kavtepiran political news : कवठेपिरानमध्ये ‘रयत क्रांती’चे रणभेरी;: काळाचे चक्र फेर धरते आहे. स्वराज्याचे ब्रीद घेऊन उभ्या असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे नगारे वाजू लागले आहेत. सत्तेच्या सिंहासनासाठी चढाओढ सुरु झाली असून, सर्वच राजकीय पक्ष आपापली रणनिती आखू लागले आहेत. जिल्हा परिषद मतदारसंघांची अधिकृत घोषणा झाल्याने, ‘राजकीय तापमान’ आता प्रत्यक्ष उष्णतेच्या सीमारेषा ओलांडू लागले आहे.
kavtepiran political news : कवठेपिरानमध्ये ‘रयत क्रांती’चे रणभेरी;
भीमराव माने यांच्या भूमिकेने सत्तासमीकरणांना आव्हान
मिरज पश्चिम भागातील कवठेपिरान हा मतदारसंघ गेली अनेक दशके आपली स्वतंत्र ओळख आणि सत्तेतील ‘किंगमेकर’ भूमिका निभावत आला आहे. या भूमीत जिथे एकीकडे हिंदकेसरी मारूती माने यांची कुस्तीमातीतील झुंजारता होती, तिथेच राजकारणाच्या आखाड्यात भीमराव माने यांचं वजन कायमच भक्कम राहिलं आहे. याला काही अपवाद असले तरी ‘माने वर्चस्व’ हा इथल्या मतदारसंघाचा परिपाठच बनला आहे.
मात्र गेल्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सुरेखा आडमुठे यांनी आश्चर्यजनक विजय मिळवला. त्या काळातील राजकीय वारे आणि आत्ताचे वारे यामध्ये मात्र जमीनअस्मानाचा फरक झाला आहे. स्वाभिमानीचे बरेचसे कार्यकर्ते आता वळले असून, रयत क्रांतीच्या गोटात नव्या उर्जेची लहर निर्माण झाली आहे.
या वादळात एक महत्त्वाचा घटनाक्रम घडला – कवठेपिरानचे माजी सरपंच, अनुभवी आणि प्रभावशाली नेते भीमराव माने यांनी नुकताच सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेत जाहीर प्रवेश केला. हा प्रवेश म्हणजे केवळ पक्षांतरण नव्हे, तर राजकीय पटावर घडणार्या युगांतराचे सूचक आहे. कारण माने यांचे वैशिष्ट्य असे की, त्यांनी जरी अनेक राजकीय पक्षांत प्रवास केला असला, तरी ‘कवठेपिरान गटात विजयी उमेदवाराच्या नावावर त्यांचा ठसा’ राहिलाच आहे.
kavtepiran-political-news-the-battle-of-ryaat-kranti-in-kavtepiran
आज या गटात कवठेपिरान, दुधगाव, सावळवाडी, माळवाडी आणि तुंग या गावांचा समावेश असून, आरक्षणाचे चित्र स्पष्ट झाल्यानंतरच अंतिम उमेदवार ठरणार आहे. मात्र, मैदानावर तयारीच्या बाबतीत भीमराव माने सध्या इतरांपेक्षा अनेक कोस पुढे असल्याचे स्पष्टपणे दिसते.
दुसरीकडे, राजू शेट्टींच्या स्वाभिमानी संघटनेचे बळ आता पूर्वीइतके राहिलेले नाही. अनेक माजी शिलेदार इतर राजकीय संख्याबळात मिसळले आहेत. काहीजण राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात तर उरलेले महाडिकांच्या भाजपा पथात सामील झाले आहेत. अशा पार्श्वभूमीवर ‘रयत क्रांती’चा झेंडा हाती घेतलेले भीमराव माने म्हणजे नव्या पर्वाची नांदीच म्हणावी लागेल.
या सार्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एक गोष्ट मात्र निश्चिंत वाटते – कवठेपिरान गटातील निवडणूक म्हणजे केवळ स्थानिक सत्ता स्थापनेचे साधे समीकरण नाही, तर ही लढत आहे एका नव्या नेतृत्वाच्या उदयाची, सत्तेतील गटविचारांना सळो की पळो करून सोडणार्या ताकदीची आणि शेवटी – रयतेच्या मनातील क्रांतीची.
वर्चस्वाचा वारसा : माने घराण्याचे पाय घट्ट रोवलेले
ही भूमी हिंदकेसरी मारूती माने यांची. ही माती भीमराव माने यांच्या राजकीय दूरदृष्टीने सजलेली. हे घराणं म्हणजे नेतृत्व, परिश्रम आणि लोकसेवेचा जिवंत ठेवा. माने कुटुंबीयांनी या मतदारसंघावर केवळ राजकीय वर्चस्व मिळवलेले नाही, तर जनतेच्या हृदयावर प्रेमाने राज्य केले आहे.
आरक्षणाची चक्रे कधी कोणत्या दिशेने फिरतील, हे सांगता येत नाही. पण अपवाद वगळता, जेव्हा जेव्हा संधी आली तेव्हा माने घराण्याने पाठिंबा दिलेला उमेदवारच विजयी झाला, हा इतिहास आजही गावोगावी सांगितला जातो.
गावागावांतून राजकारणाची नाडी
या मतदारसंघात दोन मोठी गावं म्हणजे कवठेपिरान आणि दुधगाव — जी या भागाची राजकीय सूत्रे हातात धरून आहेत. या गावांचा राजकारणावरचा प्रभाव असाधारण आहे. उमेदवार कोण, पक्ष कोण, या प्रश्नांपेक्षा “तो कुठल्या गावचा?” हा प्रश्न इथं निर्णायक ठरतो. म्हणूनच, जिल्हा परिषदेचा उमेदवार निवडायचा तर तो या दोन गावांपैकीच असतो — ही येथे एक अलिखित परंपरा बनली आहे.
तर सावळवाडी, माळवाडी, आणि तुंग ही गावं छोट्या भौगोलिक कक्षा असूनसुद्धा मोठ्या राजकीय भूमिका बजावत असतात. सावळवाडी व माळवाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट म्हणजेच जयंत पाटील यांच्या विचारांना मानणारा गट बळकट आहे. हे कार्यकर्ते जरी गाव लहान असलं तरी संघटनशक्तीने मोठं काम उभं करू शकतात.
दुधगावमध्ये सर्वच राजकीय प्रवाहांचे कार्यकर्ते सक्रिय आहेत — जणू या गावात राजकीय गंगा-जमुनाची तहान भागवणारी एक लोकशाही धारा वाहते. तर तुंग गावात शेतकरी संघटनेचे विचार आणि अस्तित्व एक वेगळा सुर घालतात — शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणारा आवाज इथून उमटतो.
आरक्षणानंतर निर्माण होणारी खरी रंगत
या संपूर्ण राजकीय चित्रात एक गोष्ट ठळक आहे — “आरक्षण पडल्याशिवाय खरी निवडणूक रंगत उभी राहत नाही.” आरक्षणाचे गणित ठरले, की गावागावात चर्चा पेटतात, गल्ल्या गल्ल्यांत कुजबुज सुरू होते, आणि प्रत्येक कार्यकर्ता आपापली तयारी अधिक आक्रमकतेने सुरू करतो.
मात्र शेवटी अंतिम निर्णय तोच — माने घराणं कोणाच्या पाठीशी उभं राहतं? कारण येथे निवडणूक लढवणं म्हणजे केवळ प्रचार नव्हे, तर परंपरा, प्रतिष्ठा आणि लोकसेवेच्या संस्कृतीचा वसा पुढे नेण्याची जबाबदारी.
Author: अमोल कुदळे, दुधगाव
अमोल कुदळे गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. तरुण भारत मध्ये तें सध्या असून राजकीय लाईव्ह साठीही लिखाण करतात.










