SANGLI : काँग्रेसला विजयाची संधी, राष्ट्रवादीची गुगली तर शिवसेनेकडून जागेचा हट्ट

SHARE:

जनप्रवास । सांगली
SANGLI : काँग्रेसला विजयाची संधी, राष्ट्रवादीची गुगली तर शिवसेनेकडून जागेचा हट्ट : सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला विजयाची चांगली संधी चालून आली असताना 2019 प्रमाणे पुन्हा काँग्रेसची गोची करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीत सुरू झाला आहे. सांगली लोकसभेच्या जागेवर काँग्रेसचे उमेदवार विशाल पाटील पायाला भिंगरी लावून फिरत असताना राष्ट्रवादीने प्रतीक जयंतराव पाटील यांच्यासाठी गुगली टाकली. आघाडीमध्ये या दोन्ही पक्षाचा वाद सुरू असतानाच शिवसेनेने एन्ट्री करत कोल्हापूर घ्या पण सांगली द्या, अशी भूमीका घेतली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेचा तिढा वाढवला जात आहे.

 

SANGLI : काँग्रेसला विजयाची संधी, राष्ट्रवादीची गुगली तर शिवसेनेकडून जागेचा हट्ट

सांगली लोकसभेसाठी महाविकास आघाडीत तिढा

सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. अपवाद वगळता या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार निवडून आला आहे. गेल्या दहा वर्षांपासून लोकसभा मतदारसंघातून चित्र बदलले आहे. जिल्ह्यावर वर्चस्व गाजवलेले माजी मुख्यमंत्री स्व. वसंतदादा पाटील यांच्या नातवांना दोनवेळा पराभूत व्हावे लागले आहे. यापूर्वी 35 वर्षे दादा घराण्यातील उमेदवाराने या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. पण गेल्या दहा वर्षांमध्ये मतदारसंघावरील काँग्रेसची व दादा घराण्याची असलेली कमांड हळूहळू सैल होत चालली आहे. 2019 मध्ये काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांचा पराभव झाला पण ते खचले नाहीत. पराभव पचणी पाडून पाच वर्षांपासून ते जनतेत कामाला लागले आहेत. जिल्ह्यातील विविध उपक्रम, सामाजिक कार्य व नेत्यांच्या गाठीभेठीवर त्यांनी गेल्या पाच वर्षांपासून भर दिला आहे. त्याचा फायदा म्हणजे त्यांना सध्या चांगला प्रतिसाद मिळत आहे.

भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय पातळीवरील टीमने देशातील विविध मतदारसंघातील खासदारांच्या कामाचा आढावा घेतला होता.

त्यांच्या टीममार्फत सर्वे देखील केला होता. त्यामध्ये सांगलीची जागा धोक्याची दाखविली होती. शिवाय अनेक खासगी कंपनीमार्फत देखील गेल्या वर्षीपासून सर्वे गेला जात आहे. त्यामध्ये काँग्रेसला विजयाची संधी मिळेल, अशी आशा कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगली लोकसभेसाठी विशाल पाटील यांना तयारी करण्याच्या सूचना दिल्या. त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. केवळ घोषणा होणे बाकी आहे. मात्र अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रवादीकडून गुगली टाकली गेली आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांचे सुपुत्र प्रतिक पाटील यांनी सांगली अथवा हातकणंगलेच्या जागेवर दावा केला आहे.

पण सांगलीची जागा काँग्रेसची तर हातकणंगलेंची शिवसेनेची. यामुळे राष्ट्रवादीची मोठी अडचण होत आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचा महिला मेळावा झाला होता. यावेळी आ. जयंत पाटील यांनी प्रतीक पाटील यांना सांगली अथवा हातकणंगले मतदारसंघातून निवडून लढविण्याचा आग्रह कार्यकर्ते करत असल्याचे जाहीर सांगितले होते. तशी फिल्डिंग देखील लावली जात आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या या वादात शिवसेनेने मात्र फायदा घेण्याची तयारी सुरू केली आहे. कोल्हापुरची जागा काँग्रेस पक्षाला देऊ पण काँग्रेसने सांगली लोकसभेची जागा शिवसेनेला द्यावी, असा हट्ट धरला आहे. वास्तविक शिवसेनेेने ही जागा मागताना कशाचा आधार घेतला? असा सवाल आता काँग्रेसचे काही लोक खासगीत करू लागले आहेत.

सांगली लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत.

त्यामध्ये जत, पलूस-कडेगाव हे दोन काँग्रेसकडे, सांगली व मिरज भारतीय जनता पार्टीकडे तर तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरचंद्र पवार पक्षाकडे व खानापूर-आटपाडी मतदारसंघात शिवसेनेचे (शिंदे गट) वर्चस्व आहे. एकाही मतदारसंघात शिवेसना (उबाठा) गटाचा विधानसभा सदस्य नाही. तसेच जिल्ह्यात काँग्रेस व राष्ट्रवादीचे अधिक वर्चस्व आहे. शिवसेना (उबाठा) गटाची ताकद देखील मर्यादीत आहे. त्यामुळे विकास महाआघाडीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ काँग्रेसकडेच असणे आवश्यक आहे. मात्र शिवसेनेने आता नवा वाद निर्माण केला आहे.
2019 च्या निवडणुकीत देखील हाच प्रकार घडला होता. काँग्रेसचे विशाल पाटील यांनी मतदारसंघात पूर्ण तयारी केली.

मात्र ऐनवेळी ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिली.

विशाल पाटील हे स्वाभिमानीच्या बॅट चिन्हावर उभे राहिले. ऐनवेळी बदललेले चिन्ह मतदारांच्या लक्षात आले नाही. तरी देखील तीन लाखांवर मते विशाल पाटील यांनी घेतली. पण या निवडणुकीत विशाल पाटील यांनी प्रत्येक बैठकीत, प्रचार सभेत ही जागा काँग्रेसची आहे. अन् काँग्रेसच्या हात चिन्हावरच निवडणून लढवणार असल्याचे सांगत आहेत. पण ऐनवेळी शिवसेनेने हट्ट केल्याने त्यांच्या प्रचाराला देखील अडचण निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे सांगलीच्या जागेचा तिढा तातडीने सोडविणे आवश्यक आहे. शिवसेनेच्या चिन्हावर विशाल पाटील लढले तरी देखील तोटा होण्याची शक्यता आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *