tasgaon news : तासगावात काकांचा दे धक्का

SHARE:

tasgaon news : तासगावात काकांचा दे धक्का : तासगाव नगरपालिका निवडणुकीच्या निकालाने तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघाची राजकीय समीकरणे बदलली असून या विजयाने माजी खासदार संजयकाका पाटील यांना मोठे बळ मिळाले आहे. तर दुसरीकडे आमदार रोहित पाटील यांच्यासाठी हा निसटता पराभव धक्का देणारा ठरला आहे.

tasgaon news : तासगावात काकांचा दे धक्का

लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये लागोपाठ पराभव झाल्यानंतर तासगाव नगरपालिका निवडणूक ही माजी खासदार संजयकाका पाटील यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला असता, तर त्यांच्या राजकीय करिअरवरच प्रश्नचिन्ह निर्माण होईल, अशी चर्चा तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघासह जिल्हाभर सुरू होती.

विशेष म्हणजे या निवडणुकीत संजयकाका पाटील हे कोणत्याही मोठ्या राष्ट्रीय पक्षाच्या चिन्हावर नसून स्वाभिमानी विकास आघाडीच्या माध्यमातून रिंगणात उतरले होते. भाजपसारखा पक्ष सोबत नसल्याने त्यांना किती तोटा होईल, याबाबत राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र या सर्व चर्चांना छेद देत संजयकाका पाटील यांनी रणनीती, संघटन आणि स्थानिक मुद्द्यांच्या जोरावर विजय खेचून आणला.

या विजयामुळे त्यांचे नेतृत्व पुन्हा एकदा मजबूत झाले असून स्थानिक पातळीवर त्यांचा प्रभाव कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे आमदार रोहित पाटील यांना या निवडणुकीत निसटता पराभव स्वीकारावा लागला. माजी नगराध्यक्ष अजय पाटील यांच्या पत्नीच्या उमेदवारीमुळे मतांचे विभाजन झाले आणि त्याचा फटका आमदार रोहित पाटील यांना बसला आहे.

एकूणच तासगाव नगरपालिका निवडणूक ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची लढत न राहता, भविष्यातील राजकीय दिशा ठरवणारी ठरली असून संजयकाका पाटील यांच्यासाठी हा विजय नवसंजीवनी देणारा तर आमदार रोहित पाटील यांच्यासाठी आत्मपरीक्षणाची वेळ आणणारा ठरला आहे. या निकालाने येणार्‍या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक माजी खासदार संजय काका व आमदार रोहित काका यांच्यात खडाखडी पाहायला मिळणार आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *