jayant patil news : वाळवा पंचायत समितीवर जयंत पाटलांचाच झेंडा लागणार : वाळवा पंचायत समितीचे सभापतीपद खुले असल्यामुळे आठ मतदारसंघात चुरशीच्या लढती होत आहेत. या सर्व मतदारसंघात राष्ट्रवादी विरूध्द युती अशी लढत रंगली आहे. ईश्वरपूर नगरपालिकेप्रमाणे आ.जयंत पाटील यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक अत्यंत गांभीर्याने घेत स्वतः लक्ष घातले आहे. यावेळी पंचायत समितीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा झेंडा फडकेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. महायुतीचे नेते आपापल्या मतदारसंघात व्यस्त आहेत. त्यांचा आपसातील समन्वयाचा अभाव मतदारांच्या पर्यंत पोहोचण्यात व्यत्यय आणणारा ठरत आहे.
jayant patil news : वाळवा पंचायत समितीवर जयंत पाटलांचाच झेंडा लागणार
वाळवा तालुक्यात पंचायत समितीचे 22 गण आहेत. यापैकी बोरगाव, नेर्ले, वाटेगाव, कामेरी, चिकुर्डे, कारंदवाडी, बागणी, येलूर हे आठ मतदारसंघ खुले आहेत. आ.जयंत पाटील, माजी आ.मानसिंगराव नाईक, माजी आ.शिवाजीराव नाईक विरूध्द आ.सत्यजित देशमुख, आ.सदाभाऊ खोत, राहुल व सम्राट महाडिक, निशिकांत भोसले-पाटील, गौरव नायकवडी, आनंदराव पवार अशी प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
पंचायत समितीच्या बोरगाव मतदारसंघात राष्ट्रवादीचे राजारामबापू कारखान्याचे माजी संचालक माणिकराव पाटील यांचे चिरंजीव मनोज माणिकराव पाटील विरूध्द काँग्रेसचे यदुराज उदयसिंह थोरात अशी थेट लढत होत आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाचे शहाजी पाटील आणि अपक्ष चंद्रकांत खरात हे या मैत्रीपुर्ण लढतीची रंगत वाढवत आहेत. बोरगाव हे आ. जयंत पाटील यांचे काळीज आहे. ते अनेक भाषणात बोरगाव हे माझे काळीज आहे. असे सांगत असतात त्यामुळे त्यांच्यासाठी ही लढत प्रतिष्ठेची ठरणारी आहे. तर जिल्हा परिषदेच्या या मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी नाही. तर युतीने काँग्रेसच्या उमेदवाराला बाय दिला आहे. माझी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पाटील यांच्या पत्नी सौ.जयश्री जितेंद्र पाटील यांच्या विरोधात शरदचंद्र पवार राष्ट्रवादीच्या कांता वाटेगावकर या निवडणूक लढवत आहेत.
नेर्ले गणात राष्ट्रवादीचे महेश मोहन पाटील विरूध्द भाजपचे समर्थ सतिश पाटील अशी थेट लढत होत आहे. तर कासेगाव गणात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील यांच्या पत्नी सुप्रिया देवराज पाटील या निवडणूक लढवत आहेत. युवराज पाटील यांच्यासाठी ही लढत प्रतिष्ठेची आहे.
वाटेगाव गणात भाजपचे हेमंत आनंराव मुळीक विरूध्द राष्ट्रवादीचे प्रकाश गणपतराव पाटील अशी थेट लढत होत आहे. येथे आमदार जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक पंचायत समितीचे माजी सभापती रविंद्रकाका बर्डे यांच्या समर्थकांनी युतीला पाठींबा दिला आहे. त्यामुळे या मतदारसंघाची लढत चुरशीची होईल. संदीप धुमाळ हे रिपब्लिकन सेनेचे उमेदवार आहेत.
कामेरी गणात दोन्ही राष्ट्रवादीचे शहाजी विश्वास पाटील यांच्या विरूध्द सम्राट महाडिक यांचे कट्ठर समर्थक भाजपचे शुभम तुकाराम पाटील अशी थेट लढत होत आहे. कामेरी येथील डॉ.रणजित पाटील यांनी ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे या मतदारसंघात चुरस वाढली आहे.
चिकुर्डे मतदारसंघात भाजपचे सुरज दिलीप पवार विरूध्द राष्ट्रवादी पुरस्कृत प्रकाश रघुनाथ पाटील असा सामना रंगला आहे. कारंदवाडी मतदारसंघात राष्ट्रवादीचे प्रशांत प्रतापराव पाटील विरूध्द रयत क्रांती पक्षाचे अनिल जयसिंग सरदेशमुख अशी सरळ लढत होत आहे. माजी आ.विलासराव शिंदे यांचे सुपुत्र वैभव शिंदे, आ.जयंत पाटील गट विरूध्द आ.सदाभाऊ खोत यांच्या प्रतिष्ठा या मतदारसंघात पणाला लागल्या आहेत. याप्रमाणेच बागणी मतदारसंघात राष्ट्रवादीचे उदयसिंह प्रतापराव पाटील विरूध्द रयत क्रांती पक्षाचे निवास शामराव पाटील अशी थेट लढत होत आहे.
येलूर गणात भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक व जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक यांचे बंधू युतीचे पुष्कराज पांडुरंग महाडिक विरूध्द राष्ट्रवादीचे दिलीप रामचंद्र पाटील या थेट लढतीची वंचित बहुजन आघाडीचे लक्ष्मण डवरी रंगत वाढवित आहेत. बोरगाव, नेर्ले, वाटेगाव, कामेरी, चिकुर्डे, कारंदवाडी, बागणी, येलूर या मतदारसंघातील लढती पाहिल्या असता राष्ट्रवादी विरूध्द युती अशा सरळ लढती होत आहेत. या मतदारसंघातून निवडून येणारे आठ उमेदवार सभापतीपदासाठी पात्र उमेदवार असतील. आ.जयंत पाटील यांनी वाळवा तालुक्यातील सर्व मतदारसंघांची मजबूत बांधणी केली आहे. या विरूध्द युतीच्या नेत्यांनी आपआपला मतदारसंघ वाटून घेवून आपआपला प्रचार केला आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











