sangli district gharkul news : जिल्ह्यातील एक हजार लाभार्थ्यांना नको आहे घरकूल पंधरा हजाराचा हप्ता वसूल होणार: प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 1 हजार 68 लाभार्थ्यांनी घर बांधण्यास असमर्थता दर्शविली आहे. त्यातील अनेकांनी 15 हजार रुपयांचा पहिला हप्ताही घेतला आहे. घरकुल बांधले जाणार नसल्याने वसुली करण्यासाठी पाऊले उचलली जाणार असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.
sangli district gharkul news : जिल्ह्यातील एक हजार लाभार्थ्यांना नको आहे घरकूल पंधरा हजाराचा हप्ता वसूल होणार
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत जिल्ह्यात 2017 ते 2022 या कालावधीत 20 हजार 400 घरकुले मंजूर झाली आहेत. त्यापैकी 18 हजार 878 घरे बांधून पूर्ण झाली आहेत. 1 हजार 522 घरे अद्याप अपूर्ण आहेत. ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका नंदिनी घाणेकर यांनी सांगितले की, या अपूर्ण घरकुलांपैकी 120 घरकुले प्रगतीपथावर आहेत. उर्वरित 1 हजार 402 अपूर्ण घरांच्या पुर्ततेमध्ये विविध प्रकारच्या अडचणी आल्या आहेत. 33 लाभार्थ्यांच्या घरकुलांमध्ये जागेचा वाद सुरु आहे. 52 घरकुलांच्या जागांबाबत अतिक्रमणाच्या तक्रारी असून त्यांचे वाद न्यायालयात निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत.
ज्या गावात घरकुल मंजूर करुन घेतले, तेथून 57 लाभार्थ्यांनी अन्यत्र स्थलांतर केले आहे. 192 लाभार्थ्यांनी घरकूल नको असल्याचे सांगितले असून घेतलेले अनुदान परत करण्याची तयारी दर्शविली आहे. उर्वरित 1 हजार 68 लाभार्थी घरकूल बांधतही नाहीत आणि अनुदानही परत करण्यास तयार नाहीत. त्यांच्याबाबत शासकीय आदेशानुसार कार्यवाही केली जाणार आहे.
प्रधानमंत्री आवास लाभार्थ्यांना पहिला हप्ता म्हणून 15 हजार रुपये दिले जातात. हा हप्ता घेतलेल्या लाभार्थ्यांपैकी 1 हजार 68 लाभार्थी घर बांधण्यास तयार नाही, तसेच अनुदानही परत करत नाही. त्यांच्याकडे सुमारे 1 कोटी 60 लाख 20 हजार रुपये अडकले आहेत. ते घर बांदणार नसतील, तर त्यांना हे अनुदान शासनाकडे जमा करावे लागेल.
शासन आदेशानंतर कारवाई ः नंदिनी घाणेकर
घरकुल बांधण्यास असमर्थ असलेल्या लाभार्थ्यांची माहिती आम्ही शासनाला कळविली आहे. सध्यस्थितीला 1 हजार 68 लाभार्थी घरकुल बांधण्यास तयार नाहीत, शिवाय अनुदानही परत करत नाहीत. शासनाच्या आदेशांनुसार याबाबत पुढील कार्यवाही केली जाईल, असे ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका नंदिनी घाणेकर यांनी सांगितले.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











