sanglidccnews : वर्षांनंतर सांगली जिल्हा बँकेच्या चेअरमनपदी काँग्रेसचा झेंडा! राजकीय पुनरागमनाची नवी नांदी : सांगली जिल्ह्याच्या सहकार आणि राजकारणात बुधवारी एका नव्या पर्वाची सुरुवात झाली. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाच्या निवडीत अपेक्षेप्रमाणे काँग्रेसचे महेंद्र लाड यांनी चेअरमनपदाची सूत्रे हाती घेतली, तर शिवसेनेचे तानाजी पाटील यांची व्हाईस चेअरमनपदी निवड झाली. या निवडीने केवळ दोन पदांवर नवे चेहरे विराजमान झाले नाहीत, तर सांगलीच्या राजकीय इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय पुन्हा उजळून निघाला.
sanglidccnews : वर्षांनंतर सांगली जिल्हा बँकेच्या चेअरमनपदी काँग्रेसचा झेंडा! राजकीय पुनरागमनाची नवी नांदी
तब्बल 21 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सांगली जिल्हा बँकेच्या चेअरमनपदाच्या खुर्चीवर काँग्रेसचा नेता विराजमान झाला आहे. ही निवड म्हणजे काँग्रेससाठी जिल्ह्याच्या राजकारणात हरवलेली ताकद पुन्हा मिळवण्याच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे.
सांगली जिल्हा बँकेच्या चेअरमनपदाला नेहमीच राजकीय प्रतिष्ठा लाभली आहे. सहकार क्षेत्रातील सत्ता, ग्रामीण भागातील जनसंपर्क, शेतकर्यांच्या आर्थिक व्यवहारांशी असलेली नाळ आणि जिल्ह्याच्या राजकारणावर पडणारा प्रभाव, यामुळे या पदाकडे नेहमीच राजकीय नेत्यांचे लक्ष राहिले. या खुर्चीवर कोण बसणार, यावरून जिल्ह्यातील राजकीय समीकरणे ठरत आली आहेत. त्यामुळे महेंद्र लाड यांच्या निवडीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

21 वर्षांची प्रतीक्षा… अखेर काँग्रेसचा चेअरमन
सन 1997 ते 1999 मध्ये काँग्रेसचे, बोरगावचे माणिकराव पाटील यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चेअरमनपदाची धुरा सांभाळली होती. त्यानंतर 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. त्यामुळे हे पद कायमच राष्ट्रवादीकडे राहिले. जिल्हा बँकेच्या नेतृत्वाची सूत्रे विविध राजकीय गटांकडे गेली. काळ बदलला, राजकीय समीकरणे बदलली, अनेक नेत्यांचे वर्चस्व निर्माण झाले आणि काँग्रेसला या महत्त्वाच्या संस्थेच्या चेअरमनपदापासून दूर राहावे लागले.
सांगलीच्या सहकार इतिहासात अनेक दिग्गजांनी गाजवली चेअरमनपदाची खुर्ची
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचा इतिहास म्हणजे जिल्ह्यातील सहकार चळवळीचा, राजकीय संघर्षांचा आणि नेतृत्वाच्या बदलत्या प्रवाहाचा इतिहास. या बँकेच्या चेअरमनपदावर अनेक दिग्गज नेत्यांनी काम केले. आपल्या नेतृत्वाच्या जोरावर काहींनी सहकार क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केली, तर काहींनी या पदाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या राजकारणात आपला प्रभाव अधिक मजबूत केला.
बी. एस. कोरे, हरि कुलकर्णी, बी. बी. पाटील, बी. ए. दप्तरदार, रामचंद्र आरवाडे, गुलाबराव पाटील, बाजीराज बाळाजी पाटील, यशवंत घोरपडे, ज्योतीराम पाटील, डॉ. आनंदराव पाटील, वसंतराव पुदाले, बाबासाहेब नाईक, भानुदास पडळकर, दादासाहेब पवार, वसंतराव बिरनाळे, बाजीराव रामराव पाटील, रामचंद्र खराडे, बाळासाहेब हरी पाटील, भानुदास पवार, शहाजीराव पाटील, हिंदकेसरी मारुती माने, जयंतराव पाटील, माणिकराव पाटील, विलासराव शिंदे, महावीर कागवाडे, जगन्नाथ मस्के, प्रा. शिकंदर जमादार, बी. के. पाटील, लालासाहेब यादव, विलासराव जगताप, डी. के. पाटील, दिलीप वग्याणी, शंकरराव पाटील, दिनकर पाटील, दिलीपतात्या पाटील आणि मानसिंगराव नाईक अशा अनेक मान्यवरांनी या पदाची धुरा सांभाळली.
काँग्रेसचा बालेकिल्ला…पण काळाच्या ओघात बदललेली राजकीय परिस्थिती
सांगली जिल्ह्याची ओळख महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेसचा एक मजबूत बालेकिल्ला अशी होती. या भूमीने राज्याच्या राजकारणाला अनेक मोठे नेते दिले. वसंतदादा पाटील यांच्यासारख्या नेतृत्वाने महाराष्ट्राच्या राजकारणावर आपली अमिट छाप सोडली. राजारामबापू पाटील यांनी ग्रामीण भागात जनतेशी घट्ट नाळ जोडणारे नेतृत्व उभे केले, तर गुलाबराव पाटील यांच्यासारख्या नेत्यांनी जिल्ह्याच्या राजकीय वाटचालीत महत्त्वपूर्ण योगदान दिले.
गेल्या दहा ते वीस वर्षांत सांगली जिल्ह्यात काँग्रेसची मोठी पिछेहाट झाली. अनेक ठिकाणी पक्षाला पराभव स्वीकारावा लागला. पक्षातील अंतर्गत मतभेद, बदलती राजकीय परिस्थिती आणि नव्या नेतृत्वाचा उदय यामुळे काँग्रेसची पकड सैल झाली. एकेकाळी जिल्ह्याच्या राजकारणात निर्णायक भूमिका बजावणारा काँग्रेस पक्ष काही काळ राजकीयदृष्ट्या मागे पडल्याचे चित्र निर्माण झाले.
पण राजकारणात पराभव हा शेवट नसतो. काही वेळा तो नव्या संघर्षाची सुरुवात असतो. सांगलीतही काँग्रेसने पुन्हा उभारी घेण्याचे प्रयत्न सुरू केले आणि आता जिल्हा बँकेच्या चेअरमनपदाच्या माध्यमातून पक्षाने आपली ताकद दाखवून दिली आहे. गेल्या वर्षभरात सांगली जिल्ह्यात काँग्रेसने जिल्हा परिषद आणि सहकार क्षेत्रातील विविध घडामोडींमधून पुन्हा सक्रिय होण्याचे संकेत दिले आहेत. राजकीय मैदानात नव्या ताकदीने उतरू पाहणार्या काँग्रेससाठी जिल्हा बँकेचे चेअरमनपद हा आत्मविश्वास वाढवणारा विजय ठरू शकतो.
महेंद्र लाड यांच्या निवडीने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नव्या उत्साहाची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे. अनेक वर्षे सत्तेपासून दूर राहिल्यानंतर पक्षाला मिळालेल्या या संधीमुळे कार्यकर्त्यांच्या मनात पुन्हा आशा निर्माण झाली आहे. जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेस पुन्हा निर्णायक भूमिका बजावू शकते, असा संदेशही या निवडीमधून दिला जात आहे.
सांगली जिल्हा बँकेच्या चेअरमनपदावर 27 वर्षांनंतर काँग्रेसचा नेता विराजमान झाला, हा जिल्ह्याच्या राजकीय इतिहासातील महत्त्वाचा क्षण आहे. सहकाराच्या या प्रतिष्ठित संस्थेतील बदलत्या नेतृत्वाने जिल्ह्याच्या राजकारणाला नवा संदेश दिला आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.










