jayant patil mews : वाघ जखमी नाही, अजूनही गुरगुरतो…

SHARE:

जयंतरावांनी पुन्हा ठणकावून सांगितले – टायगर अभी जिंदा है! 🔥

jayant patil mews : वाघ जखमी नाही, अजूनही गुरगुरतो… : राज्यात आणि विशेषतः जिल्ह्याच्या राजकारणात महायुतीचा गाजावाजा सुरू असताना, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार जयंतराव पाटील यांचे राजकीय अस्तित्व संपवण्याचा डाव गेल्या काही वर्षांपासून आखला जात होता. उरुण–ईश्वरपूर आणि आष्टा नगरपालिका निवडणुका हा त्या डावाचा केंद्रबिंदू होता. जयंतरावांना याच मातीत जायबंदी करून कायमचे हद्दपार करण्याची महायुतीची व्यूहरचना आखण्यात आली होती.

jayant patil mews : वाघ जखमी नाही, अजूनही गुरगुरतो…

इतकेच नव्हे, तर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ईश्वरपुरात येऊन सभा घेतली आणि सत्तेची तोफ डागली. पण जयंतराव हे राजकारणातील नवखे नाहीत. त्यांनी वेळ येताच अचूक चाल टाकली आणि महायुतीला ईश्वरपूर व आष्टा – दोन्ही ठिकाणी 23-23 जागांवर धूळ चारत एकहाती सत्ता मिळवली. हा केवळ विजय नव्हता, तर महायुतीच्या अहंकारावर दिलेला जबरदस्त चपराक होता.
एकेकाळी जिल्ह्यात अस्तित्वहीन असलेल्या महायुतीला पाय रोवण्याची संधी जयंतरावांच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदतीने मिळाली होती. लोकसभा, विधानसभा, महापालिका – सगळीकडे त्याचा लाभ महायुतीने उचलला. त्यामुळे विरोधात असतानाही जिल्ह्यातील महायुतीचे नेते जयंतरावांच्या सावलीतच वावरत होते. तेव्हा जनतेत भाजप नाही, जयंत जनता पार्टी अशीच चर्चा होती.
पण सत्ता नंबर वन होताच जयंतरावांची गरज संपली आणि थेट पाडावाच्या खेळी सुरू झाल्या. त्यांच्या जुन्या समर्थकांना फोडणे, विरोधकांना एकत्र करणे, निशिकांत पाटील यांना पुढे करणे – हे सगळे प्रयोग झाले. नगरपालिकेची सत्ता हिसकावण्यात आली, विधानसभा निवडणुकीत मताधिक्य घटवले गेले, 2024 मध्ये तर अवघ्या 14 हजार मतांनी निसटता विजय राहिला.
तरीही जयंतराव पाटील हेच जिल्ह्यातील भाजपचे कट्टर शत्रू मानून त्यांना संपवण्याचा अजेंडा सुरूच राहिला. आ. गोपीचंद पडळाकर यांच्याकडून वैयक्तिक टीकेची पातळी इतकी घसरली की स्व. राजारामबापू पाटील यांच्यावरही टीका झाली. हा वाद थेट फडणवीसांपर्यंत पोहोचला. म्हणजेच जयंतरावांचे नामोनिशाण मिटवण्याची जणू मोहीमच सुरू होती.
याच पार्श्वभूमीवर ईश्वरपूर नामकरण, समर्थकांचे पक्षप्रवेश, डांगे घराण्याचा वापर, शिराळा-वाळवा भागात महायुती एकसंध ठेवण्याची खेळी, साम-दाम-दंड-भेद सगळे फंडे वापरले गेले. राज्यस्तरावरून नियोजन झाले. उद्दिष्ट एकच – जयंतरावांचा राजकीय खात्मा.
पण यावेळी जयंतराव गाफील राहिले नाहीत. गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून त्यांनी स्वतः मैदानात उतरून बांधणी केली. उमेदवार निवडीत विनिंग मेरिट, स्थानिक स्वीकारार्हता आणि निष्ठा या त्रिसूत्रीवर त्यांनी भर दिला. ईश्वरपुरात आनंदराव मलगुंडे, आष्ट्यात विशाल शिंदे – दोन्ही ठिकाणी जनतेशी नाळ जोडलेले उमेदवार दिले.
प्रचार गल्लीबोळातून, चौकसभांतून, थेट जनतेत जाऊन केला. आता नाही तर कधीच नाही हा संदेश लोकांच्या मनात ठसवला. विकासाचा अजेंडा आणि आत्मसन्मानाची लढाई जनतेने ओळखली – आणि निकालाने इतिहास घडवला.
ईश्वरपुरात साडेसात हजारांहून अधिक मताधिक्य, आष्ट्यात 2753 मतांनी विजय, दोन्ही ठिकाणी 23 जागांचे निर्विवाद बहुमत. सत्ता बदलली, सत्ता राखली – पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे महायुतीचे राजकीय अस्तित्व उद्ध्वस्त करण्याचे मनसुबेच उद्ध्वस्त झाले.
मी ईश्वरपूरचा, ईश्वरपूर माझे आणि टायगर अभी जिंदा है हे जयंतरावांनी निकालातूनच दाखवून दिले.

‘आता कायमचा मुक्काम मुंबई’चा अपप्रचारही चिरडला गेला.

जयंतराव आणि त्यांचे पुत्र प्रतिक पाटील यांना मुंबईला हद्दपार करण्याची स्वप्ने पाहणार्‍यांना ईश्वरपूर-आष्ट्याच्या जनतेनेच जागे केले.
हा केवळ नगरपालिका निवडणुकीचा निकाल नाही, हा राजकीय पुनरागमनाचा एल्गार आहे. आणि जयंतराव पाटील अजूनही मैदानात आहेत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *