ashta political news : आष्टा नगरपरिषद : तिहेरी लढतीची चाहूल, खुल्या गटाच्या आरक्षणाने राजकीय रंगत वाढली: आष्टा नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी जाहीर होताच, राजकीय वर्तुळात अक्षरशः स्फोट झाला आहे. आरक्षणाची घोषणा होण्याआधी जो वेध लागला होता, तो आता प्रत्यक्षात रंगात आला असून, आष्ट्यात तिहेरी लढत अनिवार्य ठरणार, अशी दाट शक्यता आहे.
ashta political news : आष्टा नगरपरिषद : तिहेरी लढतीची चाहूल, खुल्या गटाच्या आरक्षणाने राजकीय रंगत वाढली
स्व. माजी आमदार विलासराव शिंदे व आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील “आष्टा शहर विकास आघाडी” पुन्हा एकदा जोरदार तयारीत उतरली आहे. दुसरीकडे, दोन महिन्यांपूर्वी “स्वबळावर लढणार” अशी घोषणा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि नेतृत्व उत्साहात आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) चे प्रवीण माने यांनीही “मीच नगराध्यक्षपदाचा प्रबळ दावेदार” असे ठाम सांगून मैदान तापवले आहे.
एकूणच, आष्ट्यात तीन महत्त्वाच्या आघाड्यांमध्ये — आष्टा शहर विकास आघाडी, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस — थेट काटे की टक्कर होणार हे आता स्पष्ट दिसत आहे.
पूर्वीची सत्ता आणि नव्या समीकरणांची गुंफण
गत निवडणुकीत आष्टा नगरपरिषदेतील एकूण २१ जागांपैकी १५ जागा आष्टा शहर विकास आघाडीच्या ताब्यात होत्या. लोकनियुक्त नगराध्यक्षपदासह विलासराव शिंदे – जयंत पाटील गटाने नगरपरिषदेवर सत्ता प्रस्थापित केली होती.
तर लोकशाही विकास आघाडी ला तीन आणि अपक्ष उमेदवारांना तीन जागा मिळाल्या होत्या.
मात्र, यावेळी नगराध्यक्ष पद खुल्या गटासाठी राखीव ठरल्याने आणि दोन प्रभाग तसेच तीन नगरसेवक वाढल्यामुळे राजकीय चुरस आणखी तीव्र होणार आहे.
राजकीय उलथापालथ आणि नव्या वाटचालीचा प्रवास
गेल्या पाच वर्षांत कमळ चिन्हावर प्रचार करणाऱ्या निशिकांत पाटील गटाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे, तर याउलट राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल होऊन ‘तुतारी’ हाती घेतली. या बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे शहरातील राजकारणात गोंधळ, उत्सुकता आणि नव्या जोडण्या पाहायला मिळत आहेत.
नगराध्यक्ष आरक्षण जाहीर होण्याआधीच प्रवीण माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश करून जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली होती.
दुसरीकडे, वाळवा तालुक्यात भाजपची धुरा महाडिक बंधूंवर सोपवण्यात आली असून, भाजप कार्यकर्त्यांनी “आष्टा नगरपालिकेवर या वेळी कमळ फुलेल” असा दावा करत मोर्चा काढला आहे.
शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गटाचे) जिल्हा समन्वयक गौरव नायकवडी यांनीही आष्टा नगरपरिषदेतील घडामोडींवर लक्ष केंद्रित केल्याने शिवसेनेचाही खेळ वाढला आहे.
दरम्यान, राष्ट्रीय काँग्रेस आणि उबाटा शिवसेना यांच्या कार्यकर्त्यांचा झुकाव कोणत्या दिशेने होतो, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
आरक्षणातील गैरसमज आणि अचानक साजरा झालेला जल्लोष
आरक्षण जाहीर होण्याआधी सकाळी एक वेगळाच गोंधळ झाला. काही माध्यमांमधील भ्रमामुळे आष्टा (सांगली) आणि आष्टी (बीड) या नावांच्या साम्यामुळे गफलत झाली. त्यामुळे सोशल मीडियावर “आष्टा नगराध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी (SC)” राखीव असल्याच्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरल्या.
या गैरसमजातून भाजप आणि राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी आपल्या एससी प्रवर्गातील संभाव्य उमेदवारांची घोषणाही केली!
परंतु सायंकाळी पाचच्या सुमारास खरी यादी जाहीर होताच, आष्टा नगराध्यक्षपद “खुल्या गटासाठी” राखीव असल्याचे स्पष्ट झाले — आणि शहरभर एकच जल्लोष उसळला.
भ्रम, आनंद आणि नाराजी या तीनही भावना एकाच दिवशी अनुभवत, आष्ट्याचे राजकारण एका नव्या वळणावर पोहोचले आहे.
आता लक्ष कुणाला तिकीट मिळणार यावर!
आता पुढचा प्रश्न एकच —
“खुल्या” नगराध्यक्षपदासाठी कोणाची निवड होणार?
इच्छुकांची यादी मोठी आहे. प्रत्येक गटात आपापले दावेदार, आपली ताकद, आपले गणित आहे. पक्षनेतृत्वाचा कल कुठे झुकतो आणि युतीचे सूत्र कुणाकडे राहते, यावरच आष्टा नगरपरिषदेचा भवितव्य ठरणार आहे.
एकंदरीत, खुल्या गटाच्या आरक्षणाने आष्ट्यातील राजकारणाला नवा श्वास आणि नवी स्फूर्ती दिली आहे. शहरात राजकीय वारे वाहू लागले आहेत — आणि जनता प्रतीक्षेत आहे त्या ‘निर्णायक दिवसा’ची, ज्या दिवशी आष्ट्याचे नवे राजकीय चित्र उलगडेल. 
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.






पूर्वीची सत्ता आणि नव्या समीकरणांची गुंफण




