tambve news : झोपेतच काळाचा घाला! घोणसच्या विषारी दंशाने तांबवेत विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू; जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर : दिवसभर संसाराचा गाडा ओढून थकलेल्या जीवाला रात्रीच्या शांत झोपेतही मृत्यू गाठेल, याची कोणाला कल्पनाही नसते. कुटुंबीयांसोबत घरात निर्धास्तपणे झोपलेल्या एका महिलेवर काळाने अचानक झडप घातली आणि क्षणात एका हसत्या-खेळत्या संसाराचा आनंद हिरावून घेतला. घोणस जातीच्या विषारी सर्पाच्या दंशाने तांबवे (ता. वाळवा) येथील वंदना अनिल जाधव (वय 50) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शुक्रवारी मध्यरात्री एकच्या सुमारास घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण तांबवे गावासह परिसर सुन्न झाला असून जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
tambve news : झोपेतच काळाचा घाला! घोणसच्या विषारी दंशाने तांबवेत विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू; जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर
वंदना जाधव या पती अनिल जाधव यांच्यासोबत कासेगाव-तांबवे रस्त्यालगत नदीकाठी शेतात बांधलेल्या घरात वास्तव्यास होत्या. शेती आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळत त्यांचा संसार आनंदाने सुरू होता. शुक्रवारी रात्रीही कुटुंबीयांसोबत नेहमीप्रमाणे जेवण आटोपल्यानंतर त्या शांतपणे झोपण्यासाठी गेल्या. घरात सर्वत्र शांतता होती. दिवसाचा थकवा विसरून कुटुंबातील प्रत्येकजण निद्राधीन झाला होता. मात्र, याच शांत रात्रीच्या काळोखात एक भयंकर संकट दबा धरून बसले होते.

मध्यरात्रीच्या सुमारास झोपेत असतानाच घोणस जातीच्या अत्यंत विषारी सापाने वंदना यांना दंश केला. सुरुवातीला झोपेत असताना घडलेल्या या घटनेची जाणीव झाली नाही. मात्र, काही वेळानंतर सर्पदंश झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून त्यांनी तातडीने पती अनिल जाधव आणि मुलगी अमरजा यांना उठवून घडलेला प्रकार सांगितला.
क्षणाचाही विलंब न करता कुटुंबीयांनी त्यांना उपचारासाठी कराड येथे नेण्याची धावपळ सुरू केली. डोळ्यांसमोर पत्नीची प्रकृती खालावत असताना पती अनिल जाधव यांची झालेली घालमेल आणि मुलीची धडपड शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे. मात्र, नियतीचा घाला इतका भीषण होता की, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वाटेत वंदना यांची प्राणज्योत मालवली. उपचार मिळण्यापूर्वीच मृत्यूने त्यांना गाठल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा मोठा आघात झाला.
प्रगतशील शेतकरी अनिल जाधव यांच्या त्या पत्नी होत्या. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. घरातील प्रत्येकाच्या सुख-दुःखात सहभागी होणारी, कुटुंबाला मायेने बांधून ठेवणारी व्यक्ती अचानक निघून गेल्याने जाधव कुटुंबाचा आधारच हरपला आहे. कालपर्यंत ज्या घरात हसण्याचे, बोलण्याचे आणि आपुलकीचे सूर घुमत होते, त्याच घरात आज दुःखाची काळोखी पसरली आहे. वंदना यांच्या अकाली जाण्याने कुटुंबीयांसह नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे.
एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. कुटुंबासोबत सुखाने झोपलेली वंदना जाधव यांची पहाट मात्र पुन्हा उजाडलीच नाही. त्यांच्या जाण्याने केवळ एका कुटुंबातील सदस्य हरपला नाही, तर अनेकांच्या आयुष्यातील मायेची सावली कायमची हरपली आहे. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.










