islampur news : इस्लामपुरात आ.जयंत पाटील यांचा भाजपाला धक्का, भाजपाच्या पदाधिकार्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश : भाजपाचे जेष्ठ नेते, माजी नगराध्यक्ष स्व.अशोकदादा पाटील यांचे चिरंजीव, उरूण सेवा सोसायटीचे अध्यक्ष महेश पाटील, उरूण ईश्वरपूर नगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विजय कुंभार यांनी येथील पक्ष कार्यालयात माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या साक्षीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. महेश पाटील यांच्या पत्नी सौ.सुप्रिया पाटील उरूण ईश्वरपूरच्या प्रभाग क्रमांक 1 च्या माजी नगरसेविका आहेत.
islampur news : इस्लामपुरात आ.जयंत पाटील यांचा भाजपाला धक्का, भाजपाच्या पदाधिकार्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
आणखी काहीजण प्रवेशाच्या तयारीत
आ.जयंतराव पाटील म्हणाले, महेश पाटील हे जिद्दी कार्यकर्ते, तर विजय कुंभार हे अभ्यासू नगरसेवक आहेत. महेश पाटील यांनी प्रभाग क्रमांक 1 हा जीवापाड जपला आहे. माझा कोणावर राग नाही, कोणाचा द्वेष नाही. या शहरातील रखडलेली कामे मार्गी लावून शहराचा विकास अधिक गतिमान करण्याचा आमचा प्रयत्न आहे. दोन्ही कार्यकर्त्यांना आमच्या पक्षात मानाची, सन्मानाची वागणूक दिली जाईल.
या दोघांच्या प्रवेशाने आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आनंदराव मलगुंडे यांना दुप्पट बळ मिळेल. यावेळी त्यांनी स्व.अशोकदादा पाटील यांच्याशी असणार्या ऋणानुबंधाचा आवर्जून उल्लेख केला. महेश पाटील म्हणाले, माझे वडील स्व.अशोकदादा पाटील व माझ्या कुटुंबाने 85 वर्षे भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला आहे. तो पक्ष सोडून सोडताना कंठ दाटून येतो. माझ्या वडिलांनी कायम शहरातील गुंडगिरी आणि अवैद्य धंद्याविरोधी लढा दिला आहे. सध्या तीन गुन्हेगारी टोळ्या एकत्र येऊन नगरपालिकेच्या निवडणुकीच्या उमेदवारी ठरवित आहेत.
हे या शहराच्या भवितव्यासाठी मारक आहे. आम्ही ते खपवून घेणार नाही. माझ्या वडिलांचा विचार आम्ही साहेबांच्या नेतृत्वाखाली पुढे नेऊ. विकास आघाडीच्या उमेदवारांची चर्चा होताना माझा सख्खा भाऊ आणि चुलत भाऊ तिथे उपस्थित होते. ज्यांना आपण 25 वर्षे सांभाळले, ते भाजपात गेले आहेत. आनंदराव मलगुंडे यांना 10 हजारापेक्षा मोठ्या फरकाने विजयी करून त्यांना उत्तर देऊया. विजय कुंभार म्हणाले, मी गेली 30-40 वर्षे स्व.अशोकदादांचे नेतृत्व मानून काम करीत आहे.
सध्या विकास आघाडीत निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्याचा उद्योग सुरू आहे. सक्षम आणि एकमुखी नेतृत्वा शिवाय शहराच्या विकासाला गती मिळणार नाही आणि आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळणार नाही. म्हणून आम्ही साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे.
याप्रसंगी नगराध्यक्षपदाचे उमेदवार आनंदराव मलगुंडे, प्रा.शामराव पाटील, माजी नगराध्यक्ष पै. भगवान पाटील, खंडेराव जाधव, सुरेंद्र पाटील, दादासो पाटील, अरुणादेवी पाटील, पुष्पलता खरात, मुनीर पटवेकर, सुभाष सुर्यवंशी, डॉ.संग्राम पाटील, शंकरराव चव्हाण, पिरअली पुणेकर, रोझा किणीकर, शंकरराव पाटील, रवींद्र वाघमोडे, पै.गुलाब शिरटेकर, संजय पाटील, शैलेश पाटील, अशोक उरूणकर, अनिल पावणे, विक्रम घाटगे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शहाजी पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. जेष्ठ नेते, माजी नगरसेवक बी.ए.पाटील यांनी आभार मानले.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











