जनप्रवास । सांगली
sangli flood news : सांगलीत कृष्णेची पातळी दोन फुटांनी वाढणार : चांदोली, कोयना धरण क्षेत्रासह जिल्ह्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला. कोयना धरणातून शुक्रवारी सकाळी 52 हजार शंभर क्युसेकने विसर्ग सुरु करण्यात आला. यामुळे शनिवारी कृष्णा नदीची पाणीपातळी दोन ते तीन फुटापर्यंत वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील कृष्णा, वारणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. नद्यांची पाणीपातळी वाढत असल्याने पुराची धोका कायम आहे.
sangli flood news : सांगलीत कृष्णेची पातळी दोन फुटांनी वाढणार
दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढत असताना धरण पाणलोट क्षेत्रात पुन्हा अतिवृष्टी होत आहे. जिल्ह्यातही संततधार पाऊस सुरु असल्याने दैनंदिन जनजीवन विस्कळित झाले. कृष्णा नदीची आयर्विन पूल येथील पाणी पातळी शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता 39 फूट 9 इंच आहे. शुक्रवारी सकाळी 9 वाजल्यापासून कोयना धरणातून 10 हजार क्युसेक्स विसर्ग वाढविला आहे. म्हणजे कोयनेतून 52 हजार 100 क्युसेकने विसर्ग सुरु आहे. भारतीय हवामान खात्याने सातारा जिल्ह्याकरिता रेड व आँरेज अलर्ट दिला आहे. त्यामुळे सध्या नदीची पाणी पातळी कमी होत असली तरी धरण व मुक्त पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस सुरू आहे.
कोयना व इतर धरणात पाण्याची आवक वाढत असल्याने विसर्ग वाढविण्यात आला आहे. कृष्णा नदीच्या पाणीपातळीत शनिवारी दोन ते तीन फुटांनी वाढ होण्याची शक्यता आहे, असे पाटबंधारे विभागाच्यावतीने सांगितले. वारणा धरण क्षेत्रातही संततधार पाऊस सुरुच आहे. शिराळा तालुक्यातही पावसाचा जोर कायम असल्यामुळे वारणा नदी दुथडी भरुन वाहत आहे. पाऊस आणि धरणातील विसर्ग लक्षात घेतल्यास वारणा, कृष्णा नदी काठच्या गावांना पूराचा धोका कायम आहे. सांगली, मिरज शहरासह जिल्ह्यातील पाच हजार 145 लोकांचे आणि पाच हजार 514 जनावरांचे स्थलांतर केले आहे.
जिल्ह्यात सरासरी 8.6 मिलीमीटर पाऊस
शुक्रवारी सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी 8.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक 31.2 मिलीमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात दि. 2 ऑगस्ट रोजी पडलेला पाऊस व कंसात 1 जूनपासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी.मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 2.6 (447), जत 1.5 (275.3), खानापूर 7.3 (362.2), वाळवा 13.9 (721.8), तासगाव 5.3 (446.6), शिराळा 31.2 (1156), आटपाडी 4.6 (258.7), कवठेमहांकाळ 2.3 (386.9), पलूस 10.9 (502.8), कडेगाव 8.5 (487).
कृष्णा नदीवरील पुलांची पाणीपातळी फूट इंचामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा पूल कराड 26.05, बहे पूल 12.07, ताकारी पूल 43, भिलवडी पूल 42.01, आयर्विन 39.09, राजापूर बंधारा 53 फूट
धरणातील पाऊस व पाणीसाठा
धरण पाऊस पाणीसाठा (टीएमसी)
कोयना 96 86.78
चांदोली 95 29.61
धोम 321 11.52
कण्हेर 38 8.02
अलमट्टी — 67.83
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.