संजय राऊत-विश्वजीत कदमांमध्ये जुंपली
जनप्रवास । सांगली
सांगलीच्या ‘वाघा’वरून महाविकास आघाडीत डरकाळ्या : सांगली लोकसभेच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीमध्ये सुरू असलेला वाद प्रचार संपत आला तरी कायम आहे. महाविकास आघाडीच्या प्रचारात सभेत जिल्ह्यातील ‘वाघ’ आम्हीच असल्याचे आ. विश्वजीत कदम यांनी सभेत सांगितले. याला उत्तर शिवसेना (उबाठा) गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी दिले. जिल्ह्याचे वाघ आ. जयंत पाटील आहेत. तर विश्वजीत वाघ आहेत की नाही हे 4 जूनलाच कळेल, अशी टोलेबाजी त्यांनी केली. त्यामुळे महाविकास आघाडीत ‘वाघा’वरून नेत्यांच्या डरकाळ्या सुरू झाल्या आहेत.
सांगलीच्या ‘वाघा’वरून महाविकास आघाडीत डरकाळ्या
सांगली लोकसभेची जागा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याने ही जागा काँग्रेसलाच मिळावी, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हा नेते आ. विश्वजीत कदम यांनी प्रदेश व केंद्रीय पातळीवरील काँग्रेसच्या नेत्यांकडे केली होती. मात्र शिवसेनेचे उध्दव ठाकरे व संजय राऊत यांनी ही जागा शिवसेनेला घेतली आणि चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे महाविकास आघाडीत काँग्रेस व शिवसेना (उबाठा) गटात दोन महिन्यापासून संघर्ष सुरू आहे. तो संघर्ष प्रचार संपत आला तरी कायम दिसत आहे. काही दिवसांपूर्वी आ. विश्वजीत कदम यांनी मेळाव्यातून खा. संजय राऊत यांच्यावर तोफ डागली होती. तर आघाडीचे जेष्ठ नेते, माजी मंत्री शरद पवार यांनी सांगली जागेबाबत नुकताच गौप्यस्फोट केला होता. सांगलीची जागा विनाचर्चा जाहीर झाली. मला टीव्हीवरच कळाले, असे म्हटले होते.
कुस्तीचा फड वेगळा आणि राजकीय फड वेगळा. तिन्ही पक्ष महाविकास आघाडीचा धर्म पाळतील.
त्यातच गुरूवारी महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ शिवसेना (उबाठा) गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शहरात सभा घेतली. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, काँग्रेसचे जिल्हा नेते आ. विश्वजीत कदम यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. यावेळी आ. विश्वजीत कदम म्हणाले, सांगली लोकसभेची जागा काँग्रेसला मिळावी म्हणून आम्ही भांडत होतो. पण, दुर्दैवाने मिळाली नाही. वरिष्ठ नेत्यांनी सांगलीच्या जागेसाठी शेवटपर्यंत आग्रही राहण्यासाठी सांगितले होते. ही जागा आम्हाला मिळेल, असा विश्वास होता. आम्ही सांगलीची जागा हक्काने मागितली होती. कुस्तीचा फड वेगळा आणि राजकीय फड वेगळा. तिन्ही पक्ष महाविकास आघाडीचा धर्म पाळतील.
महाविकास आघाडीचा अनपेक्षित निर्णय आम्ही मान्य केला.
उद्धव ठाकरे तुम्ही देशातील, राज्यातील वाघ आहात. आम्ही देखील सांगलीचे वाघ आहोत, असे आ. कदम यांनी सभेत स्पष्टच सांगून टाकले. मात्र शुक्रवारी आ. संजय राऊत यांनी सांगलीतील पत्रकार बैठकीत आ. विश्वजीत कदम यांच्यावर टोलेबाजी केली. तिरंगी लढत करण्यामागे कुणाचे डावपेच हे नंतर कळेल. स्व. वसंतदादा पाटील हे वाघ आम्ही पाहिले आहेत. आ. विश्वजीत कदम वाघ आहेत की नाहीत हे दि. 4 जूनला कळेल. स्वतःला वाघ सिद्ध करायचे असेल तर चंद्रहार पाटील यांना विजयी केले पाहिजे. दि. 4 जूननंतर त्या वाघाचा आम्ही सत्कार करू असा टोला राऊत यांनी आ. विश्वजीत कदम यांना लगावला. शिवाय जयंत पाटील हे वाघ आहेत ते वाघ आपण जतन केले पाहिजेत, हे देखील राऊत यांनी यावेळी आवर्जून सांगितले. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये पुन्हा जुंपली आहे.
महाविकास आघाडीत जागेपासून ते प्रचार संपूपर्यंत वाद कायम…
महाविकास आघाडीत काँग्रेस व शिवसेना (उबाठा) गटाच्या नेत्यांमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून वाद सुरू आहे. सांगलीची जागा मिळण्यापासून वाद सुरू झाला होता. तो वाद प्रचार संपेपर्यंत मिटला नाही. खा. संजय राऊत यांनी आ. विश्वजीत कदम यांच्यावर दोनवेळा आरोप केले होते. याला आ. विश्वजीत कदम यांनी जोरदार प्रतिहल्ला केला होता. त्यामुळे प्रचार संपत आला तरी खा.राऊत व आ. कदम यांच्यातील वाद मिटलेला दिसत नाही. त्यामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची एकी झाली नाही. अनेकजण अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ असल्याचे चित्र आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.