ईडी, सीबीआय, पोलीस या यंत्रणांचा वापर करून निवडणूक रोख्याच्या माध्यमातून वसुली : जयसिंगपूर : काँग्रेस हे काय आमचे दुश्मन नाही. त्यासाठी मी काही ठिकाणी उमेदवार उभे न करता महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. जयसिंगपूर येथे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डि. सी. पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टिका केली.
ईडी, सीबीआय, पोलीस या यंत्रणांचा वापर करून निवडणूक रोख्याच्या माध्यमातून वसुली
ते म्हणाले, वंचित बहुजन आघाडीने कोल्हापूरात शाहू महाराज आणि सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना पाठिंबा दिला आहे. हातकणंगले लोकसभा मतदार संघात जैन समाजाचे डि. सी. पाटील यांना उमेदवारी देवून सोशल इंजिनिअरिंग यशस्वी केले आहे.
ते पुढे म्हणाले, पंतप्रधान कार्यालय हे वसुली कार्यालय बनले असून ईडी, सीबीआय, पोलीस या यंत्रणांचा वापर करून निवडणूक रोख्याच्या माध्यमातून वसुली केली जाते. करोना काळात बंदी असलेल्या औषध विक्रीला परवानगी देण्यासाठी 18 कोटींची वसुली निवडणूक रोख्यातून केली. अशा मौत का सौदागरच्या हाती पुन्हा देश देण्याची चूक करू नका,
ते पुढे म्हणाले, डि. सी. पाटील यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना सुमारे 500 कोटीची कामे केली आहेत. त्यांना कामाचा मोठा अनुभव आहे. अशा कामाच्या माणसाच्या मागे सर्वजण उभे रहा व त्यांना निवडून आणा.
यावेळी अॅड. आंबेडकर यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले.
ते म्हणाले, करोना काळात जागतिक आरोग्य संघटनेने बंदी घातलेल्या रेमडिसिवयरचे उत्पादन गुजरातमधील कंपनीकडून केले जात होते. 18 कोटी रुपये निवडणूक रोख्यातून मिळाल्यानंतर या औषधाच्या विक्रीला देशात परवानगी देण्यात आली. या औषधाचे दुष्परिणाम म्हणून अनेकांना व्याधी जडल्या. अशा मौत का सौदागरला आपण पुन्हा संधी द्यायची का याचा विचार करण्याची वेळ आली आहे.
पंतप्रधान कार्यालय हे मानवतेचे कार्यालय असायला हवे.
मात्र, या ठिकाणाहून निवडणूक रोख्याच्या माध्यमातून ईडी, सीबीआय, पोलीस या यंत्रणाचा वापर करून खंडण्या गोळा करण्यात येतात. गेल्या दहा वर्षाच्या काळात देशातील 50 कोटींहून अधिक मालमत्ता असलेल्या 17 लाख हिंदू कुटुंबांनी देश सोडला. दहा वर्षांपूर्वी शंभर रुपयापैकी 26 रुपये कर्ज होते, आता ते 84 रुपयावर पोहोचले असून आणखी पाच वर्षांनी 96 रुपयापर्यंत पोहोचेल. अशा स्थितीत देश कसा चालविणार याचा विचार करण्याची हीच वेळ आहे असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.