vita congress news : भाळवणी गटातून जितेश कदम यांच्या उमेदवारीची मागणी

SHARE:

vita congress news : भाळवणी गटातून जितेश कदम यांच्या उमेदवारीची मागणी : जिल्हा परिषदेच्या भाळवणी गटातून डॉ. जितेश कदम यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी विट्यात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात करण्यात आली. आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने तयारी जोरात सुरू केली असून, भाळवणी जिल्हा परिषद गट हा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याने या गटातील निवडणूक काँग्रेस पक्ष ताकदीने लढवणार आहे, असे प्रतिपादन युवा नेते अ‍ॅड. विठ्ठलराव साळुंखे यांनी केले.

vita congress news : भाळवणी गटातून जितेश कदम यांच्या उमेदवारीची मागणी

विटा येथे भाळवणी जिल्हा परिषद गटातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्यास गटातील सर्व तालुका, गाव पातळीवरील कार्यकर्त्यांचा मोठा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

यावेळी बोलताना अ‍ॅड. विठ्ठलराव साळुंखे म्हणाले की, भाळवणी गट हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे आणि तो आजही तितक्याच ठामपणे काँग्रेसच्या विचारांशी निष्ठावान आहे. येणार्‍या निवडणुकीत काँग्रेसचा झेंडा पुन्हा एकदा फडकवायचा आहे आणि यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने तन, मन आणि धनाने तयारीला लागले पाहिजे. आपल्याकडे विचारधारा, कार्यकर्त्यांचे संघटन आणि नेतृत्व यांची मजबूत त्रिसूत्री आहे, त्यामुळे या वेळी काँग्रेसला कुणी थांबवू शकत नाही.

ते पुढे म्हणाले की, भाळवणी जिल्हा परिषद गटात डॉ. जितेश कदम यांची उमेदवारी जाहीर करण्यात यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून एकमुखाने होत आहे. स्व. पतंगराव कदम व वनश्री आमदार मोहनराव कदम यांनी खानापूर तालुक्यात विकासाची गंगा आणली. त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सहकारक्षेत्रातील योगदानामुळे तालुका प्रगतीपथावर आला.

आता त्या विकासाच्या परंपरेला पुढे नेण्याची जबाबदारी त्यांच्या कुटुंबातील पुढच्या पिढीवर आहे आणि ती जबाबदारी डॉ. जितेश कदम सक्षमपणे पार पाडतील, असा विश्वास सर्वांना आहे. डॉ. जितेश कदम हे तरुण, शिक्षित आणि लोकाभिमुख नेतृत्व आहे. त्यांच्या विचारांमध्ये विकास, पारदर्शकता आणि जनतेशी थेट संवाद आहे. त्यांनी आतापर्यंत विविध सामाजिक

उपक्रमांतून गावागावात लोकसेवेचे कार्य केले आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे भाळवणी गटात विकासाला नवी गती मिळणार आहे. ते पुढे म्हणाले की, लवकरच विटा येथे 500 कॉटचे अत्याधुनिक भारती हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. या हॉस्पिटलच्या स्थापनेमुळे खानापूर तालुका व परिसरातील नागरिकांना उत्तम दर्जाची आरोग्यसेवा घराजवळ मिळेल,

याशिवाय तीन साखर कारखान्यांच्या माध्यमातून शेतकर्‍यांना ऊस दरात न्याय मिळणार असून, त्यांच्या आर्थिक स्थैर्यात भर पडणार आहे. योजनांमुळे भाळवणी गटाचा सर्वांगीण विकास साध्य होईल. मेळाव्यास भाळवणी गटातील सरपंच, उपसरपंच, चेअरमन, पंचायत समिती सदस्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *