urun iswarpur news : उरुण-ईश्वरपुरात नागरी वस्तीत बिबट्याचा सहा तास धुमाकूळ : उरूण-ईश्वरपूर शहरातील गजबजलेल्या नागरी वस्तीत माजी नगराध्यक्ष विजयभाऊ पाटील यांच्या जुन्या घरासमोरील रिकाम्या पडक्या जागेत बिबटयाचे सकाळी 8.30 ते 8.45 दरम्यान दर्शन झाले आणि एकच खळबळ उडाली. सकाळी 9 ते दुपारी 2 अशा सहा तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबटयाला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले.
urun iswarpur news : उरुण-ईश्वरपुरात नागरी वस्तीत बिबट्याचा सहा तास धुमाकूळ
वन विभागाने बेशुद्ध करून बिबट्याला पकडले
बघ्यांची गर्दी आणि बिबटयाचा थरार याच्यामध्ये पोलिसांची दमछाक झाली. संपुर्ण शहरातील तरूणायी बिबटयाला पाहण्यासाठी त्या ठिकाणी जमल्याने रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अडथळे येत होते. बिबटयाने एका तळघरात आश्रय घेतल्याने त्याला तेथेच थांबवून ठेवण्यात युवकांनी पुढाकार घेतला आणि बिबटयाला जेरबंद करणे सोपे झाले. अखेर सहा तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला बेशुद्ध होण्याचे इंजेक्शन देऊन जेरबंद करण्यात आले.
उरूण परिसरातील माजी नगराध्यक्ष विजयभाऊ पाटील यांच्या घरासमोरील पडक्या जागेत सोमवारी सकाळी नागरी वस्तीत बिबट्याचा लपंडाव पाहायला मिळाला. भरदिवसा शहरात बिबट्या आल्याने एकच खळबळ उडाली होती. वन विभागाच्या पथकाने सहा तासाचे रेस्क्यू ऑपरेशन राबवत मादी जातीच्या अंदाजे दीड ते दोन वर्षे वयाच्या बिबट्याला बेशुद्ध होण्याचे इंजेक्शन देऊन जेरबंद केले. नगरसेवक राजवर्धन पाटील यांनी प्रांताधिकार्यांना घटनेची माहिती दिली. प्रांताधिकार्यांनी वनविभागाच्या अधिकार्यांशी संपर्क साधून रेस्क्यू टिम पाचारण केली.
सोमवारी सकाळी माजी नगराध्यक्ष विजयभाऊ पाटील यांच्या घरासमोरील जुन्या पडक्या घरात सकाळी 8.45 वाजता काहींना बिबट्याचे दर्शन झाले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली. बघता बघता ही माहिती शहरभर पसरली. त्यामुळे बिबटयाला पाहण्यासाठी नागरिकांनी येथे गर्दी केली होती. नागरिकांचा गोंगाट वाढल्यामुळे हा बिबट्या घराच्या पाठीमागे असलेल्या महादेव मंदिराच्या परिसरात पडीक जागेत झुडपात लपून बसला होता.
नागरिकांच्या गोंगाटामुळे राजेंद्र पाटील यांच्या तळघरात त्याने आश्रय घेतला. हे तळघर तिन्ही बाजूंनी बंदिस्त आहे. रिकाम्या बाजूला स्थानिक युवकांनी जाळी लावून बिबटयाला बंदिस्त करून ठेवले. त्यामुळे त्याला तेथून बाहेर पडता आले नाही. 12.30 ते 1 च्या सुमारास वन विभागाचे पथक रेस्क्यू व्हॅनसह घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने सापळा लावला. मात्र नागरिकांची मोठी गर्दी व गोंगाट यामुळे बिबट्याला पकडण्यात अडथळे येत होते. काही वेळा बिबट्या झूडपातून बाहेर आला होता. मात्र लोकांची गर्दी पाहून पुन्हा तो लपून बसला. यावेळी माजी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांनी धाडसाने झुडपात जाऊन बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. बिबट्याचा शोध घेण्यासाठी ड्रोन कॅमेराही वापरण्यात आला.
काही वेळाने हा बिबट्या राजेंद्र पाटील-ताकारीकर यांच्या घराच्या तळमजल्यात घुसला. त्यावेळी वन विभागाच्या पथकाने संरक्षण किट घालून जाळे टाकून बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन वेळा या जाळीतून बिबट्याने पलायन केले. या झटापटीत वनविभागाच्या एका कर्मचार्याला तार लागून दुखापत झाली. अनेक तासाच्या परिश्रमानंतरही बिबट्या सापडत नव्हता. हा बिबट्या पुन्हा नागरी वस्तीत घुसण्याची भीती होती. त्यामुळे वन विभागाने या घराचा तळमजला जाळी लावून बंद केला. तळमजल्यात असलेल्या चार चाकी गाडी खाली बिबट्या लपून बसला होता.
दरम्यान बिबट्या लवकर सापडत नसल्याने नगरसेवक राजवर्धन पाटील यांनी वन विभागाला बिबट्याला बेशुद्ध करून पकडावे अशी मागणी केली होती. यासाठी आमदार सत्यजित देशमुख व भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्याशीही संपर्क साधून वन विभागाला तशी सूचना करावी अशी मागणी त्यांनी केली. अनेक तासाच्या परिश्रमानंतर अखेर बिबट्याला बेशुद्ध होण्याचे इंजेक्शन देऊन पकडण्याचा निर्णय वन विभागाने घेतला.
तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन वंजारी, डॉ.प्रसाद पाटील, डॉ.मुकुंद वाटेगावकर, डॉ.संतोष वाळवेकर यांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय पथकाने बिबट्याला बेशुद्ध होण्याचे इंजेक्शन दिले. वनविभागाच्या शार्प शूटरनी अचूक नेम धरत बिबट्याला हे इंजेक्शन दिले. बिबट्या बेशुद्ध झाल्यानंतर त्याला पिंजर्यात घालून रेसक्यू व्हॅनमधून वनविभागाच्या कार्यालयात नेण्यात आले. तासाभरानंतर हा बिबट्या शुद्धीवर आला. त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याचे वन विभागाच्या अधिकार्यांनी सांगितले.
सांगली जिल्हा वनसंरक्षक सागर गवते, उपवनसंरक्षक नवनाथ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल रमेश कांबळे, कुंभार, वनपाल डी.व्ही बर्गे, वनरक्षक भिवा कोळेकर, हणमंत पाटील, दत्तात्रय शिंदे, रंजनीकांत दरेकर, अमोल माळी, अमोल साठे, प्राणी मित्र युनुस मनेर तसेच रेस्क्यू टीमने हे ऑपरेशन राबविले. त्यांच्या मदतीला नगरसेवक राजवर्धन पाटील, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, नगरसेवक सतेज पाटील, स्वरूप मोरे, कपिल ओसवाल, शहाजीबापू पाटील, विक्रमभाऊ पाटील, संदीप पाटील, शंकर पाटील, मानसिंग पाटील, शैलेश पाटील आदीसह या परिसरातील लोकप्रतिनिधी तसेच तरुण धावले होते. नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे, उपनगराध्यक्ष खंडेराव जाधव यांनीही घटनास्थळी भेट दिली.
सहा तासांचा थरार….
सकाळी साडेआठ-नऊ वाजण्याच्या सुमारास प्रथम बिबट्याचे दर्शन झाले. हा बिबट्या आष्टा नाका परिसरातून शहरात आल्याचे काही प्रत्यक्ष दर्शनी सांगितले. माजीं नगराध्यक्ष विजयभाऊ पाटील यांच्या पडीक घराच्या परिसरात हा बिबट्या सहा तास दाबा धरून होता. यावेळी काही घरातूनही त्याने प्रवेश केला होता. त्यामुळे रहिवाशांच्यात प्रचंड भीती निर्माण झाली होती. दुपारी दोन वाजून दहा मिनिटांनी बिबट्याला बेशुद्ध करून पिंजर्यात घालण्यात आले त्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निस्वास सोडला.
शेतातून बिबट्या थेट घरात…..
गेल्या काही दिवसापासून उरुण परिसरातील शेतात बिबट्याचे सातत्याने दर्शन होत होते. अनेक पाळीव जनावरांच्यावर बिबट्याने हल्ला केला आहे. आता थेट हा बिबट्या नागरी वस्तीत आल्याने नागरिकांच्यात भीतीचे वातावरण आहे. माजी नगरसेवक विक्रम पाटील यांनी 15 ते 20 दिवसांपुर्वी बिबटयाचा बंदोबस्त करावा अन्यथा तहसिल कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचे सांगितले होते.
नागरिकांची प्रचंड गर्दी आणि फोटोशूट…
यावेळी बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. अनेक जण बिबट्याला आपल्या मोबाईलमध्ये टिपण्यासाठी प्रयत्न करीत होते. जसजशी गर्दी वाढत होती तस तशी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी येथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. तरीही पोलिसांना गर्दी आटोक्यात येत नव्हती. पोलिसांनी लाटी चार्ज करून गर्दी हटवण्याचा प्रयत्न केला.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.










