rajkiyalive

SANGLI LOKSABHA : सांगलीत काँग्रेससाठी आर या पारची लढाई

जनप्रवास । सांगली
सांगली काँग्रेसचा बालेकिल्ला. आणीबाणीनंतर देशभरात काँग्रेसने अनेक जागा गमावल्या होता. पण सांगलीतून काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला होता. एकेकाळी सांगलीतून राज्यातील उमेदवार ठरविले जात होते. पण याच काँग्रेसला उमेदवारीसाठी गेल्या पंचवार्षिक निवडणुकीपासून संघर्ष करावा लागला आहे. यावर्षी संपूर्ण तयारी पूर्ण झाली असताना शिवसेनेने (उबाठा) घात केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता काँग्रेस वाचविण्यासाठी आर-पारची लढाई करणे आवश्यक आहे. त्यासाठी वेळप्रसंगी विशाल पाटील यांना काँग्रेसकडूनच मैत्रीपूर्ण लढत करत मैदानात उतरावेच लागेल या दृष्टीने स्थानिक नेत्यांनी तयारी सुरू केली आहे.

 

SANGLI LOKSABHA : सांगलीत काँग्रेससाठी आर या पारची लढाई

न लढल्यास भविष्यातील निवडणुकांवर परिणाम

काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री स्व. वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला. देशात कुणाचीही सत्ता येऊ दे, पण सांगलीमधून नेहमीच काँग्रेसचाच उमेदवार निवडून यायचा. आणीबाणीनंतर देशभरात काँग्रेसने आपल्या जागा गमावल्या, मात्र अशा अटीतटीच्या परिस्थितीतही गणपतराव गोटखिंडे या काँग्रेसच्या उमेदवाराने सांगलीचा मतदारसंघ राखला होता, वसंतदादा पाटलांनी सांगली जिल्ह्यात सहकाराचा पाया घातला. त्यांनी सांगलीत सहकाराचे जाळे विणून जिल्हा कायम काँग्रेसच्या ताब्यात ठेवला होता. म्हणूनच सांगली लोकसभा मतदारसंघावर वसंतदादादांचा वरचष्मा राहिला. वसंतदादा पाटील यांच्या पश्चात त्यांचे पुत्र प्रकाशबापू पाटील, पुतणे मदनभाऊ पाटील, नातू प्रतिक पाटील यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले.

2014 च्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या या मजबूत किल्ल्याला मोदी लाटेने सुरूंग लागला.

काँग्रेसचा बालेकिल्ला खासदार संजयकाका पाटील यांनी उद्ध्वस्त केला. त्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महापालिकांमध्ये देखील सुरूंग लागला. त्यानंतर काँग्रेसची अधोगती होत गेली. 2019 मध्ये पुन्हा काँग्रेसचे उमेदवार म्हणून दादांचे नातू काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील तयारी करू लागले. त्यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी विकास आघाडी एकत्र झाली. जागा वाटपाची चर्चा झाली. आणि सांगलीत काँग्रेसचा घात झाला. सांगलीची जागा स्वाभिमानी विकास आघाडीला गेली.

काँग्रेस कार्यकर्ते नाराज झाले, पण खचले नाहीत. विशाल पाटील यांनी स्वाभिमानीच्या बॅट चिन्हावर निवडणूक लढवली.

आठ दिवसांत घेतलेल्या या निर्णयावर मतदारांनीदेखील विश्वास ठेवत विशाल पाटील यांच्या झोळीत तीन लाख मते टाकली. या निवडणुकीत विशाल पाटील यांचा दीड लाखांच्या मताधिक्याने पराभव झाला. पण यातून न खचता विशाल पाटील व काँग्रेसने 2024 ची तयारी सुरू केली. प्रथमच जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, नेते आ.विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आले. सांगली लोकसभेसाठी विशाल पाटील यांच्या नावाची शिफारस प्रदेशकडे करण्यात आली. उमेदवारी शंभर टक्के फिक्स असल्याच्या सिग्नल देण्यात आले.

महाविकास आघाडीत घटकपक्ष असलेल्या शिवसेनेने कोल्हापुरच्या बदल्यात सांगलीची जागा मागितली.

आणि शिवसेनेने आठ दिवसात संपूर्ण तयारी सुरू केली, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना पक्षप्रवेश दिला आणि गुरूवारच्या सभेत उध्दव ठाकरे व संजय राऊत यांनी उमेदवारी देखील जाहीर करून टाकली. यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी पसरली. शिवसेनेची मतदारसंघात ताकद नसताना देखील जागेची मागणी झाली आणि उमेदवारी जाहीर झाली. ज्या दादा घराण्यातून राज्यातील उमेदवार ठरविले जात होते. त्या दादांच्या नातवाला उमेदवारीसाठी मुंबई, दिल्लीत प्रयत्न संघर्ष करावा लागत आहे.

आता काँग्रेस व विशाल पाटील यांनी माघार घेता कामा नये.

काँग्रेस नेत्यांचे सूर जुळले आहेत. प्रदेश व केंद्रीय पातळीवरील नेत्यांनी सांगलीची जागा कोणत्याही परिस्थितीत सोडता कामा नये. वेळप्रसंगी मैत्रीपूर्ण लढत नसेल तर अपक्ष म्हणून विशाल पाटील यांना मदत करणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्ह्यातील नेते देखील आता आक्रमक झाले आहेत. विरोधी भाजपमधील काहींनी मदतीची ग्वाही दिली आहे. त्यामुळे विशाल पाटील यांनी आता कच न खाता अपक्ष तर अपक्ष मैदानात उतरणे आवश्यक आहे. आता नाही तर परत कधीच नाही, आर या पार असा नारा देणे आवश्यक आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज