murgud news : मुरगुडमध्ये लग्नमंडपातच नववधूचा नकार

SHARE:

murgud news : मुरगुडमध्ये लग्नमंडपातच नववधूचा नकार :  मुरगुड येथे विवाह ठरवणार्‍या एजंटमार्फत एका शेतकरी कुटुंबाची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, लग्नाच्या मुहूर्ताच्या अवघ्या दहा मिनिटे आधी नववधूनेच लग्नास नकार दिल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

murgud news : मुरगुडमध्ये लग्नमंडपातच नववधूचा नकार

विवाह एजंटकडून फसवणुकीचा प्रकार; परिसरात खळबळ

मिळालेल्या माहितीनुसार, मुरगूड येथील एका तरुणाचे लग्न इचलकरंजी येथील एका मुलीसोबत ठरवण्यात आले होते. संबंधित विवाह एजंटामार्फत हा संबंध जुळवण्यात आला होता. लग्नपूर्व धार्मिक विधी पार पडले होते. मात्र, लग्नसोहळा सुरू होण्याच्या काही क्षणांपूर्वी नववधूने मंडपात उपस्थित पाहुण्यांसमोर आपले यापूर्वीही लग्न झाल्याचे सांगत हे लग्न करण्यास नकार दिला. तसेच, येथे उपस्थित असलेले कोणीही आपले नातेवाईक नसल्याचेही तिने स्पष्ट केल्याने उपस्थितांमध्ये मोठी खळबळ उडाली.

या घटनेमुळे वधूपक्षाबाबत संशय निर्माण झाला असून, संबंधित एजंटवर फसवणुकीचे आरोप होत आहेत. पीडित कुटुंबाने विवाहासाठी सुमारे चार लाखांहून अधिक खर्च केल्याची माहिती समोर आली आहे. लग्न ठरवणार्‍या एजंट नाही वेळोवेळी 50 हजाराहून अधिक रकमा दिल्याचे सांगण्यात येते. मंडप उभारणी, पाहुण्यांची जेवणावळ, वस्त्र-आभूषणे, प्रवास आणि इतर सोयीसुविधांवर मोठा खर्च करण्यात आला होता.

घटनेची माहिती मिळताच संतप्त नातेवाईक व नागरिकांनी मुरगुड पोलीस ठाण्यात गर्दी करत तीव्र भावना व्यक्त केल्या. संबंधित एजंटाची पार्श्वभूमी, त्याचे इतर ठिकाणी असलेले व्यवहार तसेच अशा प्रकारच्या फसवणुकीच्या आणखी घटना घडल्या आहेत का, याबाबत पोलीस तपास करत आहेत.

ग्रामीण भागात विवाहासाठी इच्छुक युवकांची संख्या वाढत असताना, अशा एजंटांकडून होणार्‍या फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अशा प्रकरणांचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

दरम्यान, या प्रकरणात नववधूची पार्श्वभूमी, तिच्यावर कोणताही दबाव होता का, तसेच संबंधित एजंटाचे कोणत्याही रॅकेटशी संबंध आहेत का, याचाही तपास पोलीस करत असून पुढील चौकशी सुरू आहे.

दरम्यान, या प्रकरणातील संबंधित एजंट पोलीस ठाण्यासमोर निर्विकारपणे वावरत असल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणले. संतप्त नातेवाईक आणि स्थानिकांनी संबंधित मुलीचे कुटुंब तसेच एजंट यांनी मुलाकडून घेतलेली रक्कम तत्काळ परत करावी आणि लग्नासाठी झालेला सर्व खर्च नुकसानभरपाई म्हणून द्यावा, अशी आक्रमक मागणी केली.

अशा प्रकारे विवाहाच्या नावाखाली युवक आणि त्यांच्या कुटुंबीयांची फसवणूक करून त्यांच्या आयुष्यात संकट निर्माण करण्याचे प्रकार पुन्हा घडू नयेत, यासाठी कठोर कारवाईची मागणीही करण्यात आली. मुरगुडसारख्या परिसरात अशा प्रकारची घटना प्रथमच उघडकीस आल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून, यापुढे विवाह ठरविताना विश्वासू नातेवाईकांची उपस्थिती आणि सखोल पडताळणी करणे अत्यावश्यक असल्याची भावना व्यक्त होत आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *