18 मार्चला विशेष सभा, सत्ता स्थापनेसाठी महाविकास आघाडी, युतीकडून जोरदार प्रयत्न
zp news : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडी 18 मार्चला : गेल्या तीन आठवड्यापासून प्रतिक्षा लागून राहिलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवडीला अखेर मुहुर्त बुधवार (दि. 18) रोजी होणार आहे. निवडीसाठी विशेष सभा घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सोमवारी दिले आहेत. या निवडीसाठी अध्यासी अधिकारी म्हणून मिरजेचे उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांची नियुक्ती केली आहे.
zp news : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडी 18 मार्चला
निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने सत्ता स्थापनेसाठी युती, आघाडीतील नेते मंडळींनी जोरदार राजकीय हालचाली सुरु केल्या आहेत. सत्ता स्थापनेत किंगमेकरची भूमिका असलेल्या अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे शिवसेनेने अजून भूमिका अद्यापही गुलदस्त्यात ठेवली आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समितींच्या निवडणुकीचा निकाल 9 फेब्रुवारी रोजी जाहीर झाला. परंतु अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती निवडीचा कार्यक्रम लांबला होता. त्यामुळे इच्छुक सदस्यांसह नेतेमंडळींमध्ये अस्वस्थता होती. दरम्यान, अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच पंचायत समिती सभापतींची निवड करून पहिली बैठक दि.20 मार्चपूर्वी घ्या, असे आदेश ग्रामविकास विभागाने दि. 25 रोजी जिल्हाधिकार्यांना दिले होते. त्यानुसार प्रशासकीय हालचाली सुरु झाल्या.
पहिल्या टप्प्यात पंचायत समितीच्या सभापती निवडीसाठी 10 मार्च रोजी विशेष सभा बोलवण्याचे आदेश काढले आहेत. त्यामुळे सर्वांना मिनी मंत्रालयाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीकडे लागल्या होत्या. जिल्हाधिकारी काकडे यांनी याबाबत सोमवारी आदेश काढले आहेत. निवडीसाठी दि. 18 रोजी सभा बोलवण्यास आदेश दिल आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत.
जिल्हा परिषदेच्या निकालात सर्वांधिक 18 जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मिळाल्या. तसेच भाजप 16, काँग्रेस 11, शिंदे शिवसेना 7, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला 6 तर जनसुराज्य, शिवसेना (उबाठा) आणि रयत क्रांतीला प्रत्येकी 1 जागा मिळाली. सत्ता स्थापनेसाठी गरजेचे असलेले संख्याबळ महायुतीकडे आहे. मात्र घटक पक्षामध्ये मतभेद आहेत. तसेच महाविकास आघाडीला 1 जागेची गरज आहे. परंतु, सत्ता स्थापनेत कोण कोणाला पाठिंबा देणार याबाबत एकमत झाले नाही. त्यामुळे सत्तेचा तिढा अजून सुटलेला नाही.
मिनी मंत्रालयात कोणाचा वरचष्मा राहणार, अध्यक्षपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत मोठी उत्सुकता होती. विविध राजकीय आघाड्यांमध्ये चर्चा, गाठीभेटी आणि रणनीती आखण्याचे सत्र सुरु आहे. शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाची भूमिका निर्णायक ठरणार असल्याने त्यांच्या भूमिकेकउे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड कार्यक्रम जाहीर झाल्याने सदस्यांना आता स्पष्ट दिशा मिळाली आहे.
10 मार्च रोजी पंचायत समिती सभापती निवडीनंतर स्थानिक पातळीवरील सत्तास्थापना पूर्ण होईल, तर 18 मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीनंतर जिल्हास्तरीय नेतृत्व निश्चित होणार आहे.
अध्यक्षपदासाठी अनेक नावे चर्चेत असून, शेवटच्या क्षणापर्यंत समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. निवड प्रक्रिया पारदर्शक आणि शांततेत पार पडावी यासाठी प्रशासनाने आवश्यक तयारी सुरु केली आहे. सुरक्षेच्या दृष्टीनेही खबरदारी घेण्याची सूचना जिल्हाधिकारी काकडे यांनी दिल्या आहेत.
जिल्हा परिषदेचे पहिले अडीच वर्ष अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आहे. नेत्यांकडूनही चाचपणी सुरू आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून संध्या आनंदराव पाटील (वाटेगाव गट), संगीता संभाजीराव पाटील (कासेगाव), देविका भोजराज राजेघोरपडे (येलूर), प्रतिमा सुजित मोरे (रेठरेहरणाक्ष), तसेच भाजपकडून स्वप्नाली मनोज मासाळ (डफळापूर गट), माधवी ब्रम्हदेव पडळकर (निंबवडे), कविता किरण पाटील (संख), शिंदे शिवसेनेकडून शितल अमोल बाबर (भाळवणी), राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडून राजेश्वरी रणधीर नाईक (वाकुर्डे बुद्रुक), सुजाता निवास पाटील (देशिंग), सावित्री तम्मणगौडा रवि-पाटील (जाडबोबलाद) यांची नावे चर्चेत आहेत.
अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम असा…
अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी 18 मार्च रोजी सकाळी 11 ते 12 यावेळेत अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होईल. दुपारी 12 ते 12.30 यावेळेत अर्जाची छाननी होईल. अर्ज मागे घेण्यास दुपारी 12.30 ते 1 वाजेपर्यत वेळ देण्यात आला आहे. दुपारी 2 वाजता अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी सभा बोलवण्यात येईल.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











