rajkiyalive

sangli bjp news : भाजप जिल्हाध्यक्षपदांच्या रस्सीखेचमधून गटबाजी

 

दिनेशकुमार ऐतवडे

भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवडीचा राष्ट्रीय कार्यक्रम सुरू आहे. त्याअंतर्गत सांगली ग्रामीण आणि शहर जिल्हाध्यक्ष निवडीतून जोरदार गटबाजी उफाळून आली आहे. जि. प. आणि महापालिका निवडणुकीच्यादृष्टीने अध्यक्षपदाला महत्त्व आहे. त्यातून एकीकडे ग्रामीणमध्ये चुलत बंधू माजी आमदार पृथ्वीराज देशमुख आणि माजी जि. प. सदस्य संग्राम देशमुख यांच्यातच रस्सीखेच सुरू आहे. दुसरीकडे शहर जिल्हाध्यक्षपदासाठी दोन इच्छुकांना दोन आमदारांचे समर्थन आहे, तर इतरांचेही तुल्यबळ समर्थन आहे. अगोदरच अंतर्गत नाराजी आणि त्याला या निवडीतून गटबाजीचे ग्रहण लागले आहे.

sangli bjp news : भाजप जिल्हाध्यक्षपदांच्या रस्सीखेचमधून गटबाजी

शहरसाठी दोन आमदारांचे दोघा इच्छुकांना समर्थन, इतरांकडूनही शक्तिप्रदर्शन

एकेकाळी पदासाठी तुल्यबळ कार्यकर्ते न मिळणार्‍या भाजपला आता मोदी लाटेवर केंद्रात आणि राज्यात सत्ता आल्यापासून (सन 2014 पासून) सुगीचे दिवस आले आहेत. यामुळे सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पक्षात इनकमिंग झाले. आजी-माजी खासदार, आजी-माजी आमदारांसह मोठी फौज भाजपमध्ये होती, अजूनही प्रवेशासाठी इच्छुकांच्या रांगा आहेत. दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे चार महिन्यात सांगली जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, पंचायत समित्यांच्या निवडणुका आहेत. यादृष्टीने पक्षात अध्यक्षालाही महत्त्व आहे. शिवाय वरिष्ठ पातळीवर इमेज बिल्डिंगसाठी या पक्षासाठी इच्छुकांची भाऊगर्दी आहे.

दरम्यान, एकाचवेळी राज्यातील सर्वच भाजप जिल्ह्याच्या अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया सुरू असून, यामध्ये मुलाखतीची प्रक्रिया, तसेच समर्थनार्थ मतआजमावणी झाली. त्यात सांगली ग्रामीण जिल्हाध्यक्षपदासाठी पृथ्वीराज देशमुख, संग्राम देशमुख या बंधूंसह तासगावचे संदीप गिड्डे-पाटील यांच्यासह अनेकजण इच्छुक आहेत. अर्थात खरी लढत देशमुख बंधुंमध्येच असल्याचे बोलले जाते. दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून दोन्ही बंधूंमध्ये विविध कारणांतून उघड मतभेद आहेतच. त्यात आता या निवडणुकीत एकमेकांसमोर ठाकण्यातून भर पडली आहे.
शहर जिल्हाध्यक्षपदासाठीही तीच स्थिती आहे.

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्र याचे कार्यक्षेत्र आहे.

वास्तविक नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सांगलीतून आमदार सुधीरदादा गाडगीळांनी प्रारंभी लढण्यास नकार दिला होता. त्यामुळे माजी आमदार नितीनराजे शिंदे, किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार, महिला आघाडी प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. स्वातीताई शिंदे, प्रदेश सरचिटणीस शेखर इनामदार, माजी जि. प. उपाध्यक्ष आदी पप्पू डोंगरे आदी इच्छुक होते. परंतु पुन्हा पक्षाने सुधीरदादा गाडगीळ यांना उमेदवारी दिली. त्यातून नाराजीचा सूरही होता. तो वरकरणी दूर झाला तरी थोडेफार मनभेद असल्याचे निवडणुकीत दिसून आले होते.अर्थात सुधीरदादा गाडगीळ यांनी हॅटट्रिक करीत 36 हजार मताधिक्क्यासह बाजी मारली.

मिरजेतून सुरेश खाडे यांच्या उमेदवारीला भाजपसह महायुतीतील घटकपक्षाच्या काही पदाधिकार्‍यांकडून विरोध झाला होता.

तेथे त्यांचेच पूर्वाश्रमीचे स्वीय सहाय्यक मोहन व्हनखंडे यांनी उमेदवारी मागितली होती. ती न मिळाल्याने काँग्रेसमध्ये प्रवेशही केला. पण तेथे उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली. अखेर अनेकजण इच्छुकांना डावलून खाडे यांना पक्षाने संधी दिली आणि मिरजेतून चौकार ठोकत खाडे यांनीही 44 हजार मताधिक्क्यासह बाजी मारली. अर्थात निवडणूक संपली तरी निवडणूक पश्चात दोन्ही आमदार, पदाधिकारी, त्यांच्या समर्थकांतील मनभेद अद्याप कायम आहेत. त्यातूनच अनेक कार्यक्रमांमध्ये सवतासुभा आणि गटबाजीचे नेहमीच प्रदर्शन होत आहे.

सध्या शहर जिल्हाध्यक्ष निवडणूक तर यादृष्टीने केंद्रबिंदू ठरला आहे. यात शहर जिल्हाध्यक्षपदासाठी विद्यमान अध्यक्ष माजी नगरसेवक प्रकाश ढंग, पृथ्वीराज पवार, माजी नगरसेवक पांडुरंग कोरे, महिलांना पहिल्यांदाच संधी द्यावी या मागणीअंतर्गत महावितरणच्या संचालिका नीताताई केळकर, अ‍ॅड. स्वातीताई शिंदे, भारतीताई दिगडे आणि युवानेते विश्वजित पाटील व मोहन वाटवे हे इच्छुक आहेत. यात सांगलीतील दोन्ही आमदारांकडून आपापल्या समर्थक दोघांची शिफारस केल्याचे समजते. त्यांच्या नावाची उघडपणे चर्चा असून, दिग्गजांना डावलून त्या समर्थनाबद्दल नाराजीही व्यक्त होत आहे.

sangli-bjp-news-factionalism-in-the-race-for-bjp-district-president-post

अर्थात या इच्छुक दिग्गजांनीही आपापल्यापरीने माजी आमदारांसह पदाधिकार्‍यांमार्फत समर्थनाद्वारे फिल्डिंग लावली आहे. पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून कोणाच्या गळ्यात माळ पडणार हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. एकूणच अध्यक्षपद कोणालाही मिळो, गटबाजीचा खेळ अधिकच रंगणार हे उघड आहे.

झेडपी, मनपासाठीही समर्थकांसाठी नेत्यांची मोर्चेबांधणी

महायुतीअंतर्गत जिल्ह्यात विधानसभेचे पाच आणि विधानसभेचा एक असे आमदार आहेत. अर्थात शहर व ग्रामीणसाठी जिल्हाध्यक्षपदासाठी त्यांनी आपापल्या हिताच्या समर्थकांसाठी फिल्डिंग लावली आहेच. सोबतच तेथे काही होवो, किमान आपापल्या मतदारसंघात झेडपी उमेदवारीसाठी समर्थकाची वर्णी लावण्यासाठी रस्सीखेच होणार आहेच. यात प्रामुख्याने शहरात महापालिकेसाठी जास्त गटबाजी आहे. यामुळे दोन्ही आमदारसमर्थक विरुद्ध पक्षांतील वरिष्ठ पदाधिकार्‍यांची अधिकाधिक कार्यकर्त्यांना उमेदवारीची संधी देत आपला दबावगट निर्माण करण्याची आतापासूनच फिल्डिंग सुरू आहे. भरीस भर म्हणून सहयोगी राष्ट्रवादी, शिंदे गट, जनसुराज्यशक्तीच्या नेत्यांचीही त्याद़ृष्टीने व्यूहरचना राहणार आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज