kavlapuir news : कवलापूर मध्ये किरकोळ कारणातून युवकाचा डोक्यात दगड घालून खून : यात्रेत एकमेकांना धक्का लागून शिवीगाळ करण्यात आल्याच्या क्षुल्लक कारणातून एका युवकाच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना मिरज तालुक्यातील कवलापूर येथे मध्यरात्री घडली. विश्वास कल्लाप्पा सुतार (वय 34, रा. कवलापूर) असे मृत युवकाचे नाव आहे.
kavlapuir news : कवलापूर मध्ये किरकोळ कारणातून युवकाचा डोक्यात दगड घालून खून
घटनेची माहिती समजताच सांगली ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी ग्रामस्थांनी पकडून ठेवलेल्या संशयित हल्लेखोर रोहित उर्फ नवनाथ श्रीरंग नाईक (वय 24, रा. कवलापूर, मूळ रा. भोसे, ता. मिरज) यास जेरबंद केले. याप्रकरणी सुरज भूपाल सुतार (रा.कवलापूर) याने फिर्याद दिली आहे.
याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, फिर्यादी सुरज याचा आत्येभाऊ मृत विश्वास सुतार हा कवलापूर ते कुमठे फाटा रस्त्यावरील रामकृष्ण पाटील यांच्या मालकीच्या विराट हॉटेल येथे वेटर म्हणून कामास असून तो हॉटेलमध्येच राहण्यास आहे. त्याची आई वेडसर असून ती मिरज तालुक्यातील भोसे येथे राहते. सध्या कवलापूरला सिध्देश्वर यात्रा सुरु आहे.
त्यानिमित्त गावात तमाशाचे आयोजन करण्यात आले होते. यात्रा असल्यामुळे गावात रात्री उशीरापर्यत गर्दी होती. सिध्देश्वर मंदिराच्या मागील बाजूस सोमवारी पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास विश्वास सुतार आणि संशयित हल्लेखोर रोहित उर्फ नवनाथ नाईक यांचा यात्रेच्या गर्दीत एकमेकांना धक्का लागला. यावरुन दोघांमध्ये वादावादी झाली. यावेळी विश्वास याने रोहित यास शिवीगाळ केली. यामुळे राग आल्याने रोहित याने विश्वास याला ढकलून दिले.
तसेच रस्त्यावर पडलेला दगड त्याच्या डोक्यात घातला. विश्वास जीवाच्या आकांताने ओरडल्याने परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेवून संशयित रोहित यास पकडून ठेवले. तर विश्वास यास तातडीने रुग्णवाहिकेतून सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. कवलापूर येथे घडलेल्या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस उपअधिक्षक संदिप भागवत, सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक भैरु तळेकर, सपोनि कल्याणी शिंदे आणि इस्माईल तांबोळी यांच्यासह अन्य कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी हल्लेखोरास ताब्यात घेवून अटक केली.
दरम्यान उपचार सुरु असताना सोमवारी सकाळी 8.30 च्या सुमारास विश्वास सुतार याचा मृत्यू झाला. दरम्यान, यात्रा असो किंवा अन्य जाहीर कार्यक्रमांना प्रशासनामार्फत रात्री 10 पर्यतच परवानगी देण्यात येते. परंतु यात्रा असल्यामुळे स्थानिक संयोजकांनी रात्री उशीरापर्यत कार्यक्रम सुरु ठेवला होता. तसेच याकडे पोलिसांचे देखील दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे मध्यरात्री देखील यात्रेत ग्रामस्थांची वर्दळ होती. नियमाचे काटेकोर पालन झाले असते तर कदाचित खूनाची घटना टळली असती अशी चर्चा शहरात होती.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











