gokul dudh sangh nivad news : राजकारणातील लॉटरीचे खेळ : एक अलंकारीक चिंतन: राजकारण ही अशी रंगभूमी आहे जिथे प्रत्येकजण नट असतो, पण अंतिम नेपथ्य कोणाच्या नावावर उभे राहील, हे अखेरच्या क्षणापर्यंत निश्चित नसते. कोल्हापूर जिल्ह्यातील गोकूळ दूध संघाच्या चेअरमनपदावर घडलेली घटना याच नाट्यपूर्णतेचं एक ज्वलंत उदाहरण ठरते.
शशिकांत पाटील – राजकारणात अनुभवी, विश्वासार्ह, संघटनेत सर्वमान्य असे नाव. चेअरमनपदासाठी त्यांचे नाव सर्वसंमतीने निश्चित झाले होते. कार्यकर्त्यांपासून मतदारांपर्यंत प्रत्येकाच्या मनात एकच विचार – ही खुर्ची आता पाटलांचीच!
gokul dudh sangh nivad news : राजकारणातील लॉटरीचे खेळ : एक अलंकारीक चिंतन
पण हे राजकारण आहे. इथे निर्णय फक्त सभागृहात होत नाहीत, तर ते सत्ताकेंद्राच्या पडद्यामागे घेतले जातात. रात्र ही इथे नुसती विश्रांतीसाठी नसते, तर सत्ता-समीकरणांच्या नव्या आकृत्या कोरण्यासाठी असते. आणि अशीच एक रात्र आली – जिच्या पहाटेने सगळं चित्र बदलून टाकलं.
हसन मुश्र्रीफ यांच्या कनिष्ठ पिढीतील, राजकारणात अजून बाळसे धरू पाहणारे नाविद मुश्र्रीफ यांच्यावर अचानकपणे चेअरमनपदाची माळ पडते! नवा चेहरा, नव्या समीकरणांचा प्रतिनिधी – आणि इतक्या लीलया सत्तेचा पारडा झुकतो की क्षणभर वाटून जातं, हे सगळं स्वप्नवत आहे.
ही घटना एक गोष्ट सांगते – राजकारणात ’फायनल’ काहीच नसतं. जोवर खुर्चीवर बसण्याचा क्षण येत नाही, तोवर प्रत्येक विजेता ही शक्यतेची छाया असतो. आणि जेव्हा एखादा अनपेक्षित चेहरा समोर येतो, तेव्हा राजकारणाची खरी रंगत प्रकट होते.
हे म्हणजे शतरंजाचा डाव आहे – इथे वजीर कोण होईल, राजा कधी गडबडेल, प्यादा एखाद्या क्षणी कसा बदलून आपला सारा डाव उलथवेल, हे कोणीच सांगू शकत नाही.
गोकूळ दूध संघातील ही स्थित्यंतरांची कहाणी केवळ स्थानिक संस्थेपुरती मर्यादित नाही – ती आपल्याला सत्तेच्या अस्थिर, चंचल आणि कधी कधी चमत्कारिक रूपाची जाणीव करून देते.
या प्रकारांतून एक गोष्ट अधोरेखित होते – की राजकारणात अंतिम विजय हा संख्येचा नव्हे, तर वेळेचा, बुद्धीचा आणि योग्य वेळी खेचलेल्या एका चालीचा असतो.
शेवटी, या सार्या घडामोडींचा सारांश एका वाक्यात मांडता येईल – राजकारण म्हणजे संभाव्य शक्यतांचा खेळ – इथे लॉटरी कधी कुणाला लागेल, सांगता येत नाही!
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











