SANGLI LOKSABHA : सांगली लोकसभेसाठी काँग्रेस पदाधिकारी आक्रमक: आज मुंबईत महत्वपूर्ण बैठक : सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये तिढा निर्माण झाला आहे. काँग्रेसने लोकसभेसाठी तयारी सुरू केली असताना शिवसेना व राष्ट्रवादीने ही जागा मागितल्याने काँग्रेसची कोंडी निर्माण झाली आहे. मात्र काँग्रेस या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत ही जागा सोडण्यास तयार नाही. या पार्श्वभूमीवर मंगळवारी मुंबईत काँग्रेसच्या नेते, पदाधिकारी व इच्छूक उमेदवारांची बैठक होणार आहे. या बैठकीत काँग्रेसचे पदाधिकारी आक्रमक भूमीका मांडणार आहेत.
SANGLI LOKSABHA : सांगली लोकसभेसाठी काँग्रेस पदाधिकारी आक्रमक: आज मुंबईत महत्वपूर्ण बैठक
जनप्रवास । सांगली
लोकसभेची निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा वाद अद्याप मिटलेला नाही. चर्चेच्या केवळ फेर्या सुरू आहेत. काँग्रेसला कोल्हापूर लोकसभेची जागा हवी आहे. या ठिकाणी शाहू महाराज लढण्यासाठी तयार आहेत. पण ते काँग्रेसच्या चिन्हावर. त्यामुळे माजी मंत्री, आ. सतेज पाटील कोल्हापुरच्या जागेसाठी आग्रही आहेत. मात्र ही जागा सोडण्यास शिवसेना तयार नाही. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कोल्हापुरच्या जागेसाठी विनंती केल्यावर शिवसेनेने ही जागा सोडण्याची तयारी दर्शविली, पण सांगली लोकसभेच्या जागेवर दावा केला आहे. त्यामुळे काँग्रेसची कोंडी झाली. तर महाविकास आघाडीत जागेवरून पेच निर्माण झाला आहे.
सांगली लोकसभेची जागा 2019 च्या निवडणुकीत जागा वाटपात स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडली होती.
त्यामुळे या निवडणुकीत ही जागा शिवसेनेला सोडावी, अशी मागणी होऊ लागली आहे. पण काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे चिन्ह गोठले, या निवडणुकीत देखील काँग्रेसला जागा मिळाली नाही तर पक्षाला कार्यकर्ते शोधायची वेळ येईल. अपवाद वगळता गेल्या अनेक वर्षांपासून या मतदारसंघात काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. शिवाय गेल्या दोन महिन्यापासून काँग्रेसने या मतदारसंघात तयारी सुरू केली आहे. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांना कामाला लागण्याच्या सूचना देखील केल्या आहेत. त्यानुसार विशाल पाटील पायाला भिंगरी लावून प्रचार करत आहेत. अनेक भागात त्यांच्या बैठका झाल्या आहेत. यावेळी काँग्रेसला चांगला प्रतिसाद मिळत असताना जागा वाटपाचा घोळ सुरू झाला असल्याने काँग्रेस पदाधिकारी आक्रमक झाले आहे.
काँग्रेसची मंगळवारी मुंबई येथे बैठक होणार आहे.
या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, आ. विश्वजीत कदम, यांच्यासह राज्यातील प्रमुख नेते, जिल्हाध्यक्ष व इच्छूक उमेदवार बैठकीला उपस्थित राहणार आहेत. सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे यासह राज्यातील 17 मतदारसंघाचा आढावा मतदार संघनिहाय घेतला जाणार आहे. सांगली लोकसभेच्या जागेवर देखील खल होणार आहे. यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. विक्रमसिंह सावर्डेकर, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, प्रदेश उपाध्यक्ष व इच्छूक उमेदवार विशाल पाटील बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत.
सांगली लोकसभेची जागा काँग्रेसला मिळावी, यासाठी पदाधिकारी आक्रमक भूमीका मांडणार आहेत. त्यामुळे मंगळवारी होणार्या या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काँग्रेसच्या अस्तित्वासाठी सांगली हवीच…
सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. गेल्या दहा वर्षात या मतदारसंघात भाजपचा उमेदवार निवडून आला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने ही जागा स्वाभिमानीला सोडली होती. त्यामुळे काँग्रेसचे हात चिन्ह मतदारसंघात नव्हते. मात्र यावर्षी काँग्रेसकडून जोरदार तयारी केली जात आहे. जर पुन्हा ही जागा शिवसेना अथवा राष्ट्रवादीला गेली तर काँग्रेसचे प्रचंड नुकसान होणार आहे. त्यामुळे काँग्रेसच्या अस्तित्वासाठी सांगली लोकसभेची जागा हवी आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.