sangli bjp mnews : भाजप जिल्हाध्यक्ष निवडीत दिग्गजांना धक्का मागील महिन्याभरापासून भाजप जिल्हाध्यक्ष पदांच्या निवडीला अखेर मुहुर्त लागला. जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीत पक्षाच्या वरिष्ट नेत्यांनी दिग्गजांना धक्का दिला. भाजप नेतृत्वाने शहरात प्रकाश ढंग यांच्यावरच विश्वास दाखवला असून ग्रामीणमध्ये पुन्हा वाळवा तालुक्याला संधी देताना सम्राट महाडिक यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ घातली. मात्र माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांना पुन्हा एकदा वेटिंगवरच राहावे लागले.
sangli bjp mnews : भाजप जिल्हाध्यक्ष निवडीत दिग्गजांना धक्का
ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी सम्राट महाडीक, शहर जिल्हाध्यक्ष पुन्हा प्रकाश ढंग, संग्राम देशमुख वेटींगवर
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी जिल्हाध्यक्षांच्या निवडी जाहीर केल्या. पंधरा दिवसापूर्वी या निवडीसाठी शहर आणि ग्रामीण पक्षनिरीक्षकानी बैठक घेऊन विविध आघाड्यांच्या पदाधिकार्यांची मते घेतली होती. त्यांच्याकडून इच्छुकांचे प्रत्येकी तीन प्राधान्यक्रम घेतले होते. ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदावर कोणाची वर्णी लागणार याची उत्कंठा होती.
निशिकांत पाटील हे ग्रामीण जिल्हाध्यक्ष असताना विधानसभा निवडणुकीवेळी ते राष्ट्रवादीत गेल्याने त्यांच्या जागी माजी जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे यांची प्रभारी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदासाठी झालेला बैठकीत ग्रामीणच्या विविध आघाड्यांच्या पदाधिकार्यांकडून इच्छुकांचे प्राधान्य क्रम घेण्यात आले होते. त्यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख यांना ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाची संधी मिळेल अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र सम्राट महाडिक यांना ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाची संधी देत राज्य नेतृत्वाने धक्का दिला आहे.
कडेगाव तालुक्याला यापूर्वी संधी मिळाली आहे. तर वाळवा तालुक्यातून निशिकांत पाटील यांना संधी देण्यात आले होती.
मात्र विधानसभा निवडणुकी वेळी ते राष्ट्रवादीत गेले. त्यानंतर आता पुन्हा एकदा वाळवा तालुक्याला संधी देण्याच्या निमित्ताने सम्राट महाडिक यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी वाळवा, शिराळा तालुक्यात पक्ष भक्कम करण्यासाठी भाजपने सम्राट महाडिक यांना पसंती दिली आहे.
शहर जिल्हाध्यक्ष पदासाठी विद्यमान अध्यक्ष प्रकाश ढंग यांच्यासह पृथ्वीराज पवार, विश्वजीत पाटील, अॅड. स्वाती शिंदे, पृथ्वीराज पाटील, पांडुरंग कोरे आदी इच्छुक होते.
प्रकाश ढंग यांच्या नियुक्तीस दीड वर्ष झाली आहेत. त्यांच्या कार्यकाळात विधानसभा तसेच लोकसभा निवडणूक पार पडली. या दोन्ही निवडणुकीत त्यांनी शहराध्यक्ष म्हणून समन्वयाची मोठे भूमिका बजावली होती. पक्षाकडून आलेले कार्यक्रमही त्यांनी राबवले. भाजपच्या सक्रिय सदस्यता नोंदणीत सांगली शहर आघाडीवर राहिले. शिवाय आगामी महापालिका निवडणूक लक्षात घेऊन ढंग यांनाच शहर जिल्हाध्यक्षपदी कायम ठेवण्याचा निर्णय राज्य नेतृत्वाने घेतला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांवर भाजपचा झेंडा फडकवू ः सम्राट महाडीक
माझ्यासारख्या युवा कार्यकर्त्यांस भाजप नेतृत्वाने मोठी संधी दिली आहे. ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याची महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. पक्षात जुने आणि नव्यांची सांगड घालून काम करु. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि महानगरपालिका पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बळावर भाजपचा झेंडा फडकवू, असे नूतन ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडीक यांनी सांगितले.
सर्वांना सोबत घेवून सांगली महापालिका जिंकू ः प्रकाश ढंग
पक्षाने माझ्यावर पुन्हा विश्वास दाखवला आहे. शहर जिल्हाध्यक्षपदाच्या दीड वर्षाच्या कालावधीत सांगली व मिरज विधानसभा निवडणूक जिंकली. शहरात पक्षाची चांगली बांधणी केली आहे. सर्वांना सोबत घेवून पक्षाचे संघटनात्मक काम जोमाने करु. आगामी महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकवणार असल्याचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी सांगितले.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.