जनप्रवास । सांगली
sangli congress news : सांगलीत काँग्रेसचे माजी नगरसेवक अभिजीत भोसले शरद पवार पक्षात : राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर सांगलीतील राष्ट्रवादीच्या अनेक माजी नगरसेवकांनी आ. जयंत पाटील यांच्या विरोधात भूमीका घेत पक्ष सोडला होता. त्यामुळे आ. जयंत पाटील यांनी दसर्याच्या मुहूर्तावर नव्याने सांगली शहरात पक्षाची बांधणी सुरू केली आहे. काँग्रेसचे माजी नगरसेवक अभिजीत भोसले यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. पाटील यांनी त्यांचे स्वागत करत त्यांना शहर जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली.
sangli congress news : सांगलीत काँग्रेसचे माजी नगरसेवक अभिजीत भोसले शरद पवार पक्षात
राज्याच्या राजकारणात दीड वर्षांपूर्वी भूकंप घडला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक आमदारांनी सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला होता. तर शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँगे्रस शरद पवार पक्षाची स्थापना केली होती. राज्यात राष्ट्रवादीत दोन गट झाले होते. त्यावेळी सांगली शहरातील अनेक माजी नगरसेवकांनी आ. जयंत पाटील यांची साथ सोडून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार गटात प्रवेश केला होता. त्यामुळे अजितदादा गटाची ताकद मनपा क्षेत्रात वाढली आहे. आता आ. जयंत पाटील यांनी पुन्हा मनपाच्या राजकारणात लक्ष घातले आहे. दसर्याच्या मुहूर्तावर पक्षाची नव्याने बांधणी सुरू केली आहे.
काँग्रेसचे अभ्यासू नगरसेवक अभिजीत भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. आ. पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. अभिजित भोसले यांना पक्षात प्रवेश झाल्यानंतर त्यांना सांगली शहर जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. नियुक्तीचे पत्र प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. अभिजित भोसले म्हणाले की, पक्षाचे पुरोगामी विचार व ध्येय धोरणे तळागाळात पोहचविण्यासाठी तसेच पक्षाच्या माध्यमातून लोकहिताची कामे करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहीन. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्या नेतृत्वाखाली लोकहीत डोळ्यासमोर ठेवून काम करू, अशी ग्वाही दिली.
यावेळी पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, युवक शहर जिल्हाध्यक्ष राहुल पवार, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सचिन जगदाळे, सांगली शहराध्यक्ष सागर घोडके, समीर कुपवाडे, धनंजय पाटील, महालिंग हेगडे, डॉ. पृथ्वीराज पाटील, अजित दुधाळ, आकाराम कोळेकर ,वाजीद खतीब, निलेश शहा व डॉ. शुभम जाधव आदी उपस्थित होते.
महाविकास आघाडीत जुंपणार….
महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष व शिवसेना (उबाठा) हे तीन प्रमुख पक्ष आहेत. अभिजीत भोसले हे काँग्रेसचे नगरसेवक आहेत. त्यांनी शरद पवार पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांकडून नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसचे नगरसेवक फोडून घेतले जात आहेत. यावरून भविष्यात महाविकास आघाडीत चांगलीच जुंपणार आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.