samdoli news : समडोळी शिक्षण संस्थेची वाटचाल : लोकचळवळीच्या शक्तीपासून सत्तेच्या केंद्रीकरणापर्यंत? : मिरज तालुक्याच्या पश्चिम भागात वसलेले समडोळी हे केवळ एक गाव नाही, तर संस्कार, समृद्धी, शिक्षणप्रेम आणि सामाजिक ऐक्य यांची जपणूक करणारे एक प्रेरणादायी केंद्र आहे. सुपीक माती, कष्टाळू माणसं आणि प्रगतिशील विचारांची परंपरा लाभलेल्या या गावाचा इतिहास अत्यंत वैभवशाली आहे. या इतिहासातील सर्वात उज्ज्वल अध्याय म्हणजे गावात उभी राहिलेली शिक्षणाची चळवळ.
samdoli news : समडोळी शिक्षण संस्थेची वाटचाल : लोकचळवळीच्या शक्तीपासून सत्तेच्या केंद्रीकरणापर्यंत?
एक काळ असा होता की देशभक्त आर. पी. पाटील कुपवाड यांच्या संस्थेमार्फत गावात शिक्षणाचा दीप प्रज्वलित झाला होता. मात्र काही दूरदृष्टी असलेल्या ध्येयवेड्या समाजपुरुषांच्या मनात एक वेगळीच ठिणगी पडली. गावाची मुले गावातच शिकावीत, गावच्या लोकांनी उभी केलेली संस्था गावाच्या भवितव्याची शिल्पकार व्हावी, असा विचार त्यांच्या मनात रुजला.
त्या विचाराचे रूपांतर स्वप्नात झाले आणि त्या स्वप्नाला वास्तवात आणण्यासाठी शांतगोंडा पाटील, डॉ. जिनदत्त बेले, आण्णासाहेब देवर्षी, श्रीमंधर कवठेकर, जनगोंडा पाटील, बापूसो खोत, शामराव आगरे यांसारखे अनेक समाजधुरीण एकत्र आले. त्यांच्या मनात सत्ता नव्हती, स्वार्थ नव्हता; होती ती केवळ शिक्षणाची तळमळ आणि गावाबद्दलची निस्सीम आत्मीयता.
समडोळी शिक्षण संस्थेचा प्रवास अशा प्रकारे सुरू झाला. संस्थापक संचालक गावोगावी, वाड्यावस्त्यांवर फिरले. प्रत्येक घराचे दार ठोठावले. लोकवर्गणी गोळा केली. गावकर्यांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ही आपली शाळा आहे, आपल्या मुलांच्या भवितव्याची पायाभरणी करणारी शाळा आहे, या भावनेतून अनेकांनी आपल्या ऐपतीनुसार मदतीचा हात पुढे केला. कुणी पैसे दिले, कुणी श्रमदान केले, तर कुणी आपल्या घराचे दरवाजे शाळेसाठी खुले केले.
सुरुवातीच्या काळात चंदनभाऊ यांच्या वाड्यात शाळा भरू लागली. त्या छोट्याशा जागेतून मोठी स्वप्ने आकार घेऊ लागली. नंतर स्टँड परिसरात जमीन घेण्यात आली आणि त्यावर शाळेची स्वतंत्र इमारत उभारण्यात आली. ही इमारत केवळ विटा आणि सिमेंटची नव्हती, तर गावकर्यांच्या त्यागाची, प्रेमाची आणि आशेची उभारणी होती.
संस्थेच्या वाटचालीत अनेक संकटे आली. आर्थिक अडचणी होत्या. खर्च प्रचंड वाढत होता. शिक्षकांचे पगार वेळेवर करणेही कठीण झाले होते. पण संस्थापक संचालकांनी कधी हार मानली नाही. त्यांनी स्वतःच्या संसारावर तुळशीपत्र ठेवले, वैयक्तिक सुखसोयींचा त्याग केला आणि संस्थेच्या उन्नतीसाठी दिवस-रात्र झटत राहिले. गरज पडली तेव्हा कोर्ट-कचेर्यांचे उंबरठेही झिजवले, पण शिक्षणाचा दीप विझू दिला नाही.
त्या काळात गावची शाळा, गावची संस्था ही भावना प्रत्येकाच्या मनात खोलवर रुजलेली होती. संचालक आणि गावकरी यांच्यात कोणताही भेदभाव नव्हता. गावातून सूचना आल्या की त्यांचा आदराने विचार केला जात असे. निर्णय प्रक्रियेत गावाचा सहभाग असे. संस्था ही कोणाची खाजगी मालमत्ता नसून संपूर्ण गावाची सामूहिक संपत्ती आहे, अशी जाणीव सर्वांना होती.
मात्र काळाच्या ओघात जग बदलले आणि त्याबरोबर माणसांच्या भावना, मूल्ये आणि प्राधान्यक्रमही बदलत गेले. जुने संचालक मागे पडू लागले आणि नव्या पिढीचे नेतृत्व पुढे येऊ लागले. हळूहळू गावची शाळा ही भावना क्षीण होत गेली. तिची जागा माझी शाळा या संकुचित भावनेने घेतली. गावाच्या मालकीची असलेली संस्था काही विशिष्ट लोकांच्या प्रभावक्षेत्रात सीमित होत गेली.
आज परिस्थिती अशी आहे की ज्या संस्थापक संचालकांनी आपल्या आयुष्याचा सुवर्णकाळ संस्थेसाठी अर्पण केला, त्यांच्यापैकी एखाद-दुसरा अपवाद वगळता बहुतेकांच्या वारसदारांची दखलही घेतली जात नाही. केवळ संचालकपद दूर राहिले, पण अनेक संस्थापकांच्या कुटुंबियांना साधे सभासदत्वही मिळू नये, ही किती मोठी शोकांतिका आहे! ज्यांनी झाड लावले, त्यांच्याच पिढ्यांना त्या झाडाच्या सावलीपासून दूर ठेवले जात आहे.
ही केवळ एका शैक्षणिक संस्थेची कथा नाही; तर मूल्यांची झालेली घसरण, त्याग विसरण्याची प्रवृत्ती आणि इतिहासापासून दुरावणार्या समाजाची वेदनादायक कहाणी आहे. आजही समडोळीच्या मातीत त्या संस्थापकांचे श्रम, त्याग आणि स्वप्ने जिवंत आहेत. गरज आहे ती त्या इतिहासाला स्मरण करण्याची, त्यांचा सन्मान करण्याची आणि पुन्हा एकदा गावची शाळा, गावची संस्था ही भावना नव्या पिढीच्या मनात रुजविण्याची.
कारण संस्था मोठी इमारतींनी होत नाही; ती मोठी होते त्याग, विश्वास, लोकसहभाग आणि समाजासाठी झटणार्या माणसांच्या निःस्वार्थ कार्याने.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.










