‘असर‘चा अहवाल प्राप्त, जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा बोजवारा
sangli zp news : सांगली जिल्ह्यात 42 टक्के विद्यार्थ्यांना वाचता येईना : ग्रामीण शिक्षणाचे वास्तव मांडणारा अॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट (असर) जाहीर झाला आहे. जिल्ह्यात तिसरी ते पाचवीच्या 42 टक्के तर इयत्ता आठवीतल्या 32 टक्के विद्यार्थ्यांना दुसर्या इयत्तेतील उतारा वाचणेही जमत नसल्याचे वस्तुस्थिती समोर आली आहे.
sangli zp news : सांगली जिल्ह्यात 42 टक्के विद्यार्थ्यांना वाचता येईना
त्याशिवाय पाचवी ते आठवीतील 32 टक्के विद्यार्थ्यांना वजाबाकी व भागाकार ही आकडेमोड करता येत नसल्याची माहिती अहवालात समोर आली आहे. मॉडेल स्कूल आणि सरकारी शाळांमध्ये भौतिक सुविधांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात असताना शिक्षणाच्या गुणवत्तेत सांगली जिल्हा पिछाडीवर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
असरच्या माध्यमातून 5 ते 16 वर्षे वयोगटातील मुलांच्या मूलभूत वाचन आणि गणित कौशल्यांवरील सांख्यिकीय माहिती घेतली.
शाळा तसेच 14 ते 16 वर्षे वयोगटातील मोठ्या मुलांना त्यांच्याकडे असलेली डिजिटल उपलब्धता आणि वापराबद्दल प्रश्न विचारले गेले आणि त्यांच्या डिजिटल क्षमतांचे मूल्यांकन करण्यासाठी स्मार्टफोन आधारित प्रश्न विचारुन अहवाल केला असल्याचे असरने म्हटले आहे. असरच्या अहवालातून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शिक्षणाची स्थितीही समोर आली आहे.
सांगली जिल्ह्यात पूर्व प्राथमिक शाळेमध्ये नोंदणी असणार्या 6 ते 14 वर्षांच्या मुलांचे प्रमाण 65.9 टक्के आहे.
वय वर्ष 6 ते 9 वयोगटातील तिसरी ते पाचवी या वर्गातील विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यामध्ये 68 टक्के विद्यार्थ्यांना वाचता येते तर 32 टक्के विद्यार्थ्यांना वाचता येत नाही. कमीत कमी वजाबाकी करणार्यांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रमाण 58.1 टक्के आहे, सुमारे 42 टक्के विद्यार्थ्यांना वजाबाकी येत नसल्याचे स्पष्ट झाले.
पाचवी ते आठवी वर्गातील 11 ते 14 वर्षे वयोगटातील 32 टक्के विद्यार्थ्यांना मराठी भाषेतील इयत्ता दुसरीच्या पुस्तकातील धडा वाचता येत नसल्याचे समोर आले. वाचता येणार्या विद्यार्थ्यांचे प्रमाण 68 टक्के आहे. या वयोगटातील 68 टक्के विद्यार्थी तीन ते एक अंकापर्यंतच्या प्रश्नांचे उत्तर देऊ शकले नाहीत. केवळ 32 टक्के विद्यार्थ्यांनी बरोबर उत्तरे दिली. मुलांच्या तुलनेत मुली आपल्या क्षेत्रीय भाषेतील इयत्ता दुसरीचा धडा चांगल्या पद्धतीने वाचत असल्याचे दिसून आले.
जिल्ह्यातील मागील चार वर्षापासून मॉडेल स्कूलच्या माध्यमातून सरकारी शाळांमध्ये भौतिक सुविधा आणि गुणवत्तेसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. काही शाळांची गुणवत्ता चांगली असली तरी बहुतांशी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची कामगिरी निराशाजनकच असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या कारभाराचा बोजवारा उडाल्याचे स्पष्ट झाले.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.