rajkiyalive

sangli flood news : चांदोलीतून विसर्ग वाढविला, नद्यांच्या पाणीपातळीत पुन्हा वाढ

जनप्रवास । सांगली
sangli flood news : चांदोलीतून विसर्ग वाढविला, नद्यांच्या पाणीपातळीत पुन्हा वाढ : धरण पाणलोट क्षेत्रात बुधवारी पावसाचा जोर वाढला असून चांदोली धरणातील विसर्गात साडेतीन हजाराने वाढ करीत 11 हजार 585 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. कोयना धरण क्षेत्रातही पाऊस सुरुच असल्याने 42 हजार शंभरने सुरु असलेला विसर्ग दुसर्‍या दिवशीही कायम राहिला. दोन्ही धरणातून विसर्ग सुरु असल्याने कृष्णा नदीच्या पाणीपातळी एक फुटाने वाढली, त्यामध्ये आणखी वाढणार असल्याचे पाटबंधारे विभागाच्यावतीने सांगण्यात आलेे. दरम्यान जिल्ह्यात दिवसभर काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली.

sangli flood news : चांदोलीतून विसर्ग वाढविला, नद्यांच्या पाणीपातळीत पुन्हा वाढ

धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला, जिल्ह्यातही पाऊस

जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीचा धोका काहीसा कमी झाल्यानंतर धरण क्षेत्रात पुन्हा जोरदार पाऊस होत आहे. चांदोली धरण क्षेत्रात 73 मि.मी. पाऊस झाला असून धरणातील पाणीसाठा 29.60 टीएमसी झाला आहे, त्यामुळे धरणातून साडेतीन हजाराने विसर्ग वाढवण्यात आला. बुधवारी दुपारपासून धरणातून 11 हजार 585 क्युसेकने विसर्ग सुरु आहे. कोयना धरण क्षेत्रात 92 मि.मी पाऊस झाला असून धरणात 85.97 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणातून 42 हजार शंभर क्युसेकने विसर्ग सुरु आहे.

शिराळा तालुक्यात जोरदार पाऊस होत आहे. वाळवा, मिरज, पलूस, कडेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये दिवसभर पाऊस सुरु राहिला. कृष्णा आणि वारणा नदीकाठावरील पाणीपातळी कमी झाल्याने पुराचा धोका टळला होता. परंतु पुन्हा पाऊस आणि धरणातून विसर्ग वाढविल्याने कृष्णा आणि वारणा नदीच्यापातळीत वाढ होवू लागली आहे. दिवसभरात कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपातळीत एक फुटाने वाढ झाली. त्यामध्ये आणखी काही प्रमाणात वाढ होणार असल्याचे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभागाच्यावतीने देण्यात आला.

नदीकाठावरील पिके अद्यापही पाण्याखाली कायम आहेत. जिल्ह्यातील 24 पूल आणि 12 बंधारे पाण्याखाली कायम आहेत. जिल्ह्यात अद्यापही 25 रस्त्यांवर पाणी असल्याने त्यासाठी पर्यायी मार्गावरुन वाहतूक सुरु आहे.

अलमट्टी धरणातील पाणीसाठा 67.62 टीएमसी झाला असून तीन लाख 23 हजार क्युसेकने पाण्याची आवक होत आहे. सध्या धरणातून 3 लाख 50 हजार क्युसेकने विसर्ग सुरु आहे.

जिल्ह्यात सरासरी 15.9 मि. मी. पाऊस

जिल्ह्यात मंगळवारी 15.9 मि. मी. पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक 53.5 मि.मी. पाऊस झाला. जिल्ह्यात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 8.6 (437.7), जत 1 (273.5), खानापूर-विटा 6.7 (354.2), वाळवा-इस्लामपूर 30.2 (705.9), तासगाव 8.4 (432), शिराळा 53.5 (1104.9), आटपाडी 1.5 (254.1), कवठेमहांकाळ 5.9 (384.2), पलूस 18.4 (489.6), कडेगाव 16.8 (476.3).

नद्यावरील पाणीपातळी फूट इंचांमध्ये पुढीलप्रमाणे आहे. कराड कृष्णा पूल 30.01 फुट, बहे पूल 13.06, ताकारी पूल 42.07, भिलवडी पूल 39.10, आयर्विन 38, अंकली 43.11 आणि राजापूर बंधारा 53.02 फूट

धरणातील पाऊस व पाणीसाठा
धरण पाऊस पाणीसाठा (टीएमसी)
कोयना 92 85.97
चांदोली 73 29.60
धोम 19 11.46
कण्हेर 15 8.02
अलमट्टी — 67.62

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज