sangli-satara election भाजप प्रदेशाध्यक्षांची सांगलीची बैठक रद्द ” सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण सांगली व सातारा जिल्हा दौर्यावर आले होते. सांगली जिल्ह्यात विटा व सांगली येथे बैठक आयोजित केली होती. पण सांगली येथील बैठकीला राष्ट्रवादी व शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी उपस्थित राहण्यास नकार दिल्याने प्रदेशाध्यक्षांना सांगलीचा दौरा रद्द करावा लागला. त्यामुळे सध्या महायुतीमध्ये अलबेल नसल्याची चर्चा रंगू लागली आहे.
sangli-satara election भाजप प्रदेशाध्यक्षांची सांगलीची बैठक रद्द
राष्ट्रवादी, शिवसेनेने उपस्थित राहणार दिला नकार
सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषदेची निवडणुकीसाठी गुरूवारी मतदान होणार आहे. या निवडणुकीत भाजपकडून धैर्यशील कदम तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून अभयसिंह जगताप तर अपक्ष म्हणून किशोर धुमाळ निवडणूक रिंगणात आहेत. ही निवडणूक महायुती विरूध्द महाविकास आघाडी अशी होत आहे. पण या निवडणुकीत महायुतीचे नेते एकत्रित येत असल्याचे चित्र दिसत नाही. निवडणूक अवघ्या चार दिवसांवर आली तरी महायुतीच्या नेत्यांमध्ये ताळमेळ नाही.
या निवडणुकीत भाजपकडून धैर्यशील कदम निवडणूक रिंगणात आहेत. त्यासाठी सांगली व सातारा जिल्ह्यात गेल्या सहा दिवसांपासून प्रचार सुरू आहे. शनिवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण सांगली व सातारा जिल्ह्याच्या दौर्यावर होते. सातारा जिल्ह्यातील दोन ठिकाणी बैठका होत्या.
मात्र कराड येथील बैठक रद्द झाल्याचे समजते. तेथून ते सांगली जिल्ह्यातील विटा व सांगली शहरात येणार होते. विटा येथे त्यांनी महायुतीतील पदाधिकार्यांशी चर्चा केली. पण या बैठकीला अनेक मित्रपक्षाचे पदाधिकारी गैरहजर होते. सांगली शहरात देखील बैठक आयोजित करण्यात आली होती. तसे निरोप देखील देण्यात आले होते.
भाजप पदाधिकारी, सदस्यांबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या मित्रपक्षांना देखील बैठकीचे निमंत्रण होते. पण या बैठकीला राष्ट्रवादी व शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी उपस्थित राहण्यास नकार दिला. अद्याप पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलणे झालेले नाही. पक्षाच्या नेत्यांबरोबर दोन दिवसात बैठक होणार आहे. यानंतर पुन्हा बैठक घेऊ, असे पदाधिकार्यांनी स्पष्ट केले, त्यामुळे भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी सांगलीची बैठक रद्द केली.
राष्ट्रवादी काँग्रेसची आज बैठक…..
सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण शनिवारी सांगलीला येणार होते. मात्र या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी उपस्थित राहण्यास नकार दिला. भाजपकडून विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून होत आहे. त्यामुळे निवडणुकीची दिशा ठरविण्यासाठी राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकार्यांची व सदस्यांची बैठक रविवारी एका खासगी हॉटेलमध्ये होणार आहे. या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.










