rajkiyalive

political news : मी काय खेळणं आहे का? मुख्यमंत्री आग्रही होते पण…; पक्षातील सहकार्‍यांवर छगन भुजबळ संतप्त

political news : मी काय खेळणं आहे का? मुख्यमंत्री आग्रही होते पण…; पक्षातील सहकार्‍यांवर छगन भुजबळ संतप्त : नाशिक : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर मोठ्या प्रमाणात नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे. जेष्ठ नेत्यांना मंत्रिपदे न मिळाल्याने अनेकांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. यामध्ये सर्वात आघाडीवर भाजपचे सुधीर मुनगंटीवार आणि राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांचे नाव आहे. मंत्रीपद न मिळालेल्याने छगन भुजबळ संतप्त झाले आहेत. छगन भुजबळांनी सोमवारी अनेकवेळा माध्यमांसमोरच याबाबत नाराजी प्रकट केली. त्यानंतर आता नाशिकमध्ये पदाधिकार्‍यांसोबत बैठक घेतल्यानंतर भुजबळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मी काय तुमच्या हातातील खेळणं आहे का असं म्हणत छगन भुजबळ यांनी पक्षातील प्रमुखांवर निशाणा साधला आहे.

political news : मी काय खेळणं आहे का? मुख्यमंत्री आग्रही होते पण…; पक्षातील सहकार्‍यांवर छगन भुजबळ संतप्त

मंत्रिपद न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे नागपूर अधिवेशन सोडून नाशिकला रवाना झाले होते. राठा समाजाचे नेते मनोज जरागे यांच्याशी संघर्ष केल्याचे बक्षीस मिळाल्याची खंत भुजबळांनी व्यक्त केली होती. त्यानंतर आता नाशिकमध्ये भुजबळ यांनी पदाधिकार्‍यांसोबत बैठक घेत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना माझं मंत्रीपद कुणी नाकारलं हे शोधावं लागेल असं छगन भुजबळ यांनी म्हटलं.

मंत्रीपद कुणी नाकारलं हे शोधावं लागेल. तोच प्रयत्न सुरु आहे. प्रत्येकाला मंत्रिपद पाहिजे असतं. प्रश्न मंत्रिपदाचा नाही. प्रश्न हा ज्या प्रकारे अवहेलना करण्यात आली त्याचा आहे. त्यासंदर्भात उद्या सांगणार आहे. त्यांनीच लोकसभेला उभं राहा सांगितले होते. होळीच्या दिवशी आम्हाला ताबडतोब बोलवून घेतलं आणि सांगितले की पंतप्रधान मोदींनी सांगितले आहे की नाशिकमध्ये भुजबळच उभे राहणार. त्यावेळी मी त्यांना उद्या सांगतो असं म्हटलं.

त्यांनी तुमचे नाव सांगितल्याचे मला सांगण्यात आलं. एक महिना इथे आल्यानंतर सगळी तयारी झाली आणि चांगले वातावरण तयार झालं. ज्यांना नाशिकच्या विकासात रस आहे ते सगळे येऊन मला भेटून गेले. मी उभा राहणार असं सांगितले तर 15 दिवसांत नाव जाहीर करायचं होतं. सगळ्या महाराष्ट्राचे नाव जाहीर झालं पण माझं झालं नाही. मग मी माघार घेतो असं म्हटलं. मी तुमच्या तिकीटाकडे डोळे लावून बसणारा नाही, असं छगन भुजबळ म्हणाले.

मला कळलं की मुख्यमंत्र्यांनी माझा मंत्रिमंडळात प्रवेश असावा यासाठी आग्रह धरला होता. हे मी कन्फर्म करुन घेतलं आहे, असंही छगन भुजबळ म्हणाले. प्रफुल्ल पटेलांना चार महिन्यांपूर्वी राज्यसभेवर जायचं म्हटलं होतं. त्यावेळी माझं ऐकलं नाही आणि आता सांगत आहेत. मी काय लहान खेळणं आहे का तुमच्या हातातलं.

तुम्हाला वाटेल तेव्हा वर जा खाली बसा, आता निवडणूक लढवा सांगता. मी राजीनामा दिल्यानंतर माझ्या मतदारसंघातील लोकांना काय वाटेल. मी त्यांना सांगितले होते की मला जायचं आहे पण थोडे दिवस द्या. मतदारसंघामध्ये जी कामे आहेत ती पूर्ण करतो. लोकांची समजूत काढू आणि मग जाऊ. तुम्ही उठ आणि बस म्हणणार असाल तर छगन भुजबळ तसा मनुष्य नाही, असंही भुजबळांनी स्पष्ट केलं.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज