sangli mahapalika news :सांगली महापालिकेसाठी भाजपकडून 31 उमेदवार निश्चित : जयश्रीताई गटाच्या सात जणांचा समावेश

SHARE:

sangli mahapalika news :सांगली महापालिकेसाठी भाजपकडून 31 उमेदवार निश्चित : जयश्रीताई गटाच्या सात जणांचा समावेश: महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप पक्षाने 2018 मधील माजी नगरसेवकांचे मेरीट कार्ड काढले आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी देखील तसे जाहीर केले. त्यामुळे पहिल्या टप्प्यात भाजपने 31 उमेदवारांची यादी तयार केली आहे. त्यामध्ये 7 उमेदवार हे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील गटाचे आहेत. उर्वरित जागांसाठी भाजपच्या कार्यकर्त्यांना व महायुतीतील घटक पक्षाला संधी मिळणार आहे.

sangli mahapalika news :सांगली महापालिकेसाठी भाजपकडून 31 उमेदवार निश्चित : जयश्रीताई गटाच्या सात जणांचा समावेश

आरक्षणानंतर होणार फैसला; पण कुटुंबात उमेदवारी राहणार

भाजपच्या काही माजी नगरसेवकांबद्दल पक्षात नाराजी आहे. त्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. पण याचा अंतिम फैसला हा आरक्षण निश्चिती व महायुती झाल्यानंतरच होणार आहे.

महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी डिसेंबर महिन्यात सुरू होणार आहे. पक्षीय पातळीवर प्रचंड उलथापालथ झाल्याने यावर्षीच्या निवडणुकीत चांगलीच रंगत असणार आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, शिवसेना उबाठा व शिंदे सेनेची तयारी सुरू झाली आहे. महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना जाहीर झाली आहे. महापौरपदाचे आरक्षण काही दिवसात जाहीर होईल. त्यानंतर प्रभागनिहाय उमेदवारांसाठी आरक्षण निश्चित केले जाणार आहे. त्यामुळे खर्‍या अर्थाने निवडणुकीत रंग भरणार आहे. पण सध्या भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. इनकमिंग मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील व माजी शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचा भाजप प्रवेश करून काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. त्यांच्याबरोबर काही माजी नगरसेवक, पदाधिकारी देखील भाजपमध्ये आलेले आहेत. त्यामुळे 2018 च्या माजी नगरसेवकांना उमेदवारी मिळणार की भाजपच्या गेल्यावर्षी निवडणूक लढविलेल्या निष्ठावंतांना संधी मिळणार? याकडे लक्ष लागले होते. पण भाजप पक्षाने 2018 च्या निवडणुकीमधील भाजपमधील माजी नगरसेवक व इतर पक्षातून भाजपमध्ये आलेल्या माजी नगरसेवकांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. तशी घोषणा देखील पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी केली आहे. त्यामुळे माजी नगरसेवकांमध्ये फिलगुड आहे. पण भाजपने काही माजी नगरसेवकांना डच्चू देण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामध्ये पाच वर्षात जनतेशी संपर्क नसणे, 2021 मध्ये झालेल्या महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीत फुटीर नगरसेवकांना डच्चू देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात भाजपने शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, संदीप आवटी, निरंजन आवटी, पांडुरंग कोरे, संगीता खोत, गणेश माळी, सोनाली सागरे, राजेंद्र कुंभार, जगन्नाथ ठोकळे, अनारकली कुरणे, धीरज सूर्यवंशी, अजिंक्य पाटील, गजानन आलदर, भारती दिगडे, स्वाती शिंदे, सुनंदा राऊत, गीता सुतार, लक्ष्मण नवलाई, गीतांजली ढोपे-पाटील, विनायक सिंहासने, सविता मदने यांची उमेदवारी अंतिम केल्याची चर्चा आहे. तर जयश्रीताई पाटील गटातून सात तर काँग्रेसकडून भाजपमध्ये आलेले दोन, राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या एकाला पुन्हा संधी मिळणार आहे.

पण आरक्षणाचा कौल कसा होणार? यावर उमेदवारी असणार आहे. माजी नगरसेवकांना संधी देण्याचा निर्णय भाजपमध्ये झाल्यास अनेक भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारीपासून वंचित राहावे लागणार आहे. त्यामध्ये अनेक भाजपचे पदाधिकारी देखील असणार आहेत. पण याचा अंतिम निर्णय हा आरक्षण निश्चित झाल्याशिवाय होऊ शकत नाही. तसेच भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी झाल्यास मिरजेतील काही जागांवर तडजोड करावी लागणार आहे. त्यामुळे वॉर्डनिहाय आरक्षण सोडतीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. अनेकांचे राजकीय भवितव्य देखील आरक्षण सोडतीकडे असणार आहे.

भाजप पक्षप्रवेश केलेल्या 10 जणांना मिळणार संधी

भाजपमध्ये इतर पक्षातून आलेल्या दहा जणांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये जयश्रीताई पाटील गटाच्या पद्मश्री पाटील अथवा प्रशांत पाटील (वॉर्ड क्र.1), गजानन मगदूम (वॉर्ड क्र.2), संतोष पाटील, रोहिणी पाटील (वॉर्ड क्र.9), प्रकाश मुळके (वॉर्ड क्र.10), कांचन कांबळे (वॉर्ड क्र.11), उत्तम साखळकर (वॉर्ड क्र.16) तर काँग्रेसमधून भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेले मनोज सरगर व शुभांगी साळुंखे यांना (वॉर्ड क्र.11) तर राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले योगेंद्र थोरात यांना (वॉर्ड क्र.20) मधून संधी मिळण्याची शक्यता आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *