जनप्रवास । सांगली
SANGLI LOKSABHA : सांगलीचा तिढा सोडवा मगच प्रचार समितीच्या बैठकीला उपस्थित राहू : सांगली लोकसभेची जागा लढविण्यास काँग्रेस सक्षम आहे. तरी देखील सांगलीच्या जागेसंदर्भात महाविकास आघाडीत निर्णय घेण्यास विलंब लागत असल्याने आ. विश्वजीत कदम नाराज झाले आहेत. जोपर्यंत सांगलीचा तिढा सुटत नाही तोपर्यंत काँग्रेसच्या राज्य प्रचार समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचा इशारा जिल्हा काँग्रेसचे नेते आ. विश्वजीत कदम यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांना पत्राव्दारे दिला आहे. तर त्यांनी बुधवारच्या बैठकीवर बहिष्कार घातला आहे. आ. कदम यांनी आता सांगलीबाबत आणखी आक्रमक भूमीका घेतली आहे.
SANGLI LOKSABHA : सांगलीचा तिढा सोडवा मगच प्रचार समितीच्या बैठकीला उपस्थित राहू
आ. विश्वजीत कदमांचा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना इशारा
सांगली काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. गेल्यावर्षी झालेली चूक पुन्हा सांगलीच्या बाबतीत होऊ नये म्हणून आ. विश्वजीत कदम गेल्या एक महिन्यापासून सांगलीची जागा काँग्रेसला मिळण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र महाविकास आघाडीच्या जागा वाटपात शिवसेना (उबाठा) व काँग्रेसमध्ये या जागेवरून चढाओढ सुरू आहे. सांगलीच्या जागेचा निर्णय झाला नसताना देखील शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे व नेते संजय राऊत यांनी मिरजेत मेळावा घेऊन चंद्रहार पाटील यांची सांगलीतून उमेदवारी जाहीर केली. शिवसेनेच्या यादीत देखील चंद्रहार पाटील यांचे नाव आले. जागा वाटपाचा निर्णय झाला नसताना देखील शिवसेनेने हा निर्णय घेतल्याने जिल्हा काँग्रेसने नाराजी व्यक्त केली.
आ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. विक्रम सावंत, प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. सांगलीची जागा लढविण्यास काँग्रेस सक्षम असल्याचे सांगितले. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील नेत्या सोनिया गांधी यांच्या कानावर सांगलीच्या जागेसंदर्भातील चर्चा घातली. कोणत्याही परिस्थितीत सांगली सोडायची नाही, असे नेत्यांनी स्पष्ट केले आहे. या जागेसंदर्भात विनिंग मेरिट तपासावे, अशी मागणी देखील काँग्रेसने केली आहे. मात्र शिवसेना माघार घेण्यात तयार नसल्याने काँग्रेसच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
आता जिल्ह्याचे नेते. आ. विश्वजीत कदम आक्रमक झाले आहेत. चर्चेच्या फेर्या सुरू आहेत. तरी देखील महाविकास आघाडीमध्ये सांगलीचा निर्णय होत नसल्याने त्यांनी थेट प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्र पाठवून काँग्रेसच्या राज्य प्रचार समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचा इशारा दिला आहे. जोपयर्ंत सांगलीचा वाद मिटत नाही तोपर्यंत बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
नेमके पत्रात काय म्हटले आहे…
आ. विश्वजीत कदम यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, प्रदेश काँगे्रस कमिटीने दि. 30 मार्चला काँग्रेसच्या राज्य प्रचार समितीच्या सदस्यपदी निवड केल्याचे पत्र मला मिळाले आहे. त्याबद्दल नेत्यांचे आभार. राज्यात लोकसभा निवडणूक ही काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडी म्हणून आपण सर्वजण ताकदीने लढवणारच आहोत. माझी व सांगली जिल्ह्यातील काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांची सांगली लोकसभेच्या जागेबाबतीत असणारी भावना आपण जाणत आहात.
गेल्या काही दिवसांपासून सांगली व राज्यातील इतर काही लोकसभेच्या जागांचा तिढा अद्याप सुटलेला नाही. काँग्रेस पक्ष सांगली लोकसभेची जागा लढवण्यास सक्षम आहे. या भूमीकेवरती मी व सांगली जिल्ह्यातील कार्यकर्ते आजही ठाम आहोत. तसेच अद्याप सांगली लोकसभा जागेबाबतीत काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीने एकत्रितपणे आम्हाला कोणताही निर्णय कळविला नाही. त्यामुळे जोपर्यंत सांगलीचा तिढा सुटत नाही. तोपर्यंत जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता व आमदार म्हणून राज्य प्रचार समितीच्या बैठकीला अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.