जिल्ह्यातील 156 ग्रामपंचायतींच्या सदस्य पदाचे आरक्षण जाहीर, 19 जूनपासून हरकतीची मुदत : जिल्ह्यातील 156 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसाठी शुक्रवारी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. या सोडतीमुळे अनेक इच्छुकांच्या राजकीय आकांक्षांना धक्का बसला तर, काहींना आरक्षणामुळे निवडणुकीची संधी मिळाल्याने ‘लॉटरी’ लागणार आहे. प्रभागातील आरक्षण सोडतीनंतर गावागावातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
जिल्ह्यातील 156 ग्रामपंचायतींच्या सदस्य पदाचे आरक्षण जाहीर, 19 जूनपासून हरकतीची मुदत
आरक्षण सोडतीवर हरकती दाखल करण्यासाठी 19 जून ते 25 जून मुदत आहे, त्यानंतर 10 जुलैला अंतिम आरक्षण जाहीर होईल. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सन 2024-25 मध्ये मुदत संपलेल्या 4 आणि सन 2025-26 मध्ये मुदत संपणार्या 152 अशा एकूण 156 ग्रामपंचायतींसाठी सदस्यपदांचे आरक्षण निश्चित करण्यात आले. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग तसेच महिला आरक्षणाची सोडत विशेष ग्रामसभांमध्ये काढण्यात आली. तहसीलदारांनी प्राधिकृत केलेल्या अधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पार पडली.
यापूर्वी एप्रिल महिन्यात या ग्रामपंचायतींची प्रभाग रचना अंतिम करण्यात आली होती. त्यामुळे सदस्यपदांसाठी होणार्या आरक्षण सोडतीकडे संभाव्य उमेदवार, स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते. अनेकांनी निवडणुकीच्या तयारीलाही सुरुवात केली होती. मात्र आरक्षण जाहीर झाल्यानंतर काही प्रभागांमध्ये इच्छुकांचे नियोजन कोलमडले असून काही नव्या चेहर्यांना राजकारणात प्रवेशाची संधी मिळणार आहे.
गावागावात आरक्षण सोडतीनंतर चर्चांना उधाण आले असून अनेक इच्छुकांनी आता अंतिम आरक्षण जाहीर होण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. हरकतीनंतर काही बदल होणार का, याबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांची रंगत आतापासूनच वाढू लागली आहे.
अंतिम आरक्षण व प्रभाग रचना 10 जुलैला
ग्रामपंचायत प्रभागातील आरक्षण सोडतीनंतर आता हरकती आणि सूचनांची प्रक्रिया सुरू होणार आहे. दि. 19 जून ते 25 जून या कालावधीत नागरिकांना हरकती दाखल करता येतील. प्राप्त हरकतींवर सुनावणी घेऊन प्रांताधिकारी 3 जुलैपर्यंत निर्णय देणार आहेत. त्यानंतर प्रस्ताव जिल्हाधिकार्यांच्या मंजुरीसाठी पाठविण्यात येईल. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दि. 10 जुलै रोजी अंतिम प्रभाग रचना आणि आरक्षण यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.










