rajkiyalive

miraj vidhansabha 2024 : पालकमंत्री सुरेश खाडेंना मोहन वनखंडे देणार आव्हान, काँग्रेसची उमेदवारी निश्चित, लवकरच पक्षप्रवेश?

जनप्रवास । सांगली
पालकमंत्री सुरेश खाडेंना मोहन वनखंडे देणार आव्हान, काँग्रेसची उमेदवारी निश्चित, लवकरच पक्षप्रवेश? : राज्याचे कामगारमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सुरू केला आहे. त्यांच्या विरोधात त्यांचे एकेकाळचे स्वीय सहायक प्रा. मोहन वनखंडे यांनी आव्हान दिले आहे. त्यांना काँग्रेस पक्षात घेण्यासाठी आ. विश्वजीत कदम व खा. विशाल पाटील यांनी फासे टाकले आहेत. त्यांची उमेदवारी देखील निश्चित झाली असून ते या आठवड्यात काँग्रेस प्रवेश करतील, असे वृत्त आहे. त्यामुळे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या अडचणीत आता वाढ होणार आहे.

पालकमंत्री सुरेश खाडेंना मोहन वनखंडे देणार आव्हान, काँग्रेसची उमेदवारी निश्चित, लवकरच पक्षप्रवेश?

मिरज विधानसभा मतदारसंघ 2009 च्या निवडणुकीपासून राखीव झाला आहे. तेव्हापासून या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व पालकमंत्री सुरेश खाडे करत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात विशेषत: काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणार्‍या सांगली जिल्ह्यात त्यांनी 2005 मध्ये जत मतदारसंघात पहिल्यांदा विजय मिळवून भाजपचे कमळ फुलविले होते. यानंतर जत मतदारसंघ सर्वसाधारण होताच मिरजेत येऊन आपले राजकीय बस्तान बसविले. यानंतर सलग तीन निवडणुका त्यांनी जिंकल्या. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता गेली. महायुतीचे सरकार स्थापन झाले. या सरकारच्या मंत्रीमंडळात त्यांना पहिल्या टप्प्यात संधी मिळाली. जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून गेली दोन वर्षे ते काम करत आहेत.

जिल्हा नियोजन समिती, ग्रामीण विकास निधी व आमदार फंडाच्या माध्यमातून त्यांनी मिरज विधानसभा मतदारसंघात कोट्यावधी रूपयांची कामे केली असल्याचा दावा त्यांनी व त्यांच्या समर्थकांनी केला आहे. त्यामुळे मातब्बर उमेदवाराला आव्हान देण्यासाठी महाविकास आघाडीकडून गेल्या दोन महिन्यापासून प्रयत्न सुरू झाले आहेत. प्रा. मोहन वनखंडे यावेळी विधानसभेसाठी इच्छूक आहेत. त्यांनी भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी देखील मागितली आहे. पण पालकमंत्री सुरेश खाडे यांची उमेदवारी निश्चित झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे वनखंडे काय करतील? असा प्रश्न उपस्थित होत होता.

कॉँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व शिवसेना उबाठा गटाकडून अनेक उमेदवार इच्छूक आहेत.

पण त्यांची ताकद मर्यादीत असल्याने ना. खाडे यांच्याविरोधात विजयापर्यंत पोहचणे अशक्य वाटत आहे. त्यामुळे या तिन्ही पक्षांनी देखील पालकमंत्री सुरेश खाडे यांचे एकेकाळचे स्वीय सहाय्यक प्रा. मोहन वनखंडे यांच्यावर गळ टाकला आहे. काँग्रेसचे नेते आ. विश्वजीत कदम व खा. विशाल पाटील यांच्याबरोबर प्रा. वनखंडे यांच्या बैठका झाल्याचे देखील बोलले जात आहे. त्यांचा पक्षप्रवेशाचा मुहूर्त अद्याप ठरला नाही. पण त्यांचे समर्थक काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश होईल, असे बोलत आहेत. आठवडाभरात पक्ष प्रवेश देखील होण्याची शक्यता आहे.

प्रा. मोहन वनखंडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास महाविकास आघाडीची उमेदवारी त्यांना मिळेल.

त्यामुळे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्यासमोर एक चांगले आव्हान असणार आहेत. यापूर्वीच्या अनेक निवडणुकीत ना. खाडे यांच्या खांद्याला खांदा लावून वनखंडे सहभागी झाले होते. मात्र प्रथमच या निवडणुकीत हे दोघे आमने-सामने असतील, अशी शक्यता आहे. ना. सुरेश खाडे यांची अडचण करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडून सुरू आहे. या निवडणुकीत ते हा चक्रव्यूह कसा भेदतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाविकास आघाडीचे माजी नगरसेवक आले एकत्र…

गेल्या काही दिवसांपासून निधी देण्याच्या बहाण्याने काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी नगरसेवक पालकमंत्र्यांच्या बैठकीला गेले होते. त्यावेळी या दोन्ही पक्षाच्या माजी नगरसेवकांनी पालकमंत्र्यांना निवडणुकीसाठी जाहीर पाठिंबा दिल्याचे वृत्त आले. पण या वृत्ताचा काँग्रेस व शरद पवार गटाने इन्कार केला. या पार्श्वभूमीवर रविवारी मिरज शहरातील काँग्रेसच्या सुमारे 25 ते 30 माजी नगरसेवकांची रविवारी बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेसच्या उमेदवारीवर चर्चा झाली. अनेकांनी प्रा. मोहन वनखंडे यांच्या नावाला पसंती दिल्याचे वृत्त आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज