kavtepiran news : कवठेपिरान जिल्हा परिषद मतदारसंघ: इच्छुकांनी ताकद लावली पणाला कवठेपिरान जिल्हा परिषद मतदारसंघात निवडणुकीचा बिगुल वाजताच राजकीय वातावरण अक्षरशः पेटले आहे. आरक्षणाच्या नव्या समीकरणांनी या मतदारसंघातील शांतता भंग पावली असून, सत्तेसाठी इच्छुकांनी आपापल्या ताकदीची पूर्ण ताकद पणाला लावण्याची तयारी सुरू केली आहे. ही निवडणूक आता केवळ मतदानापुरती न राहता, वर्चस्व, प्रतिष्ठा आणि राजकीय अस्तित्वाची निर्णायक लढाई बनत चालली आहे.
kavtepiran news : कवठेपिरान जिल्हा परिषद मतदारसंघ: इच्छुकांनी ताकद लावली पणाला
यंदा जिल्हा परिषदेसाठी ओबीसी महिला आरक्षण जाहीर होताच अनेक प्रस्थापित गटांची धडधड वाढली आहे. त्यातच दुधगाव पंचायत समिती गणासाठी सर्वसाधारण महिला, तर कवठे पंचायत समितीसाठी ओबीसी पुरुष आरक्षण असल्याने जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत अशा तिन्ही स्तरांवर इच्छुकांची रांग लागली आहे. परिणामी, संपूर्ण मतदारसंघात राजकीय धुरळा उडालेला दिसत आहे.
साडेआठ वर्षांपूर्वी याच मतदारसंघाने राजकारणाची सारी गणिते उलथवून टाकली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सुरेखा आडमुठे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनिता आवटी यांचा पराभव करत प्रस्थापित सत्तेला जबर धक्का दिला होता. त्याचवेळी दुधगाव पंचायत समितीवरही स्वाभिमानीचा झेंडा फडकला आणि जयश्री डांगे यांच्या विजयाने संघटनेची पकड अधिक घट्ट झाली.
मात्र कवठेपिरान पंचायत समिती बिनविरोध गेली आणि अनिल आमवटणे यांची निवड झाली होती. मात्र यंदा रणांगणात चित्र वेगळेच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार जयंत पाटील समर्थित गटातून सचिन पाटील यांच्या पत्नी मीना पाटील यांचे नाव जोरकसपणे पुढे येत आहे.
दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही आक्रमक पवित्रा घेत विश्वास कोळी यांच्या पत्नी सुनंदा कोळी, तसेच कवठेपिरानचे अरुण कोरे यांच्या पत्नी दीपाली कोरे यांना रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत अटळ ठरत असून, प्रत्येक मतासाठी चुरशीची झुंज पाहायला मिळणार आहे.
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही दिवस उरले असून, इच्छुकांनी गावोगावी बैठकांचे सत्र सुरू केले आहे. संपर्क दौरे, कार्यकर्त्यांची जुळवाजुळव, गट-गणांची गणिते-सर्वच पातळीवर राजकीय खेळी रंगू लागल्या आहेत. कोणता नेता कुणाच्या बाजूने उभा राहतो, कोणता गावगट निर्णायक ठरणार, यावर राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
ही निवडणूक केवळ विकासाच्या घोषणा किंवा आश्वासनांपुरती मर्यादित राहणार नसून, कोणाचा दबदबा कायम राहणार आणि कोणाची पकड सैल होणार, याचा फैसला करणारी ठरणार आहे. त्यामुळे कवठेपिरान जिल्हा परिषद मतदारसंघात आगामी काही दिवसांत राजकीय तापमान आणखी वाढणार, हे मात्र निश्चित आहे.
Author: अमोल कुदळे, दुधगाव
अमोल कुदळे गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. तरुण भारत मध्ये तें सध्या असून राजकीय लाईव्ह साठीही लिखाण करतात.











