special news : मुलींच्या अपेक्षा अन् मुलांचे करिअर : लग्नाचा झाला खेळखंडोबा

SHARE:

special news : मुलींच्या अपेक्षा अन् मुलांचे करिअर : लग्नाचा झाला खेळखंडोबा : नोकरी व स्थिरस्थावरच्या मागे लागलेली मुले व मुलींच्या वाढलेल्या अव्वाच्यासव्वा अपेक्षा यामुळे लग्नाचा खेळखंडोबा सुरू आहे. शहरी व ग्रामीण भागातील अनेक मुल-मुली मुंबई, पुणे, नाशिक, चेन्नई, बेंगलोर सिटीत नोकरीमध्ये गुंतली आहेत. तर अनेक जण स्पर्धा परिक्षांच्या नादात असल्याने विवाहयोग्य वय वाढत चालले आहे. मुलांनी पत्तीशी ओलांडली तरी मुली मिळेनात अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे लग्नाळूंच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत होत चालली आहे.

special news : मुलींच्या अपेक्षा अन् मुलांचे करिअर : लग्नाचा झाला खेळखंडोबा

वयाची 35 ओलांडली तर मुलांना मिळेनात मुली

जुन्या पद्धतीच्या ‘चूल आणि मूल’ या संकल्पनेला झुगारुन मुली आधुनिकतेकडे झुकताना दिसत आहेत. शेतकरी असणारे शेतकरीच शेतीला दुय्यम समजू लागल्यामुळे शेतकरी मुलीच्या अपेक्षा वाढल्या आहेत. शेतकर्‍यांच्या मुलांना मुलगी देण्यास पालक टाळतात. ज्या तरूणाला सरकारी नोकरी तसेच मुलगा पुणे, मुंबईसारख्या शहरात नोकरीला आहे. गाडी, बंगला आहे, अशा तरुणांना आपली मुलगी द्यावी, असे अनेक मुलींच्या पालकांना वाटू लागले आहे. तसेच लग्न करण्यासाठी मुलगा आर्थिकदृष्ट्या किती श्रीमंत आहे हे बघितले जात आहे. त्यावरुन लग्न ठरताना दिसत आहे. आर्थिक स्थैर्य न बघता लग्न करणारे कमी जोडपे सध्याच्या घडीला आपल्याला पहायला मिळत आहे.

बेरोजगारांची संख्याही वाढली आहे. उच्चशिक्षित तरुणही आज बेरोजगारीच्या विळख्यात अडकलेले आपल्याला पाहायला मिळतात.

ग्रामीण भागातील मुलांनी 35 पार केली तरी देखील लग्नासाठी मुलगी मिळेना, अशी अवस्था अनेक तरुणांची झाली आहे. तर दुसरीकडे शहरी तरूणांची देखील हीच अवस्था झाली आहे. एमपीएससी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे काही तरुण 7-8 वर्षे अभ्यासात घालून हाती काहीच लागत नाही. मग मुंबई, पुणे शहरात नोकर्‍या करू लागले आहेत. पण चांगले पैसे कमावणारे तरुणांना सुद्धा आज मुली द्यायला पालक राजी होत नाहीत. मुलींचे विवाहाचे वय जास्ती जास्त 24 तर मुलांचे वय 26-27 असायला पाहिजे मात्र 35 शी पोहचले आहे. मुलींच्या अपेक्षा जास्त आहेत. त्यामुळे अनेक तरूणांना लग्न जुळवताना संकटाचा सामना करावा लागत आहे.

पूर्वी मुला-मुलींच्या लग्रासाठी स्थळ पाहताना कुटुंबातील मुख्य व्यक्तीला चपला झिजवाव्या लागत होत्या.

आता घर बसल्या मोबाईलवर स्थळ शोधली जात आहेत. काही वर्षांपूर्वी पाहुण्यात पाहुणे होण्याची प्रथा होती. मुलगी नातेवाइकांच्या मुलाला देण्यास प्राधान्य दिले जायचे. मात्र, सध्या हा गोतावळा मागे पडत चाललाय. मुलगी पाहुण्यात नव्हे तर पाहुण्याच्या पाहुण्याला देण्यासही अपवाद वगळता कोणी उत्सुक नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे अनेकांची लग्नेच ठरत नसल्याचे चित्र आहे.

विवाह नोंदणी संस्था जोमात

एकेकाळी लग्न जुळवणे म्हणजे पुण्याचे काम समजले जात होते. मात्र आता त्याला व्यावसायिकतेचे स्वरुप आले आहे. गेल्या तीन चार वर्षात विवाह नोंदणी संस्था तेजीत होत्या. मात्र वाढत्या अपेक्षामुळे विवाह नोंदणी केलेला बायोडाटा देऊनही मुलींकडील मंडळी प्रतिसाद देत नाहीत. मुला-मुलींची वाढती वये, लग्नाबाबतच्या अपेक्षा, नोकरदार मुलांची कमी संख्या, वेळेत लग्न जुळवण्यासाठी पालकांची व्याकुळता या सर्वांचा फायदा विवाह नोंदणी कार्यालयांना होत असून त्यातून हजारो रुपयांची उलाढाल होत आहे.

दोन वर्षात अडीच हजार जोड्याच…..

जानेवारी 2023 ते डिसेंबर 2024 या दोन वर्षांच्या काळात महापालिकेकडे केवळ 2 हजार 582 विवाह नोंदण्या झाल्या आहेत. महापालिका क्षेत्र व इतर भागात विवाह झालेल्या मनपा क्षेत्रातील मुला-मुलींच्या नोंदण्या केल्या जातात. सध्या विवाह नोंदणीसाठी आलेल्या मुलांचे वय साधारणपणे 27 ते 35 च्या घरात आहे. तर मुलींचे वय हे 23 ते 30 असल्याचे मनपाचे विवाह नोंदणी अधिकारी भरत आरगे यांनी सांगितले.

का कारणांमुळे लग्नास होत आहे विलंब…
* शहरी भागातील मुलींना हवा नोकरीवारा मुलगा
* ग्रामीण भागातील मुलींना नोकरीबरोबर शेतीही हवी
* पुणे, मुंबईतील तरूण-तरूणींना त्याच शहरातील हवा जोडीदार
* वयामध्ये पडत असलले अंतर
* बंद होत चाललेली पाहुण्यात पाहुणे होण्याची प्रथा

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *