kolhapur crime news : फेसबुकवर ‘अनाथ मुलीसोबत लग्न’ची जाहिरात ठरली सापळा! : ‘आमच्याकडे 21 ते 40 वयाच्या अनाथ मुली आहेत. जे कोणी लग्नाला इच्छुक असतील त्यांनी संपर्क करा’ अशी फेसबुकवरून जाहिरात करून महाडच्या कुटुंबाकडून पैसे उकळण्यात आल्याचा प्रकार आज उघड झाला. लग्नाच्या तयारीने हे कुटुंब कोल्हापुरात दाखल होताच संबंधित महिलेने फोन बंद केला.
kolhapur crime news : फेसबुकवर ‘अनाथ मुलीसोबत लग्न’ची जाहिरात ठरली सापळा!
लग्नासाठी पैसे भरले, पण वधूच नाही! रायगडच्या तरुणाची कोल्हापुरात फसवणूक
मंगळवार पेठ परिसरातील अनाथ आश्रमामध्ये चौकशी केली असता, अशा अनेक तक्रारी दाखल झाल्याचे तिथून सांगण्यात आले. याबाबत संबंधित कुटुंबाने पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे तक्रार अर्ज दिला असून, या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
मुलींचे शिक्षण, वाढत्या अपेक्षा यामुळे सर्व सामान्य कुटुंबातील मुलांची लग्ने ठरविण्यात अडथळे येत आहेत. महाड (जि. रायगड) येथील अशाच एका तरुणाने फेसबुकवरील ‘96 कुळी मराठा वधूवर’ नावाच्या पेजवर महिला अनाथ आश्रमातील मुलीसोबत लग्नासाठी संपर्क करा, अशी जाहिरात 31 मार्च रोजी पाहिली. त्यानंतर त्याने दिलेल्या क्रमांकावर पूनम पाटील नावाच्या महिलेशी संपर्क साधत लग्नाबाबत चर्चा केली. यावर तिने विवाह नोंदणी व अनाथ आश्रम प्रवेश पासच्या नावाखाली 6500 रुपये मागितले. हे पैसे पाठविल्यानंतर लग्नाची तारीख ठरवून आणखी 7 हजार रुपये ऑनलाईन मागवले.
मुलीशी बोलू देत नाहीत…
मुलाच्या कुटुंबाने नोंदणी केल्यानंतर त्या मुलीचा फोटो मागवला, तसेच तिच्याशी फोनवरून बोलण्याची विनंती केली. यावर संशयित पूनम पाटील हिने तेथील नियम कडक असून, कोणालाही बोलू दिले जात नाही. तुम्ही लग्नासाठी तयारीने या, आम्ही तयारी करून ठेवतो, असे सांगितल्याचे तक्रारदाराने सांगितले.
कुटुंब लग्नाच्या तयारीने पोहोचले…
महाड येथील कुटुंब आज लग्नाच्या तयारीने दागिने, साड्यांची खरेदी करून कोल्हापुरात दाखल झाले. पण, संबंधित वधूवर सूचक मंडळाशी संपर्क झाला नाही. त्यांनी याबाबत मंगळवार पेठ परिसरातील अनाथ आश्रमात जाऊन चौकशी केली असता, अशा अनेक तक्रारी यापूर्वीही आल्याचे सांगण्यात आले. हे ऐकून त्या कुटुंबाला धक्काच बसला. त्यांनी सामाजिक कार्यकर्त्या गीता हासूरकर यांच्याशी संपर्क केला. हासूरकर यांच्या मदतीने कुटुंबाने पोलिस अधीक्षक कार्यालयात जाऊन वरिष्ठ अधिकार्यांकडे याबाबतची तक्रार दिली.
कोल्हापूर जिल्ह्यात अनाथ आश्रमातील मुलींची विवाह करून देण्याच्या नावाखाली फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. काही दिवसांपूर्वी साठ वर्षीय व्यक्तीलाही लग्न लावून देण्याच्या नावाखाली फसवणूक झाली आहे. यामुळे नोंदणीकृत वधू-वर सूचक मंडळांकडेच जावे, असे आवाहन गीता हासूरकर यांनी केले.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.










