kasbe digraj news : डिग्रजकरांच्या संयमाचा बांध फुटला, थेट महामार्गच रोखला : वारंवार होणार्या अपघातांनी संतापाचा कडेलोट गाठला आणि अखेर कसबे डिग्रजकरांनी संयमाचा बांध फोडत थेट महामार्गच रोखून धरला! सांगली-पेठ महामार्गावर गुरुवारी पुन्हा एकदा मृत्यूचा कहर पाहायला मिळाला. या भीषण अपघातात कसबे डिग्रजच्या दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि गावभर शोककळा पसरली. मात्र हा एकच प्रसंग नव्हे-महामार्ग तयार झाल्यापासून आजवर तब्बल 40 हून अधिक अपघातांनी येथे रक्तरंजित इतिहास लिहिला आहे. अनेक कुटुंबांची संसाराची गाडी या रस्त्यावरच उद्ध्वस्त झाली आहे.
kasbe digraj news : डिग्रजकरांच्या संयमाचा बांध फुटला, थेट महामार्गच रोखला
ग्रामस्थांनी वारंवार प्रशासनाच्या दारात धाव घेतली, निवेदनं दिली, मागण्या केल्या पण प्रशासन मात्र आंधळ्याचे सोंग घेत असल्याचा संतप्त आरोप नागरिक करत आहेत. या निष्क्रियतेच्या विरोधात अखेर ग्रामस्थांचा आक्रोश उफाळून आला आणि शुक्रवारी सायंकाळी अचानक रास्ता रोको आंदोलन उभं राहिलं.
या आंदोलनाने महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले होते-त्यांच्या डोळ्यात अश्रू नव्हते, तर रोष आणि असंतोषाची ज्वाला धगधगत होती. आता पुरे! अशी ठाम भूमिका घेत त्यांनी प्रशासनाला जागं करण्याचा निर्धार केला.
या ठिकाणी उड्डाणपूल (फ्लायओव्हर) उभारण्याची मागणी ग्रामस्थांनी जोरदारपणे लावून धरली आहे.
कारण समडोळी सहित आठ गावांतील नागरिकांचा रोजचा प्रवास याच मार्गाने होतो. पण डिग्रज फाट्यावर उभारलेला डिव्हायडर अत्यंत धोकादायक पद्धतीने तयार करण्यात आला आहे. दोन्ही बाजूंनी वेगाने येणारी वाहने आणि अचानक दिसणारी ही रचना-यामुळे चालकांना अंदाज येण्याआधीच अपघात घडतात.
फक्त डिग्रज फाटा नव्हे, तर लक्ष्मी फाट्यावरही अशीच जीवघेणी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी तातडीने उड्डाणपूल उभारण्याची मागणी आता आक्रोशातून हक्काच्या लढाईत रूपांतरित झाली आहे.
अखेर अर्धा तास सुरू असलेल्या या तीव्र आंदोलनानंतर सांगली ग्रामीण पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संतप्त ग्रामस्थांची समजूत काढत लवकरच बैठक घेऊन ठोस तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले आणि वाहतूक पुन्हा सुरळीत झाली.
पण एक प्रश्न अजूनही तसाच धगधगत आहे- आता तरी प्रशासन जागं होणार का, की आणखी कित्येक जीवांचा बळी जाईपर्यंत हीच उदासीनता कायम राहणार?











