

समडोळी या संस्कारांनी नटलेल्या गावात यंदाचा पाडवा एक आगळावेगळा ठरला. नुसत्या गोड बोलांनी, मिठाईच्या ताटांनी किंवा फटाक्यांच्या गडगडाटाने नव्हे, तर “वृक्षारोपणाने जावयाचे स्वागत” करून गावाने एक विलक्षण संदेश दिला — “नातं फक्त माणसांमध्ये नाही, तर मातीशीही असावं!” 
समडोळी ग्रामपंचायतीने शासनाच्या मुख्यमंत्री पंचायत राज्य अभियानमध्ये भाग घेवून वेगवेगळे उपक्रम राबवित आहे. त्यानुसार सरपंच सौ. सुनिता हजारे, उपसरपंच क्रांती पाटील, ग्रामसेवक जेउरसाहेब यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत गावकर्यांनी हा नवीन उपक्रम राबवून चांगला आदर्श घालून दिला आहे.

समडोळी मध्ये मुख्यमंत्री पंचायतराज अभियान जोमात सुरू आहे. या अंतर्गत गावात विविध उपक्रम राबविले जात आहे. गावात वृक्षारोपण हा त्यातील प्रमुख मुद्दा आहे. गावात दिवाळी पाडव्यामुळे पाहुण्यांची वर्दळ वाढली होती पण त्या गर्दीत सर्वाधिक भावलेली गोष्ट म्हणजे नवीन जावयाचे स्वागत करताना लावलेले झाड.
फुलांच्या हाराऐवजी निसर्गाच्या गंधाने भरलेली ही भेट, आरतीच्या ताटाऐवजी हरित भविष्याची झोळी —
समडोळीने पाडव्याच्या शुभमुहूर्तावर एक अशी परंपरा सुरू केली, ज्याची मुळे भावनांच्या मातीत खोलवर रुजली आहेत.
प्रा. बी. एस. चव्हाण यांचे जावई अभिषेक जिवाजे आणि मुलगी स्वाती जिवाजे तसेच येथील अनिल हेरवाडे यांचे जावई पट्टणकोडोली येथील किरण खड्ड आणि मुलगी अर्पिता खड्ड गावात आले आणि त्यांचे स्वागत वृक्षारोपण करून करण्यात आले.
हे केवळ स्वागत नव्हते, तर जीवनाला दिलेला एक अर्थपूर्ण नमस्कार होता. त्या छोट्याशा रोपात भविष्याचं वचन होतं —
“आमचं स्वागत हिरवाईतून, आमचं प्रेम निसर्गातून.”


यानंतर शासनाच्या मुख्यमंत्री पंचायतराज अभियानाचा भाग म्हणून संपूर्ण समडोळी गाव हरिततेच्या रंगात न्हाऊन निघाले. गावातील प्रत्येक कोपऱ्यातून निसर्गप्रेमाची झुळूक वाहू लागली. “मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियान” या उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत समडोळी, चरक बहुउद्देशीय संस्था आणि जायन्ट्स ग्रुप ऑफ समडोळी शांतीसागर को ऑप के्रडीट सोसायटीचे संचालक एस. के. पाटील आणि त्यांच्या सहकार्यांनी हा उपक्रम राबविला यांच्या माध्यमातून
गावात हरित उपक्रमांची मालिका सुरू झाली.
माहेरवाशी महिलांनी तर एक हृदयस्पर्शी परंपरा जोपासली —आपल्या लाडक्या गावातील आठवणी जपण्यासाठी प्रत्येक स्त्रीने “एक आठवण… एक झाड” या भावनेतून वृक्षारोपण केलं.

त्यांच्या डोळ्यांत पाणी होतं, पण त्या पाण्यात दु:ख नव्हतं होता तो ओलावा, आपुलकीचा आणि मातीतल्या नात्याचा.
प्रा. बी. एस. चव्हाण हे निवृत्त शिक्षक आहेत. शिक्षण तज्ञ व राजकीय स्पर्श असलेले प्राध्यापक बी एस चव्हाण सर
आजही समाजकार्यात त्यांचा विचार तेजस्वी आहे. त्यांनी राबविलेल्या उपक्रमामुळे गावात विचारांची हरित क्रांती पेटली आहे. त्यांचं नाव आता केवळ शिक्षक म्हणून नाही, तर “हरित विचारांचे शिल्पकार” म्हणून घेतलं जातं. 

या साऱ्या उपक्रमामुळे समडोळी गावाने दाखवून दिलं की विकास म्हणजे केवळ रस्ते, गटारे आणि इमारती नव्हेत —
विकास म्हणजे मनांची समृद्धी, संस्कारांची सातत्यता, आणि निसर्गाशी असलेली जिव्हाळ्याची नाती.

समडोळीचा हा हरित पाडवा फक्त उत्सव नाही, तर भावनांचा, संवेदनांचा आणि नव्या विचारांचा उत्सव आहे.या झाडांच्या सावलीतून भविष्यातही फुलत राहो — समृद्ध, सुशोभित आणि सजीव समडोळी! 



Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.












