rajkiyalive

भाजपमध्ये पॅचअप की उमेदवार बदल?

खासदारांना पक्षांंतर्गत नेत्यांचा वाढता विरोध, तिकीटासाठी होणार रस्सीखेच

अनिल कदम, जनप्रवास

लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली असल्याने राजकीय पक्षांकडून तयारी सुरु झाली आहे. भाजपकडून लोकसभेची जोरदार तयारी केली आहे. भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांची दुसरी टर्म सुरु आहे. असे असले तरी विद्यमान खा. संजयकाका यांनाच पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. सांगलीच्या खासदारकीसाठी सध्या सर्वच पक्षांकडून तयारी सुरु आहे. निवडणुकीच्या तापणार्‍या या राजकीय वातावरणात सगळेच पक्ष गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. भाजपची जागा निश्चित असली तरी या जागेसाठी भाजपमध्येच चढाओढ सुरु झाली आहे. खासदारांविरोधात माजी जिल्हाध्यक्ष, माजी आमदार यांच्यात मतभेद आहेत, याशिवाय महायुतीतील शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांच्याशी नागेवाडी कारखान्यावरून त्यांचे वैर आहे. अशा परिस्थितीत अवघ्या काही महिन्यांवर निवडणूक आल्याने भाजपचे वरिष्ठ नेते खासदार संजयकाका यांच्यासोबत पक्षातील नेत्यांचे पॅचअप करणार की उमेदवार बदलणार याविषयी सर्वत्र जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

सांगली लोकसभेची जागा ही सर्वच पक्षांच्या दृष्टीने प्रतिष्ठेची ठरत आहे. त्यामुळे अनेकांच्या नजरा या जागेवर पडत आहेत. काही जण पाच वर्षे तयारी करतात, तर काही जण निवडणुका आल्या की उगवतात. काही जण फक्त विरोधाला विरोध करण्यासाठी किंवा राजकीय अस्तित्वासाठीही ही निवडणूक लढवितात. सध्या मात्र बदललेल्या राजकीय परिस्थितीत सांगलीची जागा जिंकण्यासाठी अनेकांनी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे.

सांगलीची जागा वर्षानुवर्ष काँग्रेसकडे राहिली, मात्र 2014 आणि 2019 च्या निवडणुकीवरील काँग्रेसला जागा गमवावी लागली. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नऊ वर्षे पूर्ण झाल्यानंतर महाजनसंपर्क अभियान राबविले जात आहे. सांगली जिल्ह्यातही भाजपकडून तयारी केली जात असताना खासदार संजयकाका पाटील यांच्या कामकाजाबाबत चर्चाही जोरदार सुरु आहे. 2014 साली लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर संजयकाका पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

हेही वाचा

पश्चिम महाराष्ट्रात महायुतीच्या सर्वच जागा डेंझर झोनमध्ये

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी

फडणवीसांचा भाजप कधी संपून जाईल सांगता येणार नाही

सांगली लोकसभेसाठी भाजपमध्येच ‘टशन’

भाजपने त्यांना थेट खासदारकीची उमेदवारी दिली. भाजपचा हा विश्वास सार्थ ठरवत त्यांनी काँग्रसचे उमेदवार प्रतीक पाटील यांचा पराभव केला. नंतर 2019 मध्ये भाजपकडून पुन्हा एकदा संजयकाका पाटील यांनाच उमेदवारी देण्यात आली. या निवडणुकीतही त्यांनी स्वाभिमानीच्या विशाल पाटील आणि वंचित बहुजन आघाडीच्या गोपीचंद पडळकर यांना पराभवाची धूळ चारली होती.

जिल्ह्यात भाजपकडून निवडणुकीची तयारी करण्यात येत आहे, परंतु भाजप पक्षांतर्गत सुरु असलेली गटबाजी थांबायला तयार नाही. खासदार संजयकाका आणि माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्यात अनेक कारणांवरुन सातत्याने वाद उफाळून येतात. पक्षविरोधात कारवाया खासदार गटाकडून सुरु आहेत, पक्षात राहून सोयीची भूमिका घेतली जात असल्याचा आरोप अनेकवेळा माजी जिल्हाध्यक्षांनी केला होता. खा. पाटील यांनाच पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आव्हान देण्याच्या तयारीत आहेत.

खासदार आणि माजी जिल्हाध्यक्षांनी वेगवेगळी चूल मांडत बैठका घेत आहेत. पक्षाचे जुने-नव्या कार्यकर्त्यांची त्यांच्याकडून भेटी-गाठी सुरु आहेत. देशमुख यांचा संपर्क वाढत असल्याचे चित्र दिसून येते. माजी आ. विलासराव जगताप आणि संजयकाका यांच्यातही मतभेद आहेत. गत विधानसभा निवडणुकीत खासदारांनी भाजपचे उमेदवार जगताप यांना पराभवास कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात आला. सध्याही त्यांचे अशाच प्रकारचे काम सुरुच आहे.

हेही वाचा

संजयकाका नेटवर्क अन् विकासकामांत बॅकफूटवर

लोकसभेसाठी आले साडेपाच हजार मतदान यंत्रे

दहा वर्षांत जिल्ह्यात नवीन काय?

गोपीचंद पडळकर खानापूरमधून लढणार

त्यामुळे जगताप गट खासदारविरोधात आक्रमक आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांच्या नागेवाडी येथील यशवंत कारखान्यावरून बाबर आणि खासदार पाटील यांच्यात वाद सुरू आहे. थकीत कर्जापोटी जिल्हा बँकेच्या ताब्यात असलेला यशवंत कारखाना खासदार पाटील यांनी खरेदी केला होता, मात्र आमदार बाबर यांनी खासदार संजयकाकांनी घेतलेल्या कारखान्यावर आक्षेप घेत न्यायालयात धाव घेतली आहे.

याबाबतची प्रक्रिया अद्यापही सुरूच आहे. त्यामुळे खासदार पाटील व आमदार बाबर यांच्यातील वाद कायम आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत खासदार पाटील यांच्या विरोधात भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी बहुजन वंचित आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली होती. भाजपचे संजयकाका विरोधात काँग्रेस राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी पुरस्कृत विशाल पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे पडळकर अशी तिरंगी लढत झाली.

हेही वाचा

संभाजी पवार गट पुन्हा रिचार्ज होणार

भाजपकडून प्रादेशिक पक्षांचे निर्मुलन

राजकीय आखाड्यातील पैलवान

या लढतीत खासदार पाटील यांनी बाजी मारत सलग दुसर्‍यांदा लोकसभेत एन्ट्री केली. वंचितचे पडळकर यांनी तीन लाखाहून अधिक मते घेतल्याने त्याचा फायदा भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांना झाला. गतवेळी पडळकर विरोधात गेले होते, त्याचा फायदा खासदार पाटील यांना झाला मात्र, यावेळी पडळकर भाजप सोबत आहेत, तरी त्याचा प्रत्यक्ष फायदा खासदारांना होणार का? अशी चर्चाही सुरू आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि संजयकाका पाटील यांच्यातील सख्य हे नेहमी चर्चेचा विषय असतो. मात्र, संजयकाकांनी राष्ट्रवादीशी जवळीक वाढत असल्याच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.

पक्षांतील माजी आमदारांचा वाढता विरोध असतानाही खासदार पाटील यांच्याकडून ग्रामीण भागात गट बांधणी झालेली नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्याच्या भरवशावर त्यांची वाटचाल सुरु आहे. याशिवाय शहरांच्या विकासांसाठी निधी देण्यात खासदारांचा हात आखडता राहिला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत पार्श्वभूमीवर भाजपमधील मतभेद मिटवून बांधणी करावी लागणार असल्याचे चित्र सध्या तरी दिसून येते.
भाजपमध्ये खासदार संजयकाका यांच्याकडून एकला चलो भूमिका कायम आहे.

पक्षातील आमदार, माजी आमदार तसेच माजी जिल्हाध्यक्ष यांच्याशी सख्य नाही. याशिवाय महायुतीतील शिंदे गटाचे आमदार बाबर यांच्याशी मतभेद आहेत. या सर्व गोष्टींचा परिणाम लोकसभा निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे. दरम्यान 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीही खासदारविरुद्ध भाजपमधील उर्वरित नेते असे चित्र निर्माण झाले होते, मात्र खासदार पाटील यांनी दिल्लीतील नेत्यांची मनधरणी करीत पुन्हा तिकीट मिळवले. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील नेत्यांना खासदार पाटील यांच्याच पाठीशी राहून काम करावे लागले होते.

पाच वर्षानंतरही खासदारांचा स्वभाव आणि काम करण्याची पद्धत यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे खासदारांविरोधात पक्षातूनच वातावरण चांगलेच तापले आहे. पक्षातील नेत्यांचा वाद कायम राहिला तर सांगलीची जागा धोक्यात येणार असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे भाजपचे वरिष्ठ नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जिल्ह्यातील नेत्यांचे पॅचअप करणार की उमेदवार बदलणार याविषयी राजकीय वर्तुळामध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. परंतु या निर्णयासाठी आणखी काही महिने वाट पहावी लागेल.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज