दिनेशकुमार ऐतवडे
samdoli zp news : समडोळीचा गड कोण राखणार? भाजपमध्ये उमेदवारीसाठी चढाओढ : जिल्हा परिषदेच्या रणांगणावर पुन्हा एकदा रणधुमाळी उडू लागली आहे. राजकीय समीकरणे तापू लागली असून, मिरज तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि प्रतिष्ठेचा समजला जाणारा समडोळी जिल्हा परिषद मतदार संघ यंदा विशेष चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. कारण स्पष्ट आहे-या मतदार संघातून भाजपकडून इच्छुकांची अभूतपूर्व गर्दी पाहायला मिळत आहे.
samdoli zp news : समडोळीचा गड कोण राखणार? भाजपमध्ये उमेदवारीसाठी चढाओढ
समडोळी जिल्हा परिषद मतदार संघ हा केवळ भौगोलिकदृष्ट्या नव्हे, तर राजकीयदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचा मतदार संघ मानला जातो. सांगली, मिरज आणि ईश्वरपूर अशा तीन विधानसभा मतदार संघांमध्ये विभागलेला हा जिल्हा परिषद मतदार संघ म्हणजे अनेक दिग्गज नेत्यांच्या प्रभावक्षेत्राचा संगम आहे. या संपूर्ण पट्ट्यावर आ. जयंत पाटील, आ. सुरेश खाडे आणि आ. सुधीरदादा गाडगीळ यांचे वर्चस्व कायम आहे. त्यामुळे येथे होणारी प्रत्येक निवडणूक ही केवळ स्थानिक नसून, तालुका व जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा ठरवणारी ठरते.
या मतदार संघात समडोळी, हरिपूर, अंकली, धामणी, जुनी धामणी, निलजी, बामणी आणि ढवळी अशी राजकीयदृष्ट्या जागरूक आणि लोकसंख्येच्या दृष्टीने महत्त्वाची गावे समाविष्ट आहेत. गेल्या निवडणुकीत या मतदार संघातून भाजपच्या शोभा कांबळे या जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या. त्याचवेळी समडोळी पंचायत समितीतून राष्ट्रवादीचे अशोक मोहिते, तर अंकली पंचायत समितीतून भाजपच्या त्रिशला खवाटे विजयी झाल्या होत्या.
मात्र यंदाची निवडणूक अनेक अर्थांनी वेगळी ठरणार आहे. तब्बल आठ वर्षांनंतर ही निवडणूक होत असून, या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. राजकीय समीकरणे बदलली आहेत, नवी चेहरे पुढे आली आहेत, तर काहींनी आपल्या कामाच्या जोरावर जनतेच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. त्यातच हा मतदार संघ सध्या ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असल्याने इच्छुकांची चढाओढ अधिकच वाढली आहे.
भाजपकडून उमेदवारीसाठी मैदानात उतरलेले चेहरे हे केवळ इच्छुक नाहीत, तर प्रत्येक जण आपापल्या परीने कामाचा, संघर्षाचा आणि जनसंपर्काचा ठसा उमटवलेला नेता आहे.
हरिपूरचे ज्येष्ठ नेते अरविंद तांबवेकर यांनी गावात कोट्यवधी रुपयांची विकासकामे करून आपला वेगळा ठसा उमटवला आहे. सध्या त्यांच्या पत्नी हरिपूरच्या लोकनियुक्त सरपंच असून, तांबवेकर यांचा जनसंपर्क आणि विश्वासार्हता ही त्यांची मोठी ताकद मानली जाते.
अंकलीचे माजी सरपंच किरण कुंभार हे आ. सुधीरदादा गाडगीळ यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. सरपंचपदाच्या कार्यकाळात त्यांनी अंकली गावाच्या विकासासाठी भरीव काम केले असून, त्यांच्या नेतृत्वाची गावकर्यांमध्ये आजही चर्चा होते.
समडोळीचे ग्रामपंचायत सदस्य दस्तगीर मुजावर हे शेतकरी संघटनेतून उभे राहिलेले नेतृत्व आहे. शेतकर्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे मुजावर सामाजिक कार्यातही नेहमीच पुढे असतात. त्यामुळे त्यांना शेतकरी व सामान्य जनतेचा मोठा पाठिंबा लाभलेला आहे.
धामणीचे सामाजिक कार्यकर्ते संकेत आलासे हे मदन पाटील यांच्या राजकीय प्रवासातून घडलेले कार्यकर्ते असून, जयश्री पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. सामाजिक प्रश्नांवर त्यांची ठाम भूमिका आणि कार्यशीलता ही त्यांची जमेची बाजू ठरते.
समडोळीचे माजी उपसरपंच संजय हजारे यांनी सलग पाच वर्षे उपसरपंचपद भूषविले आहे. शिवप्रतिष्ठानचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळख असलेल्या हजारे यांनी संघटनात्मक कामातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
निलजीचे सामाजिक कार्यकर्ते शितल चिवटे हे स्वातंत्र्यसैनिक बाळासाहेब चिवटे यांच्या सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेणारे नाव आहे. बंधू रोहिते चिवटे आणि शितल चिवटे यांनी गेल्या दहा वर्षांत भाजप पक्ष खेडोपाडी पोहोचवण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. सामाजिक बांधिलकी आणि पक्षनिष्ठा हीच त्यांची खरी ओळख आहे.
एकंदरीत, गेल्या निवडणुकीत भाजपचा झेंडा या मतदार संघात फडकला आणि त्याच यशामुळे यंदा भाजपकडे इच्छुकांची संख्या वाढलेली दिसून येत आहे. समडोळी जिल्हा परिषद मतदार संघात यंदाची लढत केवळ उमेदवारांची नाही, तर काम, विश्वास, वारसा आणि नेतृत्व यांची कसोटी ठरणार आहे. आता पक्ष नेतृत्व कुणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











