काँग्रेसच्या दोन्ही इच्छुकांकडून ताकदीने तयारी, वरिष्ट नेत्यांची कसोटी
जनप्रवास । अनिल कदम
sangli vidhansabha 2024 : पृथ्वीराज, जयश्रीताई पाटलांच्या रस्सीखेचात मतविभागणीचा धोका : विधानसभा निवडणुका अवघ्या दोन महिन्यांवर आल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. सांगली विधानसभेसाठी काँग्रेसमध्ये चांगलीच स्पर्धा निर्माण झाली आहे. काँग्रेसमध्ये शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांनी जोरदार आणि ताकदीने तयारी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आलेल्या पुराच्या काळात दोघांनीही काम करुन मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसच्या दोन्ही रस्सीखेच असल्याने मतविभागणीचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे, या पार्श्वभूमीवर पक्षाचे वरिष्ट नेत्यांसह खासदार विशाल पाटील आणि माजी मंत्री आ. डॉ. विश्वजीत कदम कोणता तोडगा काढणार हे पहावे लागणार आहे.
sangli vidhansabha 2024 : पृथ्वीराज, जयश्रीताई पाटलांच्या रस्सीखेचात मतविभागणीचा धोका
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर जिल्ह्यातील काँग्रेस सुसाट आहे. सांगली लोकसभा सलग दहा वर्षे भाजपकडे राहिल्यानंतर काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी काँग्रेसचा परंपरागत असलेला बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेतला. लोकसभा निवडणुकीत यश मिळाल्याने काँग्रेसमध्ये उर्जितावस्था निर्माण झाली आहे. लोकसभेनंतर विधानसभा निवडणुका ऑक्टोबर महिन्यात होत आहेत. या निवडणुकींना अवघे दोनच महिने शिल्लक राहिल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकीची तयारी केली जात आहे. काँग्रेस लोकसभेला अधिक मजबुतीने एकजुट झालेली दिसली. आता हेच वारे विधानसभेला कायम रहावे, असा प्रयत्न वरिष्टांचा आहे. निवडणुकीचे वातावरण तापू लागल्याने काँग्रेसमध्ये विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरुन चुरस निर्माण झाल्याचे पहायला मिळत आहे.
काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी 2019 मध्ये पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती.
त्यामध्ये अवघ्या त्यांना साडेसहा हजाराच्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला लागला होता. मात्र पराभवानंतरही जिल्हाध्यक्ष पाटील हे अॅक्टिव्ह राहिले. लोकसभेचा गुलाल लागताच पाटील यांनी अचूक टायमिंग साधत काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी ‘डिनर पार्टी’ आयोजित करून विधानसभा लढवणार असल्याचे स्पष्ट केले. पाटील यांनी वेळोवेळी सत्ताधारी महायुतीच्या धोरणाविरोधात आंदोलने मोर्चे काढून निषेध करीत चर्चेत राहिले. अयोध्येतील राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्यावेळी सांगलीत अयोध्येची प्रतिकृती उभारून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले होते. याशिवाय पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात सक्रिय असल्याचे यापूर्वीही दिसून आले आहे.
माजी मंत्री स्वर्गीय मदन पाटील यांच्या पत्नी जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांनीही अचानकपणे विधानसभा निवडणुकीत उडी मारण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.
जयश्रीताई यांनी लोकसभा निवडणुकीत बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांचा उघडपणे प्रचार केला होता. विधानसभा मतदारसंघात त्यांनी सभा-बैठका देखील घेतल्या. त्यांच्याबरोबर मदनभाऊ युवा मंचचे कार्यकर्ते देखील होते. त्यामुळे मदनभाऊ प्रेमींनी जयश्रीताई विधानसभेच्या मैदानात, भावी आमदार अशा पोस्ट देखील सोशल मिडियावर शेअर केल्या होत्या. आषाढी एकादशीला अडीचशेहून अधिक नागरिकांना पंढरपूर दर्शन घडविले.
जुलैअखेर आणि ऑगष्टच्या सुरुवातीस जिल्ह्यात आलेल्या पुराच्या काळात काँग्रेस नेत्यांनी जोमात काम केले.
सांगली शहरातील स्थलांतरांना जेवण, राहण्याची सुविधा पुरवण्यासह त्यांच्या आरोग्याची काळजीही घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. पूर आलेल्या भागाला वेळोवेळी भेट देवून स्थलांतरित झालेल्या पूरग्रस्तांना आधार देण्याचा प्रयत्न पृथ्वीराज पाटील आणि जयश्रीताई पाटील या दोघांकडून करण्यात आला. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडून आता माघार नसल्याची जोर धरला आहे.
सांगली विधानसभा मतदारसंघात पृथ्वीराज व जयश्रीताई पाटील यांच्यात असल्याचे उमेदवारीवरून रस्सीखेच सुरु आहे.
काँग्रेसमध्ये दोन्ही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिल्यास मतविभागणीचा धोका आहे, त्याचा फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वरिष्ट नेत्यांसह खासदार विशाल पाटील आणि माजी मंत्री आ. डॉ. विश्वजीत कदम कोणता मार्ग काढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मिरज शिवसेनेला सुटल्यास तिकीट कुणाला?
महाविकास आघाडीत मिरज विधानसभा मतदारसंघ उद्धव ठाकरे शिवसेनेला सुटण्याची शक्यता आहे. महायुतीकडून भाजपचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांना उमेदवारी मिळणार असल्याचे अटळ आहे. सध्या सेनेकडून प्रा. सिद्धार्थ जाधव हे इच्छुक आहेत. परंतु मंत्री खाडे यांच्याविरोधात जाधव यांचा टिकाव लागणार का? याची चर्चा आहे, त्यामुळे पालकमंत्र्यांचे माजी स्वीय सहाय्यक मोहन व्हनखंडे यांनाही ऐनवेळी सेनेची उमेदवारी मिळू शकते. याशिवाय महाविकास आघाडी शरदचंद्र पवार राष्ट्रवादीनेही दावा सांगितला आहे, त्यांच्याकडून जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.