miraj news : मिरज पंचायत समिती सभापती निवडणूक रद्द फेर निवडणूक घेण्याचे आदेश : मिरज पंंचायत समितीची सभापती निवडणूक ही बेकायदेशीर असल्याचे अर्ज श्रीमती राणी सचिन भोरे यांनी अतिरिक्त विभागीय आयुक्त पुणे विभाग पुणे यांच्याकडे केले होते. या अर्जामध्ये त्यांनी पंचायत समितीची 10 मार्च 2026 रोजी झालेली सभापती पदाची निवडणूक अवैध घोषित करावे अशी मागणी केली होती. यावर अतिरिक्त विभागीय आयुक्तांनी श्रीमती राणी सचिन भोरे यांनी दाखल केलेला विवाद अर्ज मान्य करण्यात आले असून 10 मार्च 2026 रोजी झालेली सभापती निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात आला असून सभापतीपदाची फेर निवडणूक घेण्याचे आदेश पारीत केले आहेत.
miraj news : मिरज पंचायत समिती सभापती निवडणूक रद्द फेर निवडणूक घेण्याचे आदेश
पंचायत समिती, मिरज येथे सभापती व उपसभापती पदाची निवडणूक घेण्यासाठी दिनांक 10 मार्च रोजी पंचायत समितीच्या सभागृहात बैठक बोलावण्यात आली होती. सदर बैठकीत पंचायत समितीचे सर्व सदस्य उपस्थित राहून मतदानाद्वारे सभापतीची निवड करावयाची होती. सभापती पदाची निवडणूक ही लोकशाही तत्त्वांवर आधारित प्रक्रिया असून ती पूर्णपणे मुक्त, निष्पक्ष व निर्भय वातावरणात पार पडणे आवश्यक असते.
कायद्यानुसार प्रत्येक सदस्यास कोणत्याही प्रकारचा दबाव, अडथळा किंवा भीती न बाळगता त्याचे मत स्वतंत्रपणे व्यक्त करण्याचा अधिकार आहे. परंतु पंचायत समिती मिरज सभापती व उपसभापती यांच्या निवडणुकीच्या वेळी पंचायत समितीचे सदस्य पांडुरंग कृष्णा इंगळे (शिवसेना शिंदे गट) हे निवडणुकीच्या वेळी मतदानासाठी पोहचू नयेत म्हणून त्यांचे दिनांक 09 मार्च रोजी रोजी संध्याकाळी 5:30 वाजता काही अज्ञात व्यक्तींनी बेकायदेशीररित्या अपहरण केले. तशी तक्रार त्यांचा मुलगा अमर पांडुरंग इंगळे यांनी दाखल केली आहे. सांगली ग्रामीण पोलीस ठाणे कडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पांडुरंग कृष्णा इंगळे यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध निवडणूक होईपर्यंत अडवून ठेवण्यात आले व त्यामुळे त्यांना पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती निवडणुकीसाठी पोहोचणे शक्य झाले नाही. सदर बेकायदेशीर कृत्यामुळे संबंधित सदस्यास सभापती निवडणुकीच्या बैठकीस उपस्थित राहणे शक्य झाले नाही. परिणामी त्या सदस्यास त्याचा वैधानिक मतदानाचा अधिकार बजावता आला नाही. यामुळे देखील निवडणुक ही बेकायदेशीर झाली असल्याचे म्हटले आहे.
निवडणूक प्रक्रिया मुक्त व निष्पक्ष वातावरणात पार पडलेली नाही. निवडणुकीच्या दिवशी पंचायत समितीच्या एका विधिवत निवडून आलेल्या पंचायत समिती सदस्याचे अपहरण करुन त्यांना मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यापासून रोखण्यात आले. हा प्रकार निवडणूक प्रक्रियेत झालेला गंभीर व बेकायदेशीर हस्तक्षेप आहे.
सदर घटनेबाबत संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून प्रथम माहिती अहवाल नोंद करण्यात आलेला आहे. सदर प्रकरणाचा तपास पोलिस अधिक्षक, सांगली यांनी करून त्याबाबत अहवाल जिल्हाधिकारी, सांगली यांच्याकडे सादर केलेला आहे. त्याबाबत जिल्हाधिकारी, सांगली यांनी देखील सदर घटनेचा सविस्तर अहवाल तयार करून तो मा. प्रधान सचिव, ग्रामविकास विभाग, मंत्रालय मुंबई यांच्याकडे सादर केलेला आहे.
पंचायत समिती, मिरज, जि. सांगली येथील दि. 10/03/2026 रोजी झालेली सभापती निवडणूक प्रक्रिया रद्द करणेत येत आहे. तसेच जिल्हाधिकारी, सांगली यांनी पंचायत समिती, मिरज येथील सभापती पदाची फेरनिवडणूक घेणेबाबत नियमानुसार कार्यवाही करावी, असे आदेश देणेत येत आहेत.
सदरचा निर्णय मान्य नसल्यास त्याविरूध्द राज्य शासनाकडे महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, 1961 मधील तरतुदीनुसार आदेश पारित झालेपासून 30 दिवसात अपील दाखल करता येईल. असेही म्हटले आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.










