डीजे मालकांसह 14 जणांविरूद्ध सांगली ग्रामीण पोलिसांची कारवाई.
पोलिसांनी दिलेल्या इशार्यानंतरही गणेश आगमन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट केल्याप्रकरणी तुंग (ता. मिरज) आणि दुधगाव (ता. मिरज) येथील गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकार्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. डीजे मालकांसह 14 जणांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारत पोलिसांनी इतर मंडळांना इशाराच दिला आहे.
तुंग येथील एसआरएम शिवप्रेमी मित्र मंडळाचा अध्यक्ष नरसु संतराम कांबळे, उपाध्यक्ष आकाश अनिल जाधव, सुशांत रावसाहेब सूर्यवंशी, राहुल विष्णू कांबळे, दिलीप रघुनाथ शिंदे, दीपराज शिंदे, डीजे मालक विशाल राजाराम पाखरे (सर्व रा. तुंग) तसेच दुधगाव येथील गणेश मंडळाचे पदाधिकारी सौरभ सुनील चिंचवाडे, दीपक संजय मकाने, अक्षय शिवाजी मोरे, सुजल अधिकराव माळी, राहुल बाबुराव सुतार, अजित तात्यासाहेब पाटील, डीजे मालक अभय दीपक मंडले (सर्व रा. दुधगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
तुंग येथे रविवारी रात्री 8.15 च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ट्रॅक्टर (एमएच 10 एस 5201) मधून आगमन मिरवणुकीचे आयोजन केले होते. पोलिसांनी डीजे लावण्यास मनाई केली. तरीही मंडळाच्या पदाधिकार्यांनी पोलिसांचा आदेश धुडकावून डीजे मिरवणुकीत सहभागी केला. त्याचा वापर सुरू केल्यानंतर तेथील लोकांना त्रास होऊ लागला. पोलिसांनी डीजेचा आवाज कमी करण्यास सांगितले असता त्यांनी ऐकले नाही. मर्यादित प्रमाणापेक्षा जास्त आवाज ठेवल्याचे ध्वनीमापक यंत्रावर नोंद झाल्यानंतर पोलिसांनी सात जणांविरूद्ध थेट गुन्हाच दाखल केला. दुधगाव येथेही रविवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास दुदेश्वर मंदिरासमोर एका गणेश मंडळाने टेम्पो (एमएच 14 एचएम 3899) मधून डीजे आणून मिरवणुकीच्या ठिकाणी त्याचा वापर सुरू केला. त्यामुळे तेथे जमलेल्या तसेच ये-जा करणार्या लोकांना त्रास होऊ लागला. बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी डीजेचा आवाज कमी करण्यास सांगितले असता त्यांनी जुमानले नाही. पोलिसांनी दिलेल्या लेखी आदेशाचा भंग करून डीजेचा दणदणाट केला म्हणून सात जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











