जनप्रवास । प्रतिनिधी
sangli flood news : 14 दिवस पुराचा मुक्काम : शहराची गणिते बिघडली : कोेयना व चांदोली धरण पाणलोट क्षेत्रातील अतिवृष्टी व धरणातून होत असलेल्या विसर्गामुळे कृष्णा व वारणा नदीच्या पाणी पात्रात वाढ झाली आणि सांगली शहराला पुराचा विळखा बसला. गेल्या 14 दिवसांपासून सांगली शहरातील उपनगरे पाण्याखाली आहेत. दोन हजाराहून नागरिकांचे स्थलांतर केले आहे. शिवाय कर्नाळ रस्ता व जुना बुधगाव रस्ता देखील पाण्याखालीच आहे. त्यामुळे शहराची गणिते बिघडली आहेत. तर पूरपट्ट्यातील नागरिकांवर आर्थिक संकट आले आहे.
sangli flood news : 14 दिवस पुराचा मुक्काम : शहराची गणिते बिघडली
सांगली शहरावर 2005, 2019 व 2021 मध्ये महापुराची आपत्ती आली. यामध्ये नागरिक, व्यवसायिक व व्यापार्यांचे प्रचंड नुकसान झाले. यावर्षी पुराची पातळी 40.5 फुटाच्या आसपासच आहे. त्यामुळे नुकसान कमी आहे. पण पूर अडीच हजार लोकांना चांगलाच जाणवू लागला आहे. शहरातील सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट, आरवाडे प्लॉट, पटवर्धन पार्क, गोवर्धन प्लॉट, साईनाथ नगर, मगरमच्छ कॉलनी, कर्नाळ रोड, जगदंब कॉलनी, पंत लाईन, काकानगर, दत्तनगर, शिवशंभो चौक, जामवाडी, हिंदवी स्वराज्य कॉलनी या परिसरातील अडीच हजार लोकांचे स्थलांतर झाले आहे. ज्यांचे कुटुंब मोलमजुरीवर आहे. त्यांना याचा त्रास होऊ लागला आहे. त्यांची आर्थिक गणिते बिघडली आहेत.
सांगली शहरात दि. 22 जुलैला पूर येण्यास सुरूवात झाली. आयर्विन पुलाच्या पाण्याची पातळी 27.4 फूट झाली होती.
धरण परिसरातील पाऊसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत गेली. पूरपट्ट्यातील लोकांना स्थलांतराच्या सूचना देखील महापालिकेच्यावतीने देण्यात आल्या. दि. 24 जुलैला पातळी 29.4 फुटावर पोहचली. सूर्यवंशी प्लॉटमधील काही घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे या भागातील पाच-सहा कुटुंबांना स्थलांतरीत करण्यात आले. दि. 25 जुलैला पुन्हा कृष्णेची पातळी 35 फुटांवर गेली. कर्नाळ रोड पाण्याखाली गेला, शहरात येण्यासाठी हा रस्ता महत्वाचा होता. मात्र रस्ता बंद झाल्याने या रस्त्यावरील वाहतूक शहराबाहेरून वळविण्यात आली.
दि. 26 जुलैला पाणी पातळी 39.3 फुटांवर पोहचली. तर दि. 27 जुलैला सांगलीची पाणी पातळी ही 40 फूट 5 इंच झाली.
जुना बुधगाव रस्ता देखील पाण्याखाली गेला. दोन हजाराहून अधिक नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. परत पाण्याच्या पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता होती. मात्र निसर्गाने साथ दिली आणि पाऊस कमी झाला. त्यामुळे पाणी पातळी न वाढता हळूहळू कमी होऊ लागली. दि. 29 जुलैला पाणी पातळी फुटाने कमी होऊन 39.5 फुटावर पोहचली. तर दि. 30 जुलैला पुन्हा पाणी पातळीत घट झाली. नागरिक परतण्याच्या तयारीत होते. मनपा प्रशासनाने देखील पूर कमी झालेल्या भागात स्वच्छता मोहिम सुरू केली होती.
पण दि. 31 जुलैला पुन्हा धरणातील विसर्ग वाढवून 52 हजार क्युसेक करण्यात आला.
त्यामुळे शहरातील पाणी पातळी 38.2 फुटावरून 39.1 फुटावर पोहचली. पुन्हा पुराचा धोका निर्माण झाला. दि. 1 ऑगस्टला पाणी पातळी पुन्हा 40.6 इंच झाली. आता चार दिवसात पाणी पातळीत एक फुटाने उतरली आहे. पण सध्या स्थलांतरीत असलेले अडीच हजार नागरिक स्थलांतरीत कायम आहेत. काही जण पै-पाहुण्यांकडे गेले आहेत. तर काहीजण मनपाच्या निवारा केंद्रामध्ये स्थलांतरीत झाले आहेत. तर जुना बुधगाव रस्ता व कर्नाळ रस्ता हे अद्याप पाण्याखालीच आहे. त्यामुळे अनेकांचे हाल सुरू आहे.
पूरग्रस्त आर्थिक अडचणीत; मुलांच्या शाळा बंद
गेल्या 14 दिवसांपासून शहरातील नदी काठच्या उपनगरामध्ये पुराचे पाणी कायम आहे. त्यामुळे या परिसरातील कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे. अनेक कुटुंबे मनपाच्या निवारा केंद्रात तर अनेक कुटुंबांनी पाहुण्यांचा आधार घेतला आहे. पण या भागातील नागरिकांचे हातावरचे पोट आहे. 15 दिवस काम बंद असल्याने आर्थिक अडचण कशी दूर करायची? हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. शिवाय लहान मुलांच्या शाळेचा प्रश्न देखील गंभीर बनत चालला आहे. या बालकांची शाळा गेल्या 14 दिवसांपासून बंदच आहे.
सांगली शहरातील पाणी पातळीवर एक नजर
* दि. 22 जुलै- 27.4 फूट
* दि. 24 जुलै- 29.4 फूट
* दि. 25 जुलै- 35 फूट
* दि. 26 जुलै- 39 फूट
* दि. 27 जुलै- 40.5 फूट
* दि. 29 जुलै- 39.5 फूट
* दि. 30 जुलै- 38.2 फूट
* दि. 1 ऑगस्ट- 40.6 फूट
* दि. 2 ऑगस्ट- 40 फूट
* दि. 4 ऑगस्ट- 39 फूट
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











