सांगली संस्थामध्ये वारसांवरून वाद उफाळला

SHARE:

सांगली संस्थामध्ये वारसांवरून वाद उफाळला

भाग्यश्री पटवर्धन-दासानी यांनी मंदिरात केली आरती : मंदिरात शाब्दिक वाद.
सांगली संस्थानचे आदित्यराजेच अधिपती : विजयसिंहराजे पटवर्धन

श्री गणरायाच्या मंगलमय आगमनाने अवघी सांगली नगरी भक्तीरसात न्हाऊन निघाली असतानाच, सांगलीच्या ऐतिहासिक पटवर्धन संस्थानात उत्तराधिकारावरून पेटलेला वाद उफाळून आला. संस्थान गणपती मंदिरातच आज या वादाचा अंक पाहायला मिळाला. प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन-दासानी सांगलीत आल्यावर त्यांनी मंदिरात जाऊन गणपतीची आरती केली. मात्र, याच वेळी मंदिराचे व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर आणि भाग्यश्री यांच्यात आरती करण्यावरून शाब्दिक वाद झाला.
सांगली संस्थान गणेशोत्सवाला मोठी परंपरा आहे. गणेश चतुर्थीच्या मंगलमय पर्वानिमित्त श्री गणपती पंचायतन संस्थानच्या शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या उत्सवमूर्तीची आज मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात राजवाड्यातील दरबार हॉल येथे प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. गणेश चतुर्थीच्या दिवशी श्री गणपती पंचायतन संस्थानच्या रूढी-परंपरेनुसार होणार्‍या पूजाविधीवरून वाद निर्माण झाला.
राजेसाहेब विजयसिंहराजे पटवर्धन यांचा मान डावलून राजेसाहेब आरतीला येण्यापूर्वी भाग्यश्री हिमालय दासानी यांनी श्री गणपती मंदिरात उत्सवमूर्तीची आरती केली. या प्रकारानंतर राजेसाहेबांनी संताप व्यक्त करत मंदिर प्रशासनाला संपूर्ण मंदिर धुवून काढण्याचे आदेश दिले. या संपूर्ण वादावर सांगली संस्थानचे श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांनी अत्यंत आक्रमक आणि भावूक भूमिका मांडली.
भाग्यश्री आणि तिचे पती हिमालय दासानी यांनी संस्थानात मोठा गैरकारभार केला होता, त्यामुळेच त्यांना संस्थानातून काढून टाकण्यात आले आहे, असे स्पष्ट करत त्यांनी दत्तकपुत्र आदित्य पटवर्धन हेच संस्थानचे कायदेशीर उत्तराधिकारी असल्याचे जाहीर केले.1961 साली मी इथे इंजिनिअरिंग कॉलेजला आल्यापासून आजोबांसोबत संस्थानच्या गणेशोत्सवात मी सहभागी होत होतो. त्यानंतर मी आणि राणीसाहेब दोघांनी गेली 58 वर्षे आम्ही गणेशोत्सव साजरा करत आहोत. जोपर्यंत आमच्यात प्राण आहे तो पर्यंत हा खंड पडू देणार नाही.
ज्यावेळी वाटेल आम्हाला जमणार नाही त्यावेळेस आम्ही आदित्य पटवर्धन यांना घेतले आहे. पुढे वारसा ते चालवतील. आम्ही त्यांच्यावर संस्कार करत आहोत. जयदीप अभ्यंकर यांना व्यवस्थापक म्हणून नेमल्याचे त्यांनी सांगितले. राजलक्ष्मीराजे पटवर्धन यांनीही संस्थानच्या परंपरा आणि वारसाहक्काबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.
त्या म्हणाल्या, आमच्या घराण्यामध्ये पूर्वीपासून अशी परंपरा आहे की सांगली गादी व ही परंपरा पुरुष व्यक्तीच पुढे चालवते. आमच्या घरामध्ये मुलगा नसल्यामुळे आम्ही आदित्यराजेंना दत्तक घेतले आहे. कोणीही अफवांवर विश्वास ठेऊ नका, कोणी तुमच्याकडे येऊन सांगेल कि, आता आम्ही सर्व बघतो तर त्यावर विश्वास ठेऊ नका असे आवाहन त्यांनी यावेळी केले. दरम्यान, गणेशोत्सवाच्याच काळात सांगलीच्या या ऐतिहासिक घराण्यातील कौटुंबिक आणि संस्थानाचा वाद चव्हाट्यावर आल्याने या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.
संस्थानची परंपरा चालवणे गरजेचे : भाग्यश्री पटवर्धन-दासानी
सांगलीला मी बर्‍याच वर्षांनी आले आहे. राजेसाहेबांनी तब्येत ठीक नसते. मला वाटते कि सांगली गणपती पंचायतन संस्थानची परंपरा हि पुढे चालवणे गरजेचे आहे. आम्ही तिन्ही मुलींपैकी कोणीतरी इथे उपस्थित राहू. यासाठी मी आज सांगलीत आले. कोणाला वाटू नये कि मला सांगलीचा विसर पडलाय. म्हणून गणेश चतुर्थी दिवशी सांगलीला येणे फार गरजेचे आहे म्हणून मी आले. श्रींच्या कृपेखाली सांगलीत मोठी झाले याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी बोलताना दिली.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अधिक वाचा