diliptatya news : दिलीपतात्या चिरतरूण व्यक्तिमत्व आणि दिलखुलास माणूस….

SHARE:

diliptatya news : दिलीपतात्या चिरतरूण व्यक्तिमत्व आणि दिलखुलास माणूस…. : एखाद्याचं ‘तारुण्य’ अथवा ‘प्रौढत्व’ हे त्याच्या प्रवृत्तीवर अवलंबून असतं. दिलीप तात्यांचं ’चिरतरुण’ व्यक्तिमत्व हे त्यांना त्यांच्या दिलखुलास प्रवृत्तीमुळं लाभलेलं आहे. तात्यांच्या या उपजत गुणांची पारख मा.बापूंनी केली आणि त्यांना त्यांच्या ऐन तारुण्यात राजकारण आणि समाजकारणाच्या प्रवाहात आणलं. आज दिलीप तात्यांच्या यशस्वी कारकिर्दीमुळं मा.बापूंनी केलेली त्यांची निवड किती अचूक होती, याची खात्री पटते.

diliptatya news : दिलीपतात्या चिरतरूण व्यक्तिमत्व आणि दिलखुलास माणूस….

दिलीप तात्या जेव्हा पहिल्यांदा साखर कारखान्याचे संचालक झाले, तेव्हा मी शिकत होतो. मा.बापूंच्या समवेत ते जेव्हा जेव्हा आमच्या घरी येत, त्या त्या वेळी त्यांच्या गप्पिष्ट आणि गोष्टीवेल्हाळ स्वभावामुळं इतरांना ते चटकन आपलंसं करत. यामुळंच त्यांच्याबद्दल एक प्रकारचं आकर्षण वाटत असे. वेगवेगळ्या गोष्टी अतिशय रंजकपणानं ते आम्हाला सांगत.

खरं तर राजकारणात येण्याचा विचार माझ्या ध्यानीमनी सुद्धा नव्हता. परंतु, मा.बापूंच्या आकस्मिक निधनामुळं मी किंवा माझे बंधू भगत यांनी राजकारणात यावं आणि आपल्या वाळवे तालुक्याचं नेतृत्व करावं, अशी प्रबळ इच्छा मा. बापूंच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आणि मी राजकारणात प्रवेश केला. या सर्व प्रक्रियेमध्ये दिलीप पाटील अग्रेसर होते. मा. बापूंच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये दिलीप पाटील सर्वांत तरुण असल्यामुळं त्यांची आणि माझी ’वेव्हलेंग्थ’ चांगली जमली. माझ्या राजकीय वाटचालीच्या सुरुवातीच्या काळात मला ज्यांनी ज्यांनी मार्गदर्शन आणि सहकार्य केलं, त्यांमध्ये दिलीप पाटील यांचं योगदान अत्यंत मोलाचं आहे.

दिलीप तात्यांचं व्यक्तिमत्व बहुआयामी आहे. एक कुशल संघटक, प्रभावी वक्ता, कलेचा भोक्ता, खेळ आणि खेळाडूंचा चाहता, निष्ठावान कार्यकर्ता अशा अनेक गुणांचा समुच्चय त्यांच्या व्यक्तिमत्वात ठळकपणानं दिसतो. आपल्यावर पडलेली जबाबदारी प्रयत्नांची पराकाष्ठा करून पूर्ण करण्यातच खरा पुरुषार्थ असतो, याचं अचूक भान दिलीप पाटील यांना आहे. आलेल्या संकटावर मात करून त्याचं सोनेरी संधीत रूपांतर करण्याचं त्यांच कसब कौतुकास्पद आहे.

दिलीप तात्यांचं सामाजिक, राजकीय किंवा इतर क्षेत्रांतलं कार्यकर्तृत्व सर्वांना ज्ञात आहे. या सर्वांपेक्षाही त्यांची लोकनेते राजारामबापू पाटील यांच्यावर असलेली ’एकलव्य’ निष्ठा मला फार मोलाची वाटते. राजाराम बापूंच्या हयातीत आणि त्यांच्या निधनानंतर आजअखेर दिलीप तात्यांची बापूंवरची निष्ठा तसूभर देखील कमी झालेली नाही. राजकारणात एखादं पद, एखादी संधी मिळो अथवा न मिळो, त्यांची निष्ठा सदैव अविचल राहिली आहे. माझ्या राजकीय वाटचालीत त्यांनी मला दिलेली साथ हे त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे.

गेल्या 25-30 वर्षांतल्या माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनातल्या अनेक कटू-गोड आठवणींचं मोहोळ माझ्या मनात उठलं आहे. किती आणि काय काय आठवावं, याचा संभ्रम पडला आहे. सुरुवातीच्या काळात वाळवे तालुक्यातली इंच नि इंच जमीन ओलिताखाली आणण्यासाठी गावोगावी केलेली पायपीट, राजकीय पटलावर माझी प्रतिमा निर्माण करण्यासाठी आयोजित केलेला युवक मेळावा, राजारामबापू साखर कारखान्याच्या चेअरमनपदी झालेली निवड,

माझ्या विवाहाप्रसंगी तात्यांनी वठविलेल्या अनेक भूमिका, माझी विधानसभेची पहिली निवडणूक, नंतरच्या काळात मंत्रिपदी झालेली निवड या आणि अशा अगणित प्रसंगांमध्ये दिलीप तात्यांचं मला नेहमीच प्रोत्साहन आणि सहकार्य लाभलं आहे. या सर्व आठवणींना उजाळा द्यावा म्हटलं तरी त्याचा एक ग्रंथच तयार होईल.

एखाद्या रोपट्याला आधार म्हणून एखादी फांदी त्या रोपट्याच्या शेजारी उभी राहावी आणि काळाच्या ओघात त्या रोपट्याच्या बरोबरच स्वतःही एक वृक्ष व्हावं, असंच काहीसं माझ्या आणि तात्यांच्या बाबतीत झालेलं आहे. माझ्या राजकीय आणि सामाजिक कामात पाठबळ देत असताना तात्यांनी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात स्वतःची एक वेगळी प्रतिमा तयार केलेली आहे.

तात्यांच्या व्यक्तिमत्वात एक अवलिया लपलेला आहे. एकाच वेळी अनेक क्षेत्रांमध्ये प्रभावीपणानं वावरण्याची किमया त्यांनी साधली आहे. तात्यांचं प्रभावी वक्तृत्व, भाषेवरचं प्रभुत्व, श्रोत्यांना खिळवून ठेवण्याचं कसब ही त्यांना लाभलेली ईश्वरी देणगीच होय. नाट्य, चित्रपट, संगीत, साहित्य, क्रीडा, सहकार, राजकारण, समाजकारण या आणि इतर अनेक क्षेत्रांत दिलीप तात्यांनी स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे आणि त्यामुळंच या प्रत्येक क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांशी त्यांची मैत्री आहे. खरं तर तात्यांचा स्वभाव तसा फटकळ आहे.

तरी सुद्धा त्यांचा लोकसंग्रह अफाट आहे. लोकांशी वागण्या-बोलण्याची पद्धत, स्नेह जपण्याची आणि वृद्धिंगत करण्याची त्यांची शैली, अनेकांच्या मदतीला धावून जाण्याची त्यांची वृत्ती अशा अनेक कारणांमुळं तात्या लोकप्रिय आहेत. काही जण तर त्यांच्या फटकळपणावरच लुब्ध आहेत. तात्यांनी राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना आणि वस्त्रोद्योग संकुल या सहकारी संस्थांमध्ये केलेलं काम आपणा सर्वांनाच ज्ञात आहे.

सूतगिरणीचा उद्योग राज्यात सर्व ठिकाणी अडचणीत असताना तात्यांनी या क्षेत्राचा बारकाईनं अभ्यास करून ज्या धडाडीनं नेत्रदीपक यश मिळवलं, त्याचा परिणाम म्हणून राज्याच्या वस्त्रोद्योग महासंघाचं नेतृत्व त्यांच्याकडं चालून आलं. विविध पदं मिळवण्यासाठी सर्वस्व पणाला लावून पद पदरात पाडून घेण्याच्या या काळात पदंच त्यांच्याकडं चालून येतात, यामध्येच तात्यांचं वेगळेपण ठसठशीतपणानं उठून दिसतं.

असं हे वेगळं, कधी रसिक, कधी रांगडं, कधी अभ्यासू, कधी खेळकर, कधी प्रेमळ, कधी खोडकर, कधी हळवं, कधी तापट असं व्यक्तिमत्व वयाच्या एक्काहत्तरीत पोचलं, हे खरंच वाटत नाही. इंद्रधनुष्याप्रमाणे विविध रंगांनी नटलेलं त्यांचं हे व्यक्तिमत्व असंच बहरत राहो, हीच परमेश्वर चरणी नम्र प्रार्थना !

आ. जयंत पाटील
(दिलीपतात्यांच्या मुलुखमैदानी पुस्तकातून साभार)

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *