jat election news : जतमध्ये सुरेश शिंदेंच्या खेळीला जयंतरावांचा खो: महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेला शरदचंद्र पवार राष्ट्रवादीने भाजप व काँग्रेसच्या विरोधात मोट बांधत अजितदादांच्या राष्ट्रवादीशी सोबत जाण्याचा निर्णय घेतला. पत्रकार परिषदेत दोन्ही राष्ट्रवादीने भाजप व काँग्रेस विरोधात रणशिंग फुंकत घड्याळाचा गजर सुरू केला. पण निर्णय होवून चोवीस तास उलटत नाहीत तोपर्यंत शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीने यु टर्न मारत घड्याळाची टिक टिक नको म्हणत काँग्रेसशी हात मिळवणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
jat election news : जतमध्ये सुरेश शिंदेंच्या खेळीला जयंतरावांचा खो
बुधवारी माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष विलासराव जगताप व शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे नेते, माजी सभापती सुरेश शिंदे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत नगराध्यक्षासह सर्व 23 जागेवर घड्याळ चिन्हावर लढणार असल्याचे जाहीर केले होते. जिल्हा बँकेचे संचालक तथा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मन्सूर खतीब हे ही यावेळी उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत विलासराव जगताप यांनी नगराध्यक्षपदासाठी सुरेश शिंदे यांचे नाव जाहीर करत बसपा पक्षाला सोडलेल्या जागा सोडून उर्वरित सर्व जागा घड्याळ चिन्हावर लढणार असल्याचे सांगितले. सुरेश शिंदे यांनीही त्यास होकार दिला.शरदचंद्र पवारांची तुतारी या निवडणुकीत गायब झाल्याने मन्सूर खतीब नाराज झाले. पत्रकार परिषद होताच तेथून ते निघून गेले. गुरुवारी मन्सूर खतीब यांनी सुरेश शिंदे यांची भेट घेत शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे चिन्ह व नेत्यांचे फोटो लावू नका असे सांगितले.
एकूणच सुरेश शिंदे यांच्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत लढण्याचा जो खेळ खेळला गेला त्यास जयतरावांनी खो दिला आहे. महाविकास आघाडी सोबत असल्याचे शरदचंद्र पवार राष्ट्रवादीने जाहीर केले आहे.विलासराव, सुरेशराव व बसपा यांच्या या तिसर्या आघाडीने रणशिंग फुंकल्याने निवडणुकीच्या आखाड्यातील रंगत वाढली आहे.
सुरेश शिंदेंपुढील आव्हाने वाढली
नगराध्यक्षपदासाठी ते स्वतः इच्छुक असून संपूर्ण पॅनेल उभा करण्याची तयारी त्यांनी केली. काँग्रेसचे स्थानिक नेते व वरिष्ठ नेत्यांत आघाडीवर चर्चा झाली पण काँग्रेसने नगराध्यक्षपदावरील दावा सोडला नसल्याने सुरेश शिंदे यांनी विलासराव जगताप यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. माजी मंत्री आ. जयंत पाटील आपणास पाठिंबा देतील अशी अपेक्षा व विश्वास शिंदे यांना होता. पण त्यांना तेथून प्रतिसाद मिळालेला नाही. सुरेश शिंदे नगराध्यक्ष पदावर लढण्यावर ठाम आहेत. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी त्यांच्या सोबत नसल्याने आव्हानात वाढ झाली आहे. शिंदे ही परिस्थिती कशी हाताळतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
आघाडी सोबतच : महाविकास आघाडीत काँगेस सोबत
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी आहे. जत जत नगरपरिषदेच्या निवडणुकीत अजितदादांच्या राष्ट्रवादीसोबत आम्ही जाणार नाही. महाविकास आघाडीत राहणार व त्यांना बळ देणार असल्याचे जिल्हा बँकेचे संचालक तथा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मन्सूर खतीब यांनी पुण्यनगरीशी बोलताना सांगितले.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











