्न महत्त्वाचे ठरणार आहेत.

तासगावमध्येही या विलीनीकरणाचे वेगळे परिणाम दिसू शकतात. एकीकडे रोहित पाटील यांच्याकडे शरद पवार गटाचे नेतृत्व आहे, तर दुसरीकडे स्थानिक पातळीवर अजित पवार गटाचे समर्थक आणि कार्यकर्ते आहेत. संजयकाका पाटील यांनी अजित पवार गटाकडून विधानसभा लढवली होती. सध्या ते कोणत्या पक्षात आहेत. हे गुलदस्त्यात आहे. दोन्ही गट एकत्र आल्यास कार्यकर्त्यांची मोट बांधण्याचे आव्हान असेल. मात्र, नेतृत्व आणि उमेदवारीचा प्रश्न निर्माण झाला तर जुन्या राजकीय स्पर्धा पुन्हा डोके वर काढू शकतात.

मात्र, या सगळ्या शक्यतांचा विचार केला तरी एक गोष्ट स्पष्ट दिसते. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण झाले म्हणून सांगली जिल्ह्याच्या राजकारणात लगेचच मोठी उलथापालथ होईल, असे ठामपणे म्हणता येणार नाही. कारण जिल्ह्यातील राजकारण हे केवळ पक्षांच्या नावावर चालत नाही. येथे स्थानिक नेत्यांचे वैयक्तिक प्रभावक्षेत्र, सहकारी संस्था, साखर कारखाने, जिल्हा बँक, ग्रामपंचायती, नगरपालिका आणि कार्यकर्त्यांची ताकद यांनाही तितकेच महत्त्व आहे.

त्यामुळे राष्ट्रवादीचे विलीनीकरण झालेच, तर सांगली जिल्ह्यात काही राजकीय समीकरणे बदलतील, काही नेत्यांना नव्या संधी मिळतील, तर काहींसमोर अस्तित्व टिकवण्याचे आव्हान उभे राहील. पण संपूर्ण जिल्ह्याचे राजकीय चित्र आमूलाग्र बदलेल, असे सध्याच्या परिस्थितीत दिसत नाही.

शेवटी प्रश्न एवढाच आहे की, राज्याच्या राजकारणात दोन राष्ट्रवादी पुन्हा एक होण्याची शक्यता निर्माण झाली, तर सांगली जिल्ह्यातील नेतेही मनापासून एकत्र येणार का? की मुंबईत पक्ष एक होईल आणि सांगलीच्या राजकारणात मात्र गटबाजीचे जुने अध्याय सुरूच राहतील?
राष्ट्रवादीचे विलीनीकरण होणार की नाही, हे भविष्यात स्पष्ट होईल. पण विलीनीकरणाच्या चर्चेनेच सांगली जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे, हे मात्र नक्की!

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *