sangli-satara election शंभूराज देसाई अन् मकरंदआबांच्या अटीने भाजपला खिंडीत गाठलं : सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीमधील नाराजी पुन्हा उघड झाली आहे. सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील फोडाफोडीमुळे दुखावलेली राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने भाजपला खिंडीत पकडल्याचे दिसून येत आहे.
sangli-satara election शंभूराज देसाई अन् मकरंदआबांच्या अटीने भाजपला खिंडीत गाठलं
कराडमधील महायुतीच्या समन्वय बैठकीला दोन्ही पक्षाने दांडी मारून नाराजी दाखवून दिली आहे. विधान परिषदेसाठी मतदान हवे असेल तर झेडपीतील सत्तेची अट दोन्ही पक्षांकडून ठेवण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.
विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने सातार्यात वेगवान घडामोडी घडत आहेत.
भाजपकडून आज कराडमध्ये महायुतीच्या समन्वयाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीला भाजपचे दोन्ही जिल्ह्यातील सर्व नेते झाडून उपस्थित होते. मात्र, महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे एकही प्रतिनिधी उपस्थित नव्हता. खुद्द पालकमंत्री शंभूराज देसाईही अनुपस्थित होते, त्यामुळे दोन्ही पक्षाच्या नाराजीने पुन्हा उचल खाली आहे.
सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी-शिवसेनेने जिल्हा परिषद निवडणुकीतील फोडाफोडीचा वचपा काढायचे ठरविल्याचे दिसून येत आहे. कारण, धैर्यशील कदम यांना आमच्या सदस्यांची मते हवे असतील तर झेडपीतील सत्तावाटपाची अट दोन्ही पक्षाकडून भाजपपुढे ठेवण्यात आल्याची माहिती आहे.
सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे सव्वा वर्षे आम्हाला मिळावे. तसेच सभापतिपदाचे समसमान वाटप व्हावे, अशी अट शिवसेना-राष्ट्रवादीकडून भाजपपुढे ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे, त्यामुळे विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने ‘सांगली सातारा’मध्ये नवा पेच निर्माण झाला आहे.
या मतदारसंघात भाजपकडे 314 मतदार असून, त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस 205, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 119, शिवसेना 111, काँग्रेस 73, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 1 असे राजकीय पक्षांचे संख्याबळ आहे. याशिवाय सातारा जिल्ह्यात आघाड्या आणि अपक्षांची संख्याही लक्षणीय आहे, त्यामुळे या दोन्ही मित्रपक्षांच्या मदतीशिवाय भाजपचा विजय अशक्य आहे, त्यामुळे मित्रपक्षांच्या मागणीपुढे भाजपला झुकावे लागण्याची चिन्हे आहेत.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.










