miraj news : नवा पक्ष, नवा झेंडा…सत्ता मात्र मिरज पॅटर्नकडेच..

SHARE:

miraj news : नवा पक्ष, नवा झेंडा…सत्ता मात्र मिरज पॅटर्नकडेच..  महापालिकेच्या स्थापनेपासून मिरजेच्या राजकारणावर एक अदृश्य पण अढळ छत्रछाया आहे—ती म्हणजे बहुचर्चित ‘मिरज पॅटर्न’. निवडणूक आली की नवा पक्ष, नवा मुखवटा, नवी खेळी… पण सत्तेची किल्ली मात्र कायम त्याच कारभार्‍यांच्या खिशात! दशकानुदशके हा खेळ सुरू आहे; पण मिरजेच्या पदरी मात्र विकासाची एकही ठोस शिदोरी नाही.

miraj news : नवा पक्ष, नवा झेंडा…सत्ता मात्र मिरज पॅटर्नकडेच..

या सत्ताकेंद्री राजकारणाचा झटका कुणाला बसला नाही, असा पक्षच उरलेला नाही. काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, महाविकास आघाडी असो किंवा सत्ताधारी भाजप—मिरज पॅटर्नने प्रत्येकाला आपला हिसका दाखवून दिला आहे.
आणि याच खेपेलाही, निवडणुकीच्या तोंडावर, अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेऊन हेच कारभारी पुन्हा मैदानात उतरले आहेत. हेतू एकच—मिरज पॅटर्न पुन्हा सत्तेच्या केंद्रस्थानी!

“आम्हालाच नेता, आम्हीच सत्ता” – मिरजेचा अघोषित अजेंडा

मिरजेच्या राजकारणात वर्षानुवर्षे एक अघोषित नियम चालतो—
“आमचा कोणी नेता नाही; आम्हीच आमचे नेते!”
त्यामुळे आवटी, जामदार, नायकवडी, बागवान यांसारखी मोजकी घराणी आणि त्यांचेच साथीदार महापालिकेच्या खुर्च्यांवर वारंवार विराजमान होत आले आहेत.

सत्ता कोणाचीही असो, महापौर कोणताही असो, पण कारभार मात्र यांच्याच ठेक्यावर!
जो कोणी आदेश बदलण्याचा, वेगळा निर्णय घेण्याचा प्रयत्न करतो—त्याला सरळ फाट्यावर बसवायचं, हा इथला अलिखित कायदा. नेत्यांनाही चिठ्ठी बदलून तोंड दाबून बुक्क्यांचा मार देणारी ही परंपरा आहे.

मुख्यमंत्र्यांनाही न जुमानणारी मस्ती

काँग्रेसच्या सत्ताकाळात मुख्यमंत्री पद्मश्री स्व. डॉ. वसंतदादा पाटील यांना मानपत्र देण्याचा ठराव फेटाळण्याइतकी मस्ती या कारभार्‍यांनी दाखवली होती.
स्व. मदनभाऊ पाटील असोत वा आ. जयंतराव पाटील—कधी सोबत, कधी विरोधात जाऊन “नको, नको” करून सोडण्याची किमया या मिरज पॅटर्नने अनेकदा केली आहे.

सत्तेचे गणित उलटेपालटे करणारा ‘जगप्रसिद्ध’ पॅटर्न

महापालिकेत सत्ता एकाची, स्थायी सभापती विरोधी पक्षाचा—असा करिष्मा केवळ मिरज पॅटर्नच करू शकतो!
भाजप बहुमतात असताना अवघ्या १५ नगरसेवकांच्या राष्ट्रवादीचा महापौर बनवण्याचा चमत्कार याच पॅटर्नने घडवला होता.

लोकसभा असो, विधानसभा असो—निकाल लागल्यानंतरच आपल्या सोबत असलेल्यांनाही धक्का बसतो, एवढी ही खेळी बारकाईने रचलेली असते.

निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा यु-टर्न!

भाजप मजबूत दिसत असतानाच, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगेल, अशी चर्चा सुरू असतानाच मिरज पॅटर्नने पुन्हा वेगळा डाव टाकला आहे.
काँग्रेससोबत म्हणणारे किशोर जामदार, करण जामदार, आझम काझी, सतारमेकर यांनी ऐनवेळी अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीकडे वाटचाल सुरू केली आहे.

भाजपमधील इच्छुक, माजी महापौर, जयंतरावांचे निष्ठावंत, जुन्या सहकार्‍यांसह **‘चलो अजितदादा’**चा नारा देत हे सगळे पुन्हा एकाच छत्राखाली जमू लागले आहेत.
इतकेच नव्हे तर भाजपमध्ये राहून स्वतंत्र आघाडी उभारणारे सुरेश आवटी आणि अजितदादा गटाचे आमदार इद्रिस नायकवडी यांनाही या खेळात ओढले जात आहे.

मिरजकरांचा प्रश्न तोच – विकास कुठे?

मागील निवडणुकीत मिरजकरांनी अनेक जुन्या कारभार्‍यांना घरचा रस्ता दाखवला होता. पण त्यांच्या वारसदारांच्या माध्यमातून हा सत्तागाडा तसाच पुढे रेटला गेला.
आता पुन्हा अजितदादा पवारांच्या पक्षाचा मुखवटा लावून तोच जुना मिरज पॅटर्न नव्या अवतारात अवतरू पाहतो आहे.

यातून महाविकास आघाडीला धक्का बसणार आहेच; पण भाजपलाही ही खेळी चांगलीच महाग पडू शकते.
आता अजितदादा पवार, चंद्रकांतदादा पाटील, जयंतराव पाटील, विशाल पाटील, डॉ. विश्वजित कदम आणि त्यांचे शिलेदार या मिरज पॅटर्नला रोखण्यात कितपत यशस्वी होतात, याकडे संपूर्ण मिरजकरांचे लक्ष लागून राहिले आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *